सौंदर्य ही निसर्गाची एक अनमोल देणगी आहे, जी जपण्यासाठी आणि अधिक खुलवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असते. आजच्या आधुनिक युगात बाजारपेठेत विविध रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा अक्षरशः महापूर आला आहे. झटपट गोरेपणा, सुरकुत्या घालवणे किंवा केसांच्या समस्यांवर तात्काळ उपाय देणारी अनेक उत्पादने जाहिरातींच्या माध्यमातून आपल्यावर आदळत असतात. मात्र, या रासायनिक उत्पादनांचे तात्पुरते परिणाम दिसत असले तरी दीर्घकाळात त्यांचे त्वचेवर आणि केसांवर गंभीर दुष्परिणाम होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, संपूर्ण जग पुन्हा एकदा आपल्या प्राचीन भारतीय ज्ञान शाखेकडे अर्थात ‘आयुर्वेदाकडे’ आशेने पाहत आहे.
आयुर्वेदात सौंदर्याकडे केवळ बाह्य आवरण म्हणून पाहिले जात नाही, तर ते शरीराच्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब मानले जाते. चरक संहिता आणि सुश्रूत संहिता यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये ‘वर्ण’ (त्वचेचा रंग आणि पोत) सुधारण्यासाठी नैसर्गिक उपाय सांगितले आहेत.
आयुर्वेदानुसार, वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन बिघडल्यास त्वचेचे विकार, मुरुमे, अकाली केस पांढरे होणे किंवा गळणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने केवळ वरवरचा लेप न लावता, मुळापासून समस्या दूर करण्यावर भर देतात.
नैसर्गिक घटकांची ताकद आणि ‘आयुर्वेद वैद्यांनी’ बनवलेल्या प्रसाधनांचे महत्त्व
हळद, चंदन, कोरफड, कडुलिंब, आवळा, शिकेकाई, रिठा, गुलाबपाणी, ज्येष्ठमध आणि मुलतानी माती यांसारख्या वनस्पतींमध्ये अफाट औषधी गुणधर्म आहेत. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे, कोरफड त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते, तर आवळा आणि भृंगराज केसांना मुळापासून पोषण देतात.
आज बाजारपेठेत हर्बल आणि ऑरगॅनिक उत्पादनांची मागणी वाढत असली, तरी बाजारात मिळणार्या प्रत्येक व्यावसायिक उत्पादनावर डोळे झाकून विश्वास ठेवणे धोक्याचे ठरू शकते. अनेकदा आयुर्वेदिक या नावाखाली केवळ 1-2 टक्के नैसर्गिक अर्क वापरून उर्वरित भागात पॅराबेन्स, सल्फेट्स, कृत्रिम रंग आणि सुगंध यांसारखी घातक रसायने मिसळली जातात. अशा वेळी तज्ज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली सौंदर्य प्रसाधने वापरणे हाच सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो.
आयुर्वेद वैद्य जेव्हा सौंदर्य प्रसाधने (उदा. उटणे, अभ्यंग तेल, केश्य तेल, हर्बल साबण, लेप किंवा लिप बाम) तयार करतात, तेव्हा त्यामागे केवळ सौंदर्याचा विचार नसून, चिकित्सेचा दृष्टिकोन असतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती (वात, पित्त किंवा कफ), त्वचेचा प्रकार आणि ऋतू यांचा अभ्यास करून वैद्य शुद्ध वनस्पती, कोल्ड-प्रेस्ड तेले आणि नैसर्गिक घटकांचा योग्य प्रमाणात वापर करतात. वैद्यांनी बनवलेल्या प्रसाधनांमध्ये कोणतेही कृत्रिम
प्रिझर्व्हेटिव्हज नसतात, तसेच वनस्पतींचे मूळ गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी पारंपरिक आयुर्वेदिक विधींचा (उदा. स्नेहपाक विधी) अवलंब केला जातो. त्यामुळे अशी प्रसाधने त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता दीर्घकालीन परिणाम देतात.
आयुर्वेदात ‘आहार’ (खानपान) आणि ‘विहार’ (राहणीमान व आचरण) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदात म्हटलेच आहे जसा आहार असेल तसेच आपले शरीर आणि मन घडते. आपण जे खातो त्याचेच रूपांतर रस, रक्त आदी सप्तधातूंमध्ये होते. जर आहारात अति तिखट, तेलकट, आंबट, आंबवलेले, शिळे किंवा जंक फूडचे प्रमाण जास्त असेल तर शरीरात पित्त आणि आम (विषारी द्रव्ये) वाढतात, ज्याचा थेट परिणाम चेहर्यावर मुरुमे, काळे डाग आणि निस्तेजपणाच्या रूपात दिसून येतो. याउलट, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, गायीचे साजूक तूप, दूध, सुकामेवा, कोकम, आवळा आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला आतून नैसर्गिक तजेला मिळतो. तसेच, ‘विहार’ म्हणजेच आपले दैनंदिन आचरण; अति जागरण टाळणे, मानसिक तणावापासून दूर राहणे आणि प्रसन्न मनाने राहणे या गोष्टी चेहर्यावरील तेज टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत.
केवळ महागडी सौंदर्य प्रसाधने वापरून सौंदर्य टिकत नाही, तर त्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणे, कोमट पाणी पिणे, नियमितपणे शरीरास आणि केसांना आयुर्वेदिक तेलाने मालिश (अभ्यंग) करणे आणि उटण्याने स्नान करणे यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो, रक्ताभिसरण वाढते आणि सुरकुत्या लवकर पडत नाहीत. नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केल्याने शरीरातील घाम बाहेर पडून त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे चेहरा टवटवीत दिसतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून झोपणे आणि किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे हीच सर्वोत्तम नाईट क्रीम आहे.
खरे सौंदर्य हे केवळ बाह्य प्रसाधनांमध्ये नसून, ते आपल्या दैनंदिन जीवनशैलीत दडलेले असते. आयुर्वेदाने सांगितलेला सात्त्विक आहार, योग्य विहार, शिस्तबद्ध दिनचर्या आणि तज्ज्ञ वैद्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या शुद्ध
आयुर्वेदिक प्रसाधनांचा वापर यांची सांगड घातल्यास कोणत्याही कृत्रिम प्रसाधनांशिवाय आपण चिरतरुण, निरोगी आणि शाश्वत सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो.
Cosmetics and Ayurveda
थंडीच्या दिवसांत आरोग्याची घ्या विशेष काळजी! हिवाळा सुरू झाला की, वातावरणातील गारव्यामुळे आपल्या भुकेत आणि…
जगभरात विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी अनेक…
मतदार याद्या अद्ययावत व शुद्ध करण्यासाठी देशभरात स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) कार्यक्रम राबविला जात आहे.…
बिअरच्या फुटलेल्या बाटलीने तिघांवर वार सिन्नर : प्रतिनिधी वाइन शॉपीबाहेर सुरू असलेला तरुणांचा वाद मिटवण्यासाठी…
डोंगळे, अनधिकृत मोटारी व अनधिकृत वीज जोडण्यांवर होणार कारवाई ; निफाड तालुक्यात 11 मंडळांत भरारी…
निर्माल्याचा खच, नदीपात्रात वाहनांची धुलाई नाशिक : प्रतिनिधी गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…