भूमि अभिलेखचा उपअधीक्षक
पाचशे रुपयांची लाच घेताना जाळ्यात
सटाणा: प्रतिनिधी
वारसाहक्काने मिळालेल्या घराची नोंद तक्रारदाराच्या नावावर करून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बागलाण (सटाणा) येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. देवेंद्र मधुकर भावसार (वय ५१) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ४८ वर्षीय पुरुष तक्रारदाराच्या वडिलांचे सटाणा शहरातील नेहरू रोड, कोर्ट गल्ली परिसरात भूमापन क्रमांक १९९ मधील घर आहे. सदर घर वारसाहक्काने तक्रारदार यांच्या नावावर लावण्यासाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी संबंधित काम करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक देवेंद्र भावसार यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी भावसार यांना तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.