संपादकीय

सरकार बदलूनही बांगलादेशातील हिंदूंची स्थिती ‘जैसे थे’

बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांचे होणारे दमन अद्याप थांबलेले नाही. ‘ह्यूमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ने प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय अहवालात 2026 च्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यानुसार या चार महिन्यांत तेथील अल्पसंख्याकांविरुद्ध छळ आणि हिंसाचार यांच्या 505 घटनांची नोंद झाली आहे. यात शंभर हिंदूंची क्रूर हत्या करण्यात आल्याची नोंद आहे.

देशातील 47 वेगवेगळ्या जिल्ह्यांत या घटनांची नोंद झाली आहे. हिंदूंचे अपहरण आणि मॉब लीचिंगच्या 144 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. 28 हिंदू महिलांवर बलात्कार केला गेल्याचीही या अहवालात नोंद करण्यात आली आहे. हिंदूंचे ऊर्जास्रोत असलेली 95 मंदिरे या चार महिन्यांत धर्मांधांकडून फोडण्यात आली आहेत. अर्थात, ही आकडेवारी केवळ पोलीस दरबारी नोंद झालेल्या घटनांची आहे. प्रत्यक्ष आकडे यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने असू शकतात. भीती आणि तेथील बहुसंख्य समाजाकडून हिंदू समाजावर निर्माण केला जाणारा दबाव यामुळे असंख्य पीडित पोलीस स्थानकांत जातही नाहीत. एकूणच बांगलादेशमधील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अल्पसंख्याक हिंदूंचे रक्षण करण्यास पूर्णतः असमर्थ ठरली आहे. बांगलादेशात सत्तांतर होऊनही हिंदू आणि इतर दुर्बल समुदायांची स्थिती अजिबात सुधारलेली नाही. अल्पसंख्याक समुदायातील महिला आणि मुली यांना या हिंसाचारात सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे.
अहवालात महिलांवरील लैंगिक हिंसाचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्कार यांच्या 28 भयानक घटनांचा उल्लेख आहे, ज्या 23 वेगवेगळ्या जिल्ह्यांत घटना घडल्या आहेत. हिंदूंच्या वडिलोपार्जित जमिनींवर बळजबरीने नियंत्रण मिळवणे, त्यांच्या घरांना आग लावणे आणि लुटालुटीच्या 132 मोठ्या घटना समोर आल्या आहेत. पैसा आणि बळ यांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदूंच्या कुटुंबांना बेघर केले जात आहे, जेणेकरून त्यांना देश सोडण्यास भाग पाडले जावे. बांगलादेशात धार्मिक स्वातंत्र्य केवळ कागदावर आहे. केवळ चार महिन्यांत हिंदूंची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आक्रमणे अन् तोडफोडीच्या 95 घटनांची नोंद झाली आहे. धर्मांध जमाव उघडपणे मंदिरांवर हल्ले करतात. मंदिरांतील पवित्र मूर्तींची विटंबना करतात. बांगलादेशातील सत्तांतराचा अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
वर्ष 2025 मध्ये महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या 18 महिन्यांच्या कार्यकाळातही हिंदूंवर भीषण अत्याचार झाले होते, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. त्या काळात हिंदूंच्या विरोधात साडेतीन हजार आक्रमण-अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी-2026 मध्ये जेव्हा नवीन निवडून आलेले सरकार सत्तेत आले, तेव्हा परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती; परंतु ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सरकारच्या काळातही हा हिंसाचार त्याच वेगाने चालू आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हे संकट कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून तिथल्या व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. 1947 साली पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये एक तृतीयांश हिंदू होते. 2022 मध्ये जेव्हा देशात जनगणना झाली तेव्हा तेथे 7.96 टक्के हिंदू शिल्लक राहिल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. फाळणीनंतर तेथील हिंदूंची संख्या कमी होत गेली तर मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
फाळणीपासूनच स्थानिक अल्पसंख्य हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. स्थानिकांच्या छळाला कंटाळून दरवर्षी लाखो हिंदू देशातून पलायन करतात. हे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बांगलादेशातील हिंदूंना दिली जाणारी अन्याय्य वागणूक हा जुना विषय असला तरी गेल्या चार महिन्यांत तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. हे असेच चालत राहिले तर पुढील काही महिन्यांत बांगलादेशात नावालाही हिंदू शिल्लक राहणार नाही. याउपरांत बांगलादेशातील गरिबीला कंटाळून बांगलादेशी मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत आहेत. आजमितीला ही संख्या दहा कोटींहून अधिक झाली आहे. भारतातील विकसनशील शहरी भागात बांगलादेशी नागरिकांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. येथील स्थानिक झोपडपट्टीदादा पैशांच्या मोबदल्यात या बांगलादेशी घुसखोरांच्या निवार्‍याची, नोकरी, व्यवसायाची आणि कागदपत्रांची व्यवस्था करून देतात. आजमितीला अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आणि अनधिकृत कामांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे.
घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलण्याचा कायदाही अस्तित्वात आहे. मात्र, त्याची कठोरपणे अंमलबजावणीच केली जात नाही. एकीकडे बांगलादेशातील हिंदू नामशेष होऊ लागला आहे, तर दुसरीकडे भारतात आलेले बांगलादेशी घुसखोर भारताची अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणू लागले आहेत. देशात राहून देशाशी बेईमानी करणारे काही देशद्रोही नागरिक या बांगलादेशीच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करत आहेत, त्यामुळे त्यांना शोधून देशातून हाकलून लावणे पोलिसांनाही जिकिरीचे होऊ लागले आहे. मध्यंतरी काही भागांत नागरिकांनीच पुढाकार घेऊन परिसरातील बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र, ती आता थंडावली आहे. बांगलादेशातून पळून भारतात आलेल्या शेख हसीना यांच्या सुरक्षेत सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यांच्या पारपत्राची मुदत संपल्यानंतरही सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. दुसरीकडे, बांगलादेशात प्रतिदिन होणार्‍या हिंदूंच्या दमनासाठी देशाचे सरकार काहीच पावले उचलताना दिसत नाही. देशाची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था धोक्यात आणणार्‍या बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांबाबत सरकार कोणतेही विशेष धोरण आखताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात भारतातून घुसखोरांना हाकलण्यासाठी सामान्य जनतेनेच पुढाकार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.

Despite change of government, condition of Hindus in Bangladesh remains ‘as is’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago