अग्रलेख

व्हाइट हाउसची सुरक्षा ऐरणीवरच

अमेरिकेच्या अध्यक्षांंचे सरकारी निवासस्थान आणि कार्यालय असलेली इमारत म्हणजे व्हाइट हाउस! राजधानी वॉशिंग्टन डीसी या शहरात ही इमारत आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली देश कोणता असेल, तर तो अमेरिका. या देशाचा अध्यक्ष जगातील सर्वांत शक्तिशाली नेता समजला जातो. इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी आणि युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत आहेत. युद्धाबाबत त्यांची उलटसुलट वक्तव्ये चर्चेत आली. अर्थात, उलटसुलट वक्तव्ये करून जगालाच नव्हे, तर शत्रू देशाला गोंधळात टाकण्याचा त्यांचा एक स्वभाव आहेच. ट्रम्प कधी काय बोलतील, याचा भरवसा नाही. पश्चिम आशियात इराणविरुद्ध अमेरिकेचे युद्ध सुरू असताना ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न अमेरिकेतच ऐरणीवर आला आहे. महिनाभराच्या कालावधीत तीन वेळा व्हाइट हाउसच्या सुरक्षेला आव्हान मिळाले. दोन घटनांत हल्लेखोरांनी गोळीबार केला. व्हाइट हाउस म्हणजे अमेरिकन सत्तेचे सर्वोच्च केंद्र; एका जागतिक महासत्तेची हीच मुख्य इमारत, याच इमारतीतून आंतरराष्ट्रीय राजकारणाची सर्व सूत्रे हलतात. इराणवर हल्ला करण्याचा निर्णय याच इमारतीतून घेतला गेला. इराण युद्ध यावर्षी 28 फेब्रुवारीपासून सुरू झाले. युद्ध सुरू झाल्यापासून व्हाइट हाउसची सुरक्षा गेल्या शनिवारी तिसर्‍यांदा धोक्यात आली. केवळ व्हाइट हाऊसचीच सुरक्षा धोक्यात आली नाही, तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला. जगातील सर्वांत सुरक्षित इमारतींपैकी एक इमारत म्हणजे व्हाइट हाउस. शनिवारी, 23 एप्रिल 2026 रोजी रात्री व्हाइट हाउस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली, तेव्हा ट्रम्प उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना व्हाइट हाउस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. भोजनादरम्यान गोळीबार झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि इतर वरिष्ठ नेत्यांना सुरक्षेसाठी तत्काळ बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. गोळीबार झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स मुख्य टेबलावर उपस्थित होते. अनेक मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या कार्यक्रमात कॅलिफोर्नियातील टोरन्स येथील रहिवासी असलेल्या कोल थॉमस अ‍ॅलन नावाच्या तरुणाने सर्व सुरक्षा चौक्या आणि मेटल डिटेक्टर्स भेदून हॉटेलच्या आतील सुरक्षा वर्तुळात थेट घुसखोरी केली आणि त्याने केवळ सुरक्षारक्षकांनाच आव्हान दिले नाही, तर त्याच्याकडे असलेली शॉटगन आणि अत्यंत धारदार चाकू थेट सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकार्‍यांवर रोखून गोळीबार केला. या भीषण आणि अनपेक्षित हल्ल्यामुळे संपूर्ण हॉटेलमध्ये एकच प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तत्काळ अत्यंत वेगाने हालचाली करत आणि
स्वतःचा जीव धोक्यात घालून या हल्लेखोराला जागीच पकडले आणि ताब्यात घेतले. हा थेट राष्ट्राध्यक्षांच्या जीवाला असलेला सर्वोच्च धोका होता. हल्लेखोर थेट मुख्य हॉलच्या अगदी जवळ पोहोचला होता. या घटनेने संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडले होते. सिक्रेट सर्व्हिसच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या घटनेनंतर 4 मे 2026 रोजी व्हाइट हाउस परिसरात एका बंदूकधारी व्यक्तीने सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकार्‍यांवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव व्हाइट हाउस तातडीने लॉकडाउन करण्यात आले होते. एका अज्ञात बंदूकधार्‍याने थेट सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकार्‍यांना लक्ष्य करून गोळीबार केला. या गोळीबाराच्या वेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा ताफा त्या भागातून जात होता. या हल्ल्यातून तो ताफा थोडक्यात बचावला होता. मे महिन्यात दुसर्‍यांदा व्हाइट हाउसची सुरक्षा धोक्यात आली. 23 मे 2026 रोजी व्हाइट हाउसच्या सुरक्षा चौकीजवळ पुन्हा एकदा भीषण गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकार्‍यांनी केलेल्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर मारला गेला. नासीर बेस्ट नावाचा हल्लेखोर स्वतःला येशू ख्रिस्त समजत होता. त्याने बॅगेतून बंदूक काढून अचानक सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकार्‍यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अधिकार्‍यांनी केलेल्या जवाबी कारवाईत तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. गोळीबार झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसच्या इमारतीमध्येच उपस्थित होते.गोळीबाराच्या वेळी उपस्थित असलेला एक निष्पाप नागरिक जखमी झाला. या हल्लेखोराला आधीच व्हाइट हाउस परिसरात येण्यास बंदी होती आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. 25 एप्रिल आणि 4 मे 2026 नंतर एकाच महिन्यात व्हाइट हाउसच्या परिसरात सुरक्षा भेदण्याचा किंवा गोळीबार करण्याचा हा तिसरा मोठा प्रयत्न होता. संपूर्ण जगभरात ज्या वास्तूची सुरक्षाव्यवस्था अभेद्य, कडेकोट आणि मानवी कल्पनेच्या पलीकडे कडक मानली जाते, त्याच व्हाइट हाउसची सुरक्षा महिनाभरात तिसर्‍यांदा धोक्यात आली. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारी रोजी हल्ले केले. या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह प्रमुख नेते ठार झाले. हल्लेखोर त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले. एप्रिलमधील घटनेनंतर ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांविषयी शंका उपस्थित केली होती. जुलै 2024 मध्ये पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान एका हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. त्यांपैकी एक त्यांच्या कानाला चाटून गेली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तत्काळ ट्रम्प यांना संरक्षण दिले. या हल्ल्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये फ्लोरिडाच्या पाम बीचमधील मार-ए-लागोजवळ एका सशस्त्र संशयिताला पकडण्यात आले. एका सिक्रेट सर्व्हिस एजंटने गोळीबार केला; परंतु ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. जून 2016 मध्ये मायकल स्टीव्हन सँडफोर्ड नावाच्या व्यक्तीने लास वेगासमध्ये एका पोलिस अधिकार्‍याची बंदूक हिसकावून ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला त्वरित पकडण्यात आले आणि नंतर दोषी ठरवण्यात आले. सप्टेंबर 2017 मध्ये ग्रेगरी ली लेनिंगांगने नॉर्थ डकोटामध्ये एक फोर्कलिफ्ट चोरली आणि ट्रम्प यांच्या मोटारगाड्यांच्या ताफ्याला धडक देण्याची योजना आखली होती. तथापि, ते वाहन रस्त्याच्या मधोमध अडकले आणि संशयिताला थांबवण्यात आले. भविष्यासाठी व्हाइट हाउसमध्ये ड्रोन-प्रूफ आणि बुलेटप्रूफ, काचेने सुसज्ज असलेली एक आधुनिक वॉर रूम बांधण्याच्या गरजेवर ट्रम्प यांनी भर दिला होता, तो एप्रिलमधील हल्ल्यानंतर! इराण युद्ध सुरू झाल्यानंतर चार वेळा व्हाइट हाउसची सुरक्षा धोक्यात आली आणि ट्रम्प यांच्या जिवाला धोका निर्माण झाला, हेच अमेरिकेसाठी चिंताजनक आहे.

White House security on high alert

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सरकारी खर्चात 20 टक्के कपातीचे आदेश

‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…

8 minutes ago

बीएसएनएलचा 1 रुपयात 24 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…

12 minutes ago

भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकारी ठार

सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…

15 minutes ago

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार

जुहूतील पुष्पा पार्क येथे वर्दळीत थरार, अभिनेता सुरक्षित मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर…

21 minutes ago

दसर्‍याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी

विजयादशमी अर्थात, दसर्‍याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने सध्या सर्वत्र झेंडूच्या मळ्यांत तोडणी सुरू…

26 minutes ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 18 ते 24 ऑक्टोबर 2026 मेष : अनपेक्षित लाभ या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…

29 minutes ago