नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळून जनजीवन विस्कळीत झाले. नाशिक शहरात दिवसभरात 49 मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीची पातळी पुन्हा वाढली असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.
प्रशासनाच्या अद्ययावत अहवालानुसार जिल्ह्यात अधिकृतरीत्या मनुष्यहानीची नोंद नसली, तरी बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील शेतकरी समाधान सहादू पगार यांचा शेतीपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा सुरू आहे.
पावसामुळे इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाला आहे. तसेच जिल्ह्यात 32 घरांची पडझड झाली असून, इगतपुरी (9), निफाड (6), सुरगाणा (5) आणि कळवण (4) तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यात दोन गोठ्यांचेही नुकसान झाले.
वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. इगतपुरीतील काळूस्ते-फोडसेवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद असून सुरगाणा येथील गहाले-चिंचदा पूल पाण्याखाली गेल्याने बंद करण्यात आला आहे. मात्र निफाड, पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, मालेगाव, नाशिक आणि चांदवड तालुक्यांतील बहुतांश बंद रस्ते व पूल पाणी ओसरल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. सापुतारा-वणी मार्गावरील घागबारी येथे अडकलेले अवजड वाहन हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून सकाळी 9 वाजेपर्यंत नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून 49,066 क्युसेक्स, दारणा धरणातून 8,858, होळकर पुलावरून 8,801, चणकापूर धरणातून 7,591 आणि गंगापूर धरणातून 4,410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पालखेड, हरणबारी, भाम, ओझरखेड, पुणेगाव आणि वालदेवी प्रकल्पांतूनही विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, धरणांच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
निफाडमध्ये नागरिकांचे स्थलांतर
पूरपरिस्थितीमुळे निफाड तालुक्यातील 429 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये सायखेडा येथील 170 नागरिकांना जनता इंग्लिश स्कूलमध्ये, चांदोरी येथील 134 नागरिकांना गोदावरी सेवा सहकारी संस्था हॉलमध्ये, तर चाटोरी येथील 125 नागरिकांना जिल्हा परिषद मराठी शाळा व मारुती मंदिर येथे तात्पुरता आश्रय देण्यात आला आहे.
District battered by heavy rainfall