नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे येणार्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचा ताण थेट शहरावर येऊ नये, यासाठी संलग्न जिल्ह्यांच्या हद्दीतच भाविकांची गर्दी नियंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील गर्दीची स्थिती पाहून संबंधित जिल्ह्यांत भाविकांना थांबवून परिस्थिती निवळल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना नाशिकच्या दिशेने सोडण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, स्वच्छतागृहे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रशासनाची राहील. विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी संलग्न जिल्ह्यांच्या अधिकार्यांच्या बैठकीत याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. नाशिक विभाग आणि संलग्न जिल्ह्यांतील प्रशासनाच्या समन्वयासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. नाशिककडे येणार्या धुळे, पालघर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे आदी मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी नियंत्रण, पर्यायी मार्ग, वाहनांचे नियमन आणि महामार्गालगत उपलब्ध जागांचा वापर याचे आधीच नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सिंहस्थ प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत कुंभमेळ्याच्या नियोजनाचे सादरीकरण केले. मागील नाशिक सिंहस्थ आणि प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा विचार करता यंदा सिंहस्थ काळात नाशिकमध्ये आठ ते दहा कोटी, तर त्र्यंबकेश्वर येथे सुमारे चार कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. अमृतस्नानाच्या दिवशी नाशिकमध्ये एकाच दिवशी दीड कोटी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 75 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासगी बसेस, अन्य राज्यांतील बसेस आणि खासगी वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आहे. नियंत्रित क्षेत्रात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसची शटल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संलग्न जिल्ह्यांनी त्यांच्या हद्दीतील घाटरस्ते, महामार्ग आणि वाहतूक व्यवस्थेची पूर्वतयारी पूर्ण करावी, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले. बैठकीला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, डांगचे जिल्हाधिकारी एन. डी. परमार, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. धुळे, जळगाव, नंदुरबार, वलसाड येथील जिल्हाधिकारी, तसेच पुणे व भुसावळ रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
शटल सेवेला प्राधान्य
कुंभमेळ्याच्या नियंत्रित क्षेत्रात खासगी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी प्रवेशावर निर्बंध ठेवण्याचे नियोजन आहे. भाविकांच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसची शटल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरील वाहनांचा शहरातील ताण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
एकाच दिवशी दीड कोटी भाविकांचा अंदाज
अमृतस्नानाच्या पर्वणीला नाशिकमध्ये दीड कोटी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 75 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पर्वणीच्या दिवशी वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी जिल्हानिहाय नियोजनाला विशेष महत्त्व राहणार आहे.
District-wise staggered entry to control crowds at the Kumbh Mela.