संपादकीय

सावाना ग्रंथ महोत्सवात डॉ. तारा भवाळकर यांनी उलगडला लोकवा़ङ्मयाचा पट

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. तारा भवाळकर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे असे व्यक्तिमत्त्व. लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणार्‍या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणार्‍या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. खरे म्हणजे, ताराबाई आज वयाच्या 83 व्या वर्षीही लिखाणापासून समाजमाध्यमांपर्यंत सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने कार्यरत आहेत. साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. भवाळकर यांची निवड करण्यात आली होती. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील साहित्याशी संबंधित व अन्य सामाजिक संस्था तथा संघटनांच्या वतीने संमेलनाध्यक्षांचा सत्कार करण्याची प्रथा आहे. या प्रथेला अनुसरून नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने(सावाना)देखील डॉ. भवाळकर यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. पण काही कारणाने तो राहून गेला होता. दरम्यानच्या काळात नाशिक जिल्ह्यातीलच अन्य संस्थेनेे सुमारे महिनाभरापूर्वी कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी सावानाने सत्कार करणे अपेक्षित होते, अशी खोचक टीका झाली होती. वास्तविक सावानाने डॉ. भावळकर यांचा सत्कार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते, असे सांगितले जाते. पण, नवीन संमेलनाध्यक्षांची निवड होऊन साहित्य संमेलन तोंडावर आले असताना उशिरा का होईना डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार सावानातर्फे करण्यात आला. सावाना ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ताराबाईंनी लोकवाङ्मयाचा आणि आपल्या जीवनाचा पट उलगडून दाखविला आणि त्याला रसिक-श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होत दाद दिली.
ताराबाईंनी लोकसंस्कृती, नाट्य संशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयांवर पुष्कळ संशोधन, लेखन केले आहे. ग्रंथालय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत झाली. याप्रसंगी त्यांनी आपला साहित्यविषयक जीवनाचा पट उलगडून दाखवला. ताराबाईंनी सविस्तरपणे जीवनातील प्रेरणा आणि लोकसाहित्यातील वाटचाल याची माहिती सांगितली. माझ्या जडणघडणीत पुस्तके व ग्रंथालयाचा मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे भाषा आणि लिपी यांचा परस्परसंबंध, लोकसंस्कृती-लोकसाहित्य यांची परंपरा, संत साहित्यातील पर्यावरणाचे महत्त्व, स्त्री संतांचा आधुनिक दृष्टिकोन, अशा विविध विषयांना स्पर्श करीत त्यांनी आपले मनोगत मुलाखतीतून व्यक्त केले.
करंजीकर, डॉ. शेवडे यांचे व्याख्यान
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने आयोजित ग्रंथालय महोत्सवात ज्येष्ठ विचारवंत दीपक करंजीकर यांचे ‘अस्वस्थ शतकाचा वेध’ या विषयावर व्याख्यान झाले. करंजीकर म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून, तिचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. ज्येष्ठ निरूपणकार व विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनीदेखील महोत्सवात अपरिचित रामायण या विषयावर आपले विचार मांडले. डॉ. शेवडे यांनी सांगितले की, रामायणातील सर्व पात्रे व कथा या केवळ महर्षी वाल्मीकींंनी रचलेल्या मूळ महाकाव्यातूनच आलेल्या आहेत. रामायणावर आधारित कथा, कादंबर्‍या किंवा सोशल मीडियावर पसरवले जाणारे प्रवाद हे निरर्थक असून, मूळ रामायण हेच सत्य आहे.
हाक पृथ्वीची प्रथम
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 46 व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका
स्पर्धेच्या अंतिम स्पर्धा झाल्या. यात वाखारी (ता. नांदगाव) येथील किसान विद्यालयाने सादर केलेली शेवटची हाक पृथ्वीची या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे अभिनेते दीपक करंजीकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. भरत केळकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला उपस्थित होते.
नाताळ सण उत्साहात साजरा
ख्रिस्ती बांधवांचा सर्वांत मोठा सण असणारा नाताळ सण नाशिकरोडसह परिसरात उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा केला. जेलरोड येथील संत अण्णा महाचर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी विश्वशांतीसाठी मध्यरात्री विशेष प्रार्थना केली. नाशिक प्रांताचे मुख्य धर्मगुरू बिशप बार्थोल बरेटो यांनी यावेळी नाताळचा शुभसंदेश दिला. प्रमुख धर्मगुरू फादर गिल्बर्ट डिनीस, सहाय्यक धर्मगुरू फादर प्रमोद मकासरे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे नाशिक शहरातील संत आंद्रिया चर्च, होली क्रॉस चर्च यांसह विविध चर्चमध्ये नाताळनिमित्त प्रार्थना करण्यात येऊन नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन अत्यंत जल्लोष व धार्मिक वातावरणात हा सण साजरा करण्यात आला.
ग्रामरंग कथासंग्रहाचे प्रकाशन
ग्रामरंग हा आशयसंपन्न कथासंग्रह असून, लेखिकेने यातून ग्रामीण भागातील विविध रंगांची उधळण केली आहे. ग्रामरंगमधील सर्वच कथा उत्कृष्ट असून, भावस्पर्शी व चिंतनशीलता ही या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक व समीक्षक डॉ. दिलीप पवार यांनी केले. लेखिका सोनल इचाळे-दाते यांच्या ग्रामरंग या कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे प्रा. बापूसाहेब वाणी उपस्थित होते. सोनल इचाळे-दाते यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील व्यथा-वेदनांवर, संघर्षावर आपल्या कथांच्या माध्यमातून प्रकाश टाकून ग्रामीण भागातील वास्तव दर्शन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आनंदघनने रसिक-श्रोते मंत्रमुग्ध
राष्ट्रीय गायिका, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावरील एक तासाच्या आनंदघन कार्यक्रमाने रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गीतास श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात साथ देत गीतावर ठेकाही धरला होता. आर्कि. जयेश आपटे व आनंदी या जोडीने आनंदघन ही स्क्रिप्ट तयार केली. ती ऋतुरंगच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सादर केली.

      – मुकुंद बाविस्कर

Dr. Tara Bhawalkar unveils the secrets of folklore at Savana Book Festival
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago