जीवनाची सुरुवात कशी झाली? याविषयी विज्ञान विशिष्ट प्रकारची मांडणी करते. त्यानुसार एकपेशीय जीवापासून सुरू झालेली ही सृष्टी पुढे विविधरंगी, विविधस्वरूपी बनत गेली. या सगळ्यात एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे, ती म्हणजे दोघं एकत्र आल्याशिवाय तिसर्याचा जन्म होत नाही! जीवसृष्टी म्हणजे आपण राहतो, वावरतो, पाहतो, अनुभवतो ते जग होय. या जगालाच ’दुनिया’ असंही म्हटलं जातं. या जगाला ’दुनिया’ का म्हटलं गेलं असेल? हा खरंतर आपली उत्सुकता चाळविणारा प्रश्न आहे.
ढोबळमानाने दोघांनी निर्माण केलेलं किंवा दोघांमुळे निर्माण झालेलं जग म्हणजे ’दुनिया’ होय. असं मानण्यास पुष्कळसा वाव आहे. ’दु’ म्हणजे दोन आणि ’निया’ म्हणजे निर्मिती अशा अर्थाने दोघांपासून झालेली निर्मिती म्हणजे ’दुनिया’ असं आपण समजू शकतो. याचा अर्थ दुनिया आपल्याला द्वैत सांगते. दुनियेच्या या द्वैतामधलं द्वंद्व मोठं गंमतीशीर आहे. या द्वैतामध्ये दोन परस्परपूरक अशी तत्त्वे अस्तित्वात आहेत की, जी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत आणि ती एकमेकांसह कायमसाठी रहातही नाहीत. म्हणजे थोडक्यात, तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना! असंच काहीसं… मात्र, जेव्हा ती एकमेकांशी संपूर्ण एकरुप होतात, तेव्हा त्यातून तिसर्याचं निर्माण होतं.
विज्ञानाच्या सिद्धान्तानुसार स्त्री आणि पुरुष हे दोघे या दुनियेचे मूळ निर्माते आहेत. या दोघांपासूनच सर्व दुनिया निर्माण झाली आणि होतेय. सृष्टीतील सर्व प्रकारचे प्राणी अगदी कोणताही जीव, जंतू, कीटक, पशू, पक्षी, वृक्ष, लता, वेली, झाडे, झुडपे आणि माणसे या सर्वांची निर्मिती स्त्री-बीज आणि पु-बीज यांच्या संपूर्ण मीलनातूनच होते, हे विज्ञानानं सप्रमाण सिद्ध केलं आहे. या दुनियेत जसा राम असतो तसाच रावणही असतो. इथं रामाच्या विरुद्ध रावणाचं अस्तित्व आवश्यकच असतं. रावणाशिवाय रामलीला पूर्ण होत नाही. इथं कृष्णासोबत कंस, नृसिंहासोबत हिरण्यकश्यपू, खुदासोबत इब्लिस आणि जीझससोबत सैतानाचं अस्तित्व आवश्यक असतं. इथं कौरवांशी लढायला पांडवांची गरज असते.
मानवाला देवाचं माहात्म्य कळावं यासाठी दानवांचंही अस्तित्व लागतं. कुणा एकाचं महत्त्व दुसर्याच्या अस्तित्वाशिवाय महत्त्वाचं ठरत नाही. काळ्या फळ्यावर पांढर्या खडूने अक्षरं लिहावी लागतात. शुभ्र पांढर्या कागदावर लिहायला निळी-काळी शाईच वापरावी लागते. काळ्या फळ्यावर कोळशानं लिहिता येत नाही! हे दुनियेतलं द्वंद्व आहे. त्यालाच ’दुनियादारी’ या गोंडस नावानं ओळखलं जातं.
ही दुनियादारी करताना ज्ञानाला अज्ञानाशी दोन हात करावेच लागतात. आपल्या विद्येचं शस्त्र पाजळावं लागतं. इथं उजेडाला अंधाराच्या पाठी-पोटी उभं राहून उजळावं लागतं. रात्रीमागून दिवसाचा अव्याहत पाठलाग इथं सुरूच असतो. इथं वाईटासोबत चांगल्यालाही शिव्या दिल्या जातात आणि चांगल्याइतकंच वाईटाचंही समर्थन केलं जातं. ही दुनिया अशीच आहे. इथं समर्थनासाठी ओव्या गायल्या जातात तसंच विरोधासाठी शिव्याही दिल्या जातात. संपूर्ण जगाची वाटचाल आजवर अशाच रीतीनं झाली आहे. जगातली कोणत्याही काळातली कोणतीही व्यवस्था संपूर्णपणे चांगली किंवा वाईट होती असं ठामपणे म्हणता येत नाही. इथं कधी चांगल्याचं वाईटावर तर कधी वाईटाचं चांगल्यावर राज्य सुरू असतं.
सतत फक्त शुभ आणि मंगल बोलणार्याला इथं लाभ मिळत नाही. मात्र, अशुभ आणि अमंगल बोलणार्याला लाभाचा वाटा बिनबोभाट मिळू शकतो. जो जितकं अधिक खोटं बोलू शकतो, जो इतरांना अधिक फसवू शकतो, तो अधिक लुटू शकतो. या लुटीतून त्याला अधिक मोठा नफा मिळताना दिसतो. प्रामाणिक व खर्या माणसाला असा नफा मिळवता येत नाही असं अनेकदा दिसून येतं. इथल्या यशस्वी लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. सेवा करतो! असं म्हणणारेच खरा मेवा खात असतात. पोषण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच शोषण करीत असतात. इथलं कुंपणच शेत खातं. रक्षकच भक्षक बनतात. इथला चौकीदार चोरीदेखील करीत असतो. ग्राहकराजा, मतदारराजा असं म्हणत सामान्य माणसाची इज्जत इथं सहजपणे लुटली जाते. कुणाला तरी श्रीमंत होता यावं म्हणून इथं कुणाला तरी गरिब व्हावंच लागतं. इथं कुणाला तरी मालक व्हायचंय म्हणून कुणाला तरी कामगार व्हावं लागतं. कुणाला तरी मोठं व्हायचंय म्हणून इतरांना छोटं व्हावं लागतं! हीच आहे दुनियादारी! ती अनेकांना समजत नाही. आपल्याला दुनियादारी कळली आहे. अशा भ्रमात माणसं जगण्याच्या रस्त्यावर क्षणोक्षणी मरत असतात!
कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजात सुरू असलेल्या दुनियादारीवरूनच ठरत असते. समाजात होणारे केवळ वरवरचे बदल अशावेळी पुरेसे ठरत नाहीत. देश, प्रदेशातील परिस्थितीचे अचूक आकलन होणे आवश्यक असते. तसे ते झाले, तर समाज अधिक प्रगल्भ, निकोप आणि एकसंध होण्यासाठी उपयुक्त अशा विविध संधी निर्माण होऊ शकतात. अर्थात, समाजातल्या सामाजिक विषमतेवर बोट ठेवताना, केवळ दोष दाखवणं पुरेसं ठरत नाही. दुनियादारीतील द्वंद्वाची अर्थात, व्यवस्थेतील त्रुटींची मांडणी करीत असतानाच त्या त्रुटी दूर करून सुधारण्याचा मार्ग शोधणं हे आपल्या सर्वांचं सामुदायिक दायित्व असायला हवं. सामान्य जनतेच्या मनात आहे, तेच राज्यकर्त्याच्या ध्यानात असलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते दिसलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं छोटं-मोठं उत्तरदायित्व आपण किमान आपल्यापुरतं प्रामाणिक राहून निभावलं पाहिजे. कामगार आहेत म्हणून मालक आहेत. खूप लोकं गरीब आहेत, त्यांच्या उत्थानाची कामं करता यावीत यासाठी सरकारकडे मोठ्या अधिकाराची पदं आहेत. लोकं दुर्बल आणि असुरक्षित आहेत म्हणून सरकारकडे त्यांच्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी आहे. असं आपलं संविधान स्पष्टपणे सांगतं. या पार्श्वभूमीवर द्वैतामधली दोन्ही तत्त्वं परस्परांना पुरक असतात; मारक नव्हे! हे आपण पुन्हा एकदा नव्यानं समजून घेतलं पाहिजे. आपल्याला द्वैताच्या द्वंद्वाकडून अद्वैताकडे जायला हवं.
इतिहासातील चुकांची जुनी मढी उकरून आपलाच वर्तमान क्रूरपणे पोखरण्यात कोणता पुरुषार्थ आहे? याचा विचार आपण सजगपणे करायला हवा. या दुनियादारीत आपले पाय घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर किमान एवढं तरी शहाणपण आपल्याकडे असायलाच हवं. हेच शहाणपण आपल्याला एक दिवस अद्वैताकडे नक्कीच घेऊन जाईल!
Duniyadari: From duality to non-duality!
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik