गेल्या चार वर्षांपासून मी एका आयटी कंपनीमध्ये काम करत आहे. 25 वर्षांच्या करिअरमध्ये प्रथमच या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. पण काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – सेवा पुरवणारी कंपनी कर्मचार्याला कमी पगार देते, मात्र त्या कर्मचार्याच्या कामातून बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड नफा कमावतात.
भारत दरवर्षी जगातील सर्वोत्तम अभियंते घडवतो. आयआयटी, एनआयटी आणि हजारो खासगी महाविद्यालयांतून दरवर्षी लाखो विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी घेऊन बाहेर पडतात. पण यातील मोठा वर्ग परदेशी आयटी कंपन्यांसाठी, थेट किंवा भारतीय सेवा कंपन्यांमार्फत काम करतो.
ही व्यवस्था साधी आहे – अमेरिकन आणि युरोपियन कंपन्या भारतात काम आउटसोर्स करतात, कारण येथे कुशल मनुष्यबळ कमी खर्चात उपलब्ध आहे. आपण त्यांच्यासाठी कोड लिहितो, त्यांचे क्लाऊड व्यवस्थापन करतो, डेटा सुरक्षित ठेवतो आणि ग्राहक सेवा हाताळतो. आपण त्यांच्या वेळेनुसार काम करतो, त्यांच्या सुट्ट्या पाळतो, त्यांची डेडलाईन पूर्ण करतो आणि त्यांच्या अटी मान्य करतो.
पैसा भारतात येतो, हे खरे आहे. पण उत्पादनाचे हक्क, बौद्धिक संपदा (खझ), ट्रेडमार्क आणि दीर्घकालीन संपत्ती मात्र त्यांच्याकडेच राहते.
याचा परिणाम आपल्या कामाच्या संस्कृतीवरही होतो. अमेरिकन वेळेनुसार रात्री काम करणे, क्लायंट नेहमी बरोबर ही मानसिकता आणि सततच्या डिलिव्हरीचा दबाव आता सामान्य झाला आहे. भारतीय सणांपेक्षा ‘थँक्सगिव्हिंग कॉल’ महत्त्वाचे वाटू लागले आहेत. आपल्या सर्वोत्तम अभियंत्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या व्यवसायांना अधिक सक्षम बनवण्यात वापरली जाते; आपल्या देशातील समस्या सोडवण्यात नाही.
खरा प्रश्न असा आहे – जर आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे, तर भारतातून जागतिक दर्जाच्या उत्पादनाधारित कंपन्या का उभ्या राहत नाहीत? आपण स्वतःचे ब्रँड आणि तंत्रज्ञान का निर्माण करत नाही? एवढी मोठी लोकसंख्या, प्रचंड बाजारपेठ आणि अब्जाधीश असतानाही आपण अजूनही इतर देशांवर का अवलंबून आहोत?
उत्पादनाधारित कंपनी उभारण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक, संशोधन आणि धोका पत्करण्याची तयारी लागते. पण आपल्या व्यवस्थेत अजूनही सुरक्षित सेवा व्यवसायाला प्राधान्य दिले जाते; संशोधन आणि नवकल्पनांना नाही.
हेही तितकेच खरे आहे की, आयटी क्षेत्रामुळे भारतात मोठा बदल झाला. पुणे, हैदराबाद, बंगळुरू यांसारखी शहरे आयटीमुळे विकसित झाली. लाखो कुटुंबे मध्यमवर्गात आली. पण हे विकासाचे मॉडेल अजूनही परावलंबी आहे. आपण जगाचे बॅक ऑफिस आहोत; बोर्डरूम नाही.
खरी प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा आपण फक्त इतरांसाठी काम करणे थांबवून स्वतःसाठी आणि जगासाठी निर्माण करायला सुरुवात करू. त्यासाठी डीप-टेक क्षेत्रात अधिक निधी, मजबूत बौद्धिक संपदा कायदे, स्टार्टअप्सना सरकारी पाठबळ आणि अपयशाकडे सन्मानाने पाहणारी संस्कृती आवश्यक आहे. आज आपण भारतात राहून परदेशासाठी काम करतो आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर देश अधिक वेगाने प्रगती करताना पाहतो. प्रतिभा आपली आहे मग संपत्तीही आपलीच असली पाहिजे.
गेल्या 30 वर्षांपासून भारताला जगाचे आयटी बॅक ऑफिस म्हटले जाते. आपण अमेरिकेसाठी कोड लिहितो, ब्रिटनसाठी सर्व्हर व्यवस्थापित करतो आणि युरोपसाठी ग्राहक सेवा सांभाळतो. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या कंपन्यांनी भारताचा अभिमान वाढवला. त्यांनी पुणे, बेंगळुरू यांसारखी शहरे उभी केली आणि परकीय चलन भारतात आणले.
मात्र आपण परदेशी कंपन्यांसाठी काम करतो तेव्हा उत्पादनांचे हक्क, ट्रेडमार्क आणि मालकी त्यांच्याकडेच राहते. आता वेळ आली आहे- आपण स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या कंपन्या उभ्या कराव्यात.
आपल्याकडे प्रतिभा आहे. 140 कोटींची बाजारपेठ आहे. यूपीआय आणि डिजिटल पायाभूत सुविधा आहेत, ज्याचा जग हेवा करतो. फक्त एक गोष्ट कमी आहे- स्वतःसाठी निर्माण करण्याची मानसिकता.
इतरांच्या कंपन्यांसाठी काम केल्याने पुढची 30 वर्षे आपली बिले भरली जातील; पण स्वतःच्या तंत्रज्ञान कंपन्या उभारल्या, तर पुढील 100 वर्षे आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होईल.
Other countries stand on your talent
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik