एक हजार 45 अधिकारी-कर्मचारी नियुक्त
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत 24 वर्षांपासून नोकरभरती न झाल्याने प्रशासनाला गरज भागविण्याकरिता मानधनावर अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करावी लागत आहे. दरम्यान, सध्याच्या स्थितीत महापालिकेत एक हजार 45 अधिकारी व कर्मचार्यांना मानधनावर नियुक्ती दिलेली असल्याचे समोर आले आहे. या कर्मचार्यांवर दरमहा दोन कोटी 12 लाखांंचा खर्च होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
नाशिक महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात 2022 ते 2026 या कालावधीत 633 अधिकारी-कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली. 346 बदल्या झाल्या. आस्थापना खर्चात वाढ झाली असून, 2024-25 मध्ये 42.94 कोटी असलेला खर्च 2025-26 मध्ये 51.31 कोटींवर पोहोचला आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर आर्थिक ताण वाढत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अ वर्गातील 12, ब वर्गातील 17, क वर्गातील 594 आणि ड वर्गातील 10 अशा एकूण 633 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच कालावधीत आस्थापना विभागामार्फत 346 बदल्या करण्यात आल्या. नियमानुसार एकाच विभागात साधारण तीन वर्षांनंतर बदली करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांना सहा महिन्यांपर्यंत तात्पुरत्या नियुक्त्या करण्याचा अधिकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या कालावधीत केवळ एका अधिकार्याला मान्यताप्राप्त दिनांकानुसार पदोन्नती देण्यात आली आहे. कुंठीत वेतनश्रेणीसाठी आश्वासित प्रगती योजना समिती स्थापण्यात आली आहे. पात्र कर्मचार्यांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत.
Expenditure of two crores on employees on honorarium