पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली
नाशिक : प्रतिनिधीं
संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत काटेकोर जलनियोजन करण्यासाठी धरणांमध्ये 10 टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. महापालिका क्षेत्रात तूर्तास पाणीकपात लागू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने नाशिककरांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी आगामी काळात 10 टक्के कपात अटळ असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची गरज, जनावरांसाठी पाणी आणि शेतीसाठी आवश्यक आवर्तने यांचा समतोल राखत पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी आपल्यासाठीच आहे. त्यामुळे त्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गंगापूर धरण समूहातून रब्बी व उन्हाळी हंगाम प्रत्येकी दोन आवर्तने देण्यात येतील. उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन हे मे महिन्यात देण्यात येईल. पाणी उपलब्धतेनुसार पाचव्या आवर्तनाचा विचार केला जाणार आहे. कडवा धरण कालव्यातून रब्बी हंगामासाठी 22 दिवसांचे एक आवर्तन देण्यात येईल. ओझरखेड, तिसगाव प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी एक आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीकपात लागू करू नये, असा सूर उमटला. मात्र, पुढील नऊ महिने पाणी पुरवावे लागणार असल्याने शासनाच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच धरणांत 10 टक्के पाणी राखीव ठेवले जाईल.
महापालिकेत आज आढावा बैठक
शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज, शनिवारी (ता. 28) महापालिकेत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. संभाव्य दुष्काळ लक्षात घेता पाणीचोरी रोखणे, पाणीगळती थांबवणे आणि नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी महापालिका अधिकार्यांचे कान टोचले. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून काटकसर करावी, असे आवाहन त्यांनी केले.
गंगापूर धरणातील आवर्तनाचे वेळापत्रक
पहिले आवर्तन : 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर
दुसरे आवर्तन : 20 जानेवारी ते 8 फेब्रुवारी
तिसरे आवर्तन : 26 मार्च ते 14 एप्रिल
चौथे आवर्तन : 15 जून ते 4 जुलै
Four rounds of water release from the Gangapur dam complex for agriculture