लोणवाडे शिवारातील गोडावूनला भीषण आग

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडावूनमधील प्लास्टिक वेस्टेज (भंगार) माल जळून खाक झाला. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाने चार बंबांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या तत्परतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यात यश आले आहे. शेजारील मालमत्तांचे नुकसान टळले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 7.40 वाजेच्या सुमारास लोणवाडे शिवारातील चाळीसगाव फाटा परिसरात मो. सगीर मो. जाहिद यांच्या मालकीच्या प्लास्टिक गोडावूनला आग लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ मुख्य अग्निशमन केंद्रातून दोन अग्निशमन वाहनांसह जवानांना घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीची तीव्रता आणि परिसरातील इतर मालमत्तांना असलेला धोका लक्षात घेऊन मुख्यालयातून आणखी दोन अग्निशमन बंब व कर्मचारी बोलावण्यात आले. अग्निशमन जवानांनी होजपाइपच्या सहाय्याने पाण्याचा मारा
सुरू केला.
समन्वयाने आणि वेगाने केलेल्या प्रयत्नांमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे शेजारील मालमत्तांपर्यंत आग पसरण्यापूर्वीच ती आटोक्यात आणता आली.
या आगीत गोडावूनमधील प्लास्टिक वेस्टेज मालाचे नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे परिसरातील इतर मालमत्ता सुरक्षित राहिल्या. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही.

Major fire at a warehouse in the Lonwade area

 

आगीचे कारण समजले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *