निफाडला द्राक्ष, डाळिंबासाठी फळपीक विमा योजना लागू

कृषी अधिकारी पवार : शेतकर्‍यांना पिकांचा विमा काढण्याचे आवाहन

निफाड : विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना 2026 -27 अंतर्गत फळपीक विमा योजना लागू केली आहे. हवामानातील अचानक होणारे बदल, अवेळी पाऊस, कमी तापमान, गारपीट तसेच शासनाने अधिसूचित केलेल्या हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता, शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेऊन फळबागेला आर्थिक संरक्षण देणे आवश्यक आहे. म्हणून द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांनी द्राक्ष, डाळिंब पिकाचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.
द्राक्ष पिकासाठी प्रतिहेक्टरी 3 लाख 80 हजार विमा संरक्षित रक्कम असून, शेतकरी हिस्सा प्रतिहेक्टरी 19 हजार रुपये आहे. द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान व गारपीट या प्रमुख हवामान जोखमींचा समावेश केला आहे. गारपीट जोखमीसाठी प्रति हेक्टरी 1 लाख 27 हजारांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. द्राक्ष पिकासाठी हवामान संरक्षण कालावधीत अवेळी पाऊस 15 ऑक्टोबर 2026 ते 30 एप्रिल 2027, दैनंदिन कमी तापमान 1 डिसेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 आणि गारपीट 1 जानेवारी 2026 ते 31 मे 2027 या कालावधीचा समावेश आहे.
डाळिंब पिकासाठी प्रति हेक्टरी 1 लाख 60 हजार विमा संरक्षित रक्कम असून, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी 12 हजार रुपये आहे. डाळिंबासाठी अधिसूचित केलेल्या हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देण्यात आले आहे. गारपीट जोखमीसाठी प्रति हेक्टरी 53 हजारांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

फळबागेच्या सुरक्षिततेची गुंतवणूक

फळपिकांचे उत्पादन घेण्यासाठी होणारा खर्च, मजुरी, औषधे, खते, सिंचन, छाटणी आणि इतर व्यवस्थापन खर्च मोठा असतो. त्यामुळे नुकसान झाल्यावर मदत मिळेल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा नुकसान होण्यापूर्वीच फळबागेचे विमा संरक्षण करणे अधिक शहाणपणाचे आहे. विशेषतः निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष व डाळिंब उत्पादन होत असल्याने हवामान जोखमींपासून संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकर्‍यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे.

फळपीक विमा का महत्त्वाचा..?

द्राक्ष व डाळिंब ही जास्त खर्च, जास्त जोखीम आणि हवामानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली फळपिके आहेत. फळबाग उभी करण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत व मोठी आर्थिक गुंतवणूक करतो; मात्र काढणीच्या तोंडावर झालेला अवेळी पाऊस, गारपीट किंवा तापमानातील प्रतिकूल बदल यामुळे काही तासांत संपूर्ण उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत फळपीक विमा हा शेतकर्‍यांसाठी आर्थिक आधार ठरतो. विमा काढल्यामुळे अधिसूचित हवामान जोखमीमुळे नुकसान झाल्यास योजनेच्या नियम व निकषांनुसार नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत आणि उत्पादनावरील आर्थिक जोखीम काही प्रमाणात कमी करण्यासाठी फळपीक विमा महत्त्वाचा आहे.

Fruit crop insurance scheme implemented for grapes and pomegranates in Niphad.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *