13 रिकाम्या टाक्यांसह साहित्य जप्त
सिडको : प्रतिनिधी
नांदूरगावातील वृंदावननगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून रिक्षांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात असल्याचा प्रकार पुरवठा विभागाच्या कारवाईत उघडकीस आला. या कारवाईत 13 रिकाम्या गॅस टाक्या, गॅस भरण्याचे मशिन, वजनकाटा, नळ्या आणि नोझल असा एकूण 55 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास पुरवठा निरीक्षक वेदांत कपोते यांनी वृंदावननगरमधील प्लॉट क्रमांक 17 येथे कारवाई केली. या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. शेडची तपासणी केली असता गॅस सिलिंडरमधून रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
या ठिकाणी आढळलेल्या सचिन संतोष काजळकर (वय 24, रा. वृंदावननगर, नांदूरगाव) याच्याकडे चौकशी केली असता, मशिनच्या सहाय्याने सिलिंडरमधून रिक्षांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच शौकत सय्यद हा त्याला गॅस सिलिंडर पुरवत असल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रिक्षांमध्ये प्रतिकिलो 130 रुपये दराने गॅस भरला जात असल्याचा आरोप आहे.
कारवाईत 2,200 रुपये किमतीच्या 13 रिकाम्या गॅस टाक्या, 20 हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे मशिन, दीड हजार रुपये किमतीच्या दोन नळ्या व दोन नोझल आणि पाच हजार रुपये किमतीचा वजनकाटा असा एकूण 55 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक वेदांत कपोते यांच्या फिर्यादीवरून सचिन काजळकर आणि शौकत सय्यद यांच्याविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक राठोड
करीत आहेत.
Illegal gas filling in auto-rickshaws exposed in Nandurgaon.