नाशिक

चौथ्यांदा इंधन दरवाढ, महागाई वाढीची भीती

पेट्रोल 2.61, डिझेल 2.71 रुपयांनी महाग

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन आठवड्यांत पेट्रोल व डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक, व्यापारी तसेच वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. ताज्या दरवाढीनुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये, तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. या सततच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवाढीनंतर नाशिक शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी इंधनसाठा संपल्यामुळे पंप तात्पुरते बंद ठेवावे लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी दरवाढ किंवा संभाव्य इंधनटंचाईबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक वाहनधारक अतिरिक्त इंधन भरून घेत असल्याने पंपांवरील गर्दीत अधिक वाढ झाली आहे.
प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात काही पंपांवर पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
इंधन कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आगाऊ रक्कम भरणार्‍या विक्रेत्यांना नियमानुसार पुरवठा केला जात आहे. मात्र, पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे वेगळे आहे. आगाऊ पैसे भरूनही टँकर वेळेवर पोहोचत नसल्याने अनेक पंप ड्राय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
एका पंपावर इंधन संपल्याची माहिती परिसरात पसरताच वाहनधारक इतर पंपांकडे धाव घेतात. परिणामी त्या पंपांवरही अचानक मोठी गर्दी होते आणि उपलब्ध साठा कमी वेळेत संपतो. सोशल मीडियावर पंप बंद असल्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाहतूकदार संघटनांनीही या दरवाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. डिझेल महागल्याने मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम भाजीपाला, फळे, धान्य, बांधकाम साहित्य आणि इतर वस्तूंच्या बाजारभावांवर होणार आहे. कृषी क्षेत्रातही शेतमाल वाहतूक, सिंचन आणि कृषी यंत्रसामग्रीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक खर्च वाढल्याने पुरवठा साखळीतील सर्व घटकांवर त्याचा परिणाम होतो आणि अखेरीस किरकोळ बाजारातील वस्तू महाग होतात. त्यामुळे आगामी काळात महागाईचा दर आणखी वाढू शकतो. प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन केले आहे. नियमित व वेळेवर इंधनपुरवठा होणे आवश्यक असल्याचे मत पेट्रोलपंप चालकांनी व्यक्त केले.

गेल्या 15 दिवसांतील इंधन दरवाढ
तारीख            पेट्रोल दरवाढ                   डिझेल दरवाढ
15 मे 2026          3.13                                3.10
19 मे 2026         0.91                                0.94
23 मे 2026        0.90                                0.95
25 मे 2026        2.61                                 2.71

एकूण वाढ : पेट्रोल : सुमारे 7.67 प्रति लिटर
डिझेल : सुमारे 7.80 प्रति लिटर

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आडगावला तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न

मिसफायरमुळे अनर्थ टळला पंचवटी : प्रतिनिधी आडगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळील पुलाखाली रविवारी (दि. 18)…

6 minutes ago

सिन्नर आगारात ‘हिरकणी’ बसला आग

डिझेल पंपाजवळच थरार! रात्री रस्त्यात बंद पडली, सकाळी डेपोत पेटली सिन्नर : प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या…

12 minutes ago

देवळालीगावात बोहड्यातील रेणुकामाता देशमुख वाड्यात

सुमारे 100 वर्षांची परंपरा जोपासत आहेत भाविक नाशिकरोड : एस. आर. सुकेणकर एकेकाळी देवळालीगाव बारा…

20 minutes ago

गोदाकाठी घुमणार 501 शंखवादकांचा ‘शंखनाद’

नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 25 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजता गोदाकाठी अनंत…

28 minutes ago

त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावरील ध्वजस्तंभावरून वाद

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच सुरक्षेची धाकधूक; 24 तास खडा पहारा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर…

44 minutes ago

गांधीनगरमध्ये होणार 65 फुटी रावणाचे दहन

सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…

1 hour ago