अपक्ष म्हणून निवडणूक जिंकणारे आतापर्यंत दुसरेच
नाशिक : गोरख काळे
पहिल्या दिवसापासूनच प्रचंड आत्मविश्वास, विजय आपलाच, ही भावना व अंतर्गत यंत्रणेच्या बळावर नाशिक विधान परिषद निवडणुकीचे मैदान अखेर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी मारलेच. महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या हक्काची तब्बल दोनशेहून अधिक मते फोडण्यात मिळवलेले यश, यासह विरोधकांची एकगठ्ठा दीडशे मते आदींच्या जोरावर गोकुळ गिते विधान परिषदेत पोहोचले. दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात दुसर्यांदाच असे घडलेे की, अपक्ष उमेदवाराने आघाडी किंवा महायुती उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. यापूर्वी दिवंगत शांतारामतात्या आहेर यांनी हा चमत्कार केला होता. नरेंद्र दराडेंचा पराभव शिंदेसेनेसाठी धक्कादायक असून, यामुळे महायुतीमधील बेबनाव उघड झाला आहे.
नाशिक विधान परिषदेची जागा शिंदेसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली होती. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी लक्ष घालूनही 109 मतांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव होत असेल तर शिंदेसेनेला यावर आत्मचिंतन करावे लागणार आहे. महायुतीच्या मतदारांनी नरेंद्र दराडे यांना का नाकारले, याची कारणे शोधली जात आहेत. नाशिकच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रारंभी नाशिकच्या जागेसाठी भाजपने ओढाताण केली; परंतु लोकसभेप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेने जागावाटपात अखेर नाशिकची जागा मिळवली. पक्षाने 2018 मध्ये विजयी झालेले माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र, याचवेळी पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. नांदगावचे आ. सुहास कांदे हे त्यांच्या पत्नीसाठी आग्रही होते, तर पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचीदेखील विधान परिषदेसाठी तयारी होती. मात्र, ज्यावेळी दराडे यांनी शिवसेना उबाठा पक्ष सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. दराडेंना उमेदवारी दिल्यावरही पक्षातील अंतर्गत खदखद होतीच. शिवाय दराडे हे पाच वर्षांत कुठेच नव्हते, अशा प्रकारचे नॅरेटिव्ह महायुतीच्याच काही मतदारांनी यशस्वीरीत्या केले. 2018 ला निवडून आल्यानंतर दराडेंनी मतदारांकडे लक्षच दिले नाही, अशी कुजबुज होती. हाच मुद्दा गोकुळ गिते यांनी पहिल्या दिवसापासून लावून धरला. त्यांच्या या भूमिकेला भाजपसह शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील काही मतदारांनी छुपा पाठिंबाही दिला. त्यातच दराडेंंचे मागील काही वर्षांत ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याशी झालेले राजकीय वैर, ते पाहता ते कितपत त्यांना मदत करतील यावरून प्रारंभी साशंकता होती. पराभवानंतर दराडेंनी तर येवल्यातून आपल्याला मतदान झाले नसल्याचे सांगत मंत्री भुजबळांवर आरोप केले. असे असले, तरी आ. कांदे व दराडेंमध्येदेखील अंतर्गत संघर्षाची चर्चा होती. कांदे यांच्याकडे मनमाड, नांदगाव नगरपालिका एकहाती ताब्यात आहे. यासह नाशिक मनपातील काही नगरसेवक आ. कांदे यांच्या गोटातले असून, त्यांनी कोणाला मते दिली यावरूनदेखील चर्चा सुरू आहे. दराडे कुटुंबीयांनी तर पक्षातीलच काहींनी घात केल्याचा निकालानंतर आरोप करून टाकला. दराडेंविरोधात स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय मतदारांचा तीव्र विरोध होता. शिंदेसेनेच्या नगरसेवकांचीही मते फुटली, असा दावाच भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवला असला, तरी त्यापूर्वीच त्यांच्या महायुतीसह महाविकास आघाडी, मालेगावातील इस्लाम पार्टी, एमआयएम, अपक्ष आदी सर्वांच्या भेटीगाठी झालेल्या होत्या. त्या तुलनेत दराडे कमालीचे मागे राहिले. त्याचाच फटका त्यांना बसला.
…अन् तेथेच दराडे फसले
गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी, याकरिता मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे यांनी सलग तीन-चार दिवस जोर लावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील गिते यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर गिते यांनी प्रचारातून माघार घेत असल्याची भूमिका जाहीर केली. पण त्याचवेळी त्यांनी नरेंद्र दराडेंना समर्थन देण्याचे टाळले. गितेंनी प्रचार थांबवला; आपला विजय सहज, या भ्रमात दराडे राहिले. पण गोकुळ गिते यांच्या यंत्रणा गुप्तपणे प्रचार करत होत्या. ही बाब अखेरच्या क्षणी दराडेंच्या लक्षात येताच दगाफटका टाळण्यासाठी महायुतीच्या मतदारांना त्यांनी ठाण्याकडे हलवले, पण तोवर उशीर झाल्याने त्याचे रूपांतर त्यांच्या पराभवात झाले.
मतदारांचा दराडेंवर रोष
महायुतीची दोनशे प्लस मते थेट गोकुळ गितेंकडे वळ्ली अन् तेथेच नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला. दराडेंविरोधात मतदान जाण्याचे मुख्य कारण म्हणजे, आमदार असताना मतदारांशी न ठेवलेला संवाद, नाशिकसह जिल्ह्यातील कोणत्याही मतदाराला न मिळालेला विकासनिधी यामुळे महायुतीच्या मतदारांत अखेरपर्यंत त्यांच्याविरोधात नाराजी दिसली.
Gokul Gite has proven himself; he has conquered the Nashik arena!
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…