महापालिकेचे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा दावा
सिडको : प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळेनगरदरम्यान रस्त्याच्या दुभाजकांत महापालिकेने लावलेल्या विदेशी प्रजातीच्या 55 झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, या सहा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
या प्रकरणी महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अभिमन काशीनाथ खैरनार आणि त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी पहाटे दोन ते पावणेतीनच्या सुमारास जेहान सर्कल ते बेंडकुळेनगर या रस्त्यादरम्यान हा प्रकार घडला. रस्त्याच्या दुभाजकांत सावली आणि सुशोभीकरणासाठी महापालिकेने लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) या विदेशी प्रजातीची 55 झाडे विनापरवाना तोडण्यात आली. या झाडांची कत्तल करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच रस्त्याचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अभिमन काशीनाथ खैरनार (37), दिलीप सदू बेंडकुळे (34), दीपक संतोष दाते (25), रोहिदास पांडुरंग खुरखुटे (45), अर्जुन दत्तू चारोस्कर (38) आणि मच्छिंद्र विजय देशमुख (44) यांना अटक केली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलमांसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम 2021, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.
नाशिक शहरासह उपनगरी भागातील अतिशय मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या उत्पादनाच्या मोठमोठ्या जाहिरात लावण्यासाठी स्वतंत्र जाहिरात एजन्सी आहे. कंपनीकडून लाखो रुपयांची किंमत घेऊन हे मोठमोठे होर्डिंग्ज बॅनर लावले जातात.
मात्र, या जाहिरातीच्या होर्डिंग्ज, बॅनर समोर अडथळे येत असणार्या झाडांवर रात्री-अपरात्री सरळसरळ अनधिकृत कुर्हाड चालविली जात असल्याचा प्रकार हा नित्याचा झाला असून, नंदिनी नदीपात्रात तसेच नदीलगत उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जला अडथळे ठरणार्या झाडांची अनेक वेळा कत्तल झाल्याची तक्रार वृक्षप्रेमींसह पर्यावरणप्रेमींनी केली आहे. बेकायदेशीर आणि विनापरवानगी वृक्षतोड करणार्या या जाहिरात एजन्सीवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Six arrested for sacrificing trees for a hoarding.