येवल्यात गावठी कट्ट्यासह 16 लाखांवर मुद्देमाल हस्तगत

आंतरजिल्हा गावगुंडांची टोळी जेरबंद

येवला : प्रतिनिधी
खुनाची सुपारी घेऊन जीवघेणी मारहाण करणार्‍या आंतरजिल्हा गावगुंडांच्या टोळीला येवला तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, कोयत्यांसह 16 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू केल्याने जिल्हा हद्दीत नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन, सराईत गुन्हेगारांची वारंवार तपासणी आदी सुरू होते. येवला तालुक्यातील सोमठाणदेश ग्रामस्थांनी 12 ऑक्टोबरला दुपारी साडेचारच्या सुमारास पोलीस ठाण्यात कळविले की, गावातील गौरव दत्तू सोनवणे व त्यांच्या कुटुंबीयांना शेतीच्या वादातून बाहेरील आठ ते 10 गुंडांकडून जबर मारहाण झाली आहे व मारहाण करणार्‍या व्यक्ती चारचाकी वाहनाने कोपरगावच्या दिशेने जात आहेत. माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांचे पथक तत्काळ रवाना झाले. तालुक्यातील धुळगाव शिवारात पोलिसांना संबंधित दोन वाहने भरधाव येताना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, ते न थांबता येवल्याचे दिशेने गेल्याने पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करून दोन्ही वाहने शहरातील येवला- कोपरगाव रोडवर अडवून त्यातील राजेंद्र सुधाकर जगताप (वय 27, रा. करंजगाव) , विलास बबन आयनर (33, रा. अमळनेर), प्रमोद कचरू सोनवणे (30), हरिहर भागीरथ औटे (23, रा. वाटापूर), अक्षय अशोक राजळे (23, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी), शरद निवृत्ती चोपडे (41, रा. वाटापूर), साहिल मेहताब शेख (19, रा. खेडवे परमानंद), प्रदीप माणिक वायकर (26, रा. तामसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) आदी आठ संशयितांना ताब्यात घेतले, तर दोन जण पळून गेले. जखमी फिर्यादी गौरव दत्तू सोनवणे (रा सोमठाणदेश, ता. येवला) व प्रमोद कचरू सोनवणे (वय 30, रा. वाटापूर ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांच्यात वडिलोपार्जित शेतीवरून वाद झाल्याने प्रमोद सोनवणे याने अहिल्यानगरमधील 6 ते 7 गावगुंड ज्यांच्यावर विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना प्रमोद सोनवणे याने गौरव सोनवणे व त्याचे कुटुंबीयांस ठार मारण्याची सुपारी दिल्याने त्यांनी फिर्यादीचे घरी जाऊन त्यास ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली; परंतु वेळीच परिसरातील ग्रामस्थ आल्याने नमूद व्यक्तींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे, 2 लोखंडी कोयते,लोखंडी पाईप ,5 लाकडी फावड्याचे नवीन दांडके,01 काळ रंगाची हुंदई वेन्यु चारचाकी(एमएच 17,सीएक्स 8497) व 1 सफेद रंगाची मारुती सुझुकी स्विप्ट चारचाकी ( एमएच 20, बीएन2197), 8 विविध कंपनीची स्मार्ट मोबाईल फोन असा एकूण 16 लाख 11 हजार 450 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *