सिडको विशेष : प्रतिनिधी
वडगाव परिसरातील शंभर
फुटी रोडलगत सादिकनगर भागात टवाळखोर व मद्यपींच्या अड्ड्यांवर इंदिरानगर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई केली. या कारवाईत आठ ते दहा अनधिकृत अड्डे जाळून उद्ध्वस्त करण्यात आले.
सदर ठिकाणी टवाळखोरांनी झोपड्या उभारून दररोज मद्यपान व नशा सुरू ठेवली होती. नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत ही ठोस कारवाई केली. या ठिकाणी अनधिकृतरीत्या उभारलेल्या झोपड्यांमधून अनेकदा गोंधळ व गैरकृत्यांच्या घटना घडत होत्या. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पार पडली. पोलिसांनी स्पष्ट केले की, परिसरातील टवाळखोर व गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी अशी कारवाई नियमितपणे केली जाईल. नागरिकांनी अशा अनाधिकृत अड्ड्यांविषयी माहिती थेट पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.