मराठी नववर्षाचे गुढी उभारून स्वागत

शहरात ठिकठिकाणी स्वागतयात्रांचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी
हिंदू मराठी नववर्षाची गुढीपाडवा या सणाने सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण राज्यभर साजरा केला जातो. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी युगादी, संसर पाडवो आणि चेटीचंड म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत व्हावा, या प्रार्थनेसह गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
मराठी नववर्षाचा गुढीपाडवा सण दारात मांगल्याची गुढी उभारून साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याला सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडुनिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि हार-कडे बांधून तांब्या/धातूचे भांडे बसवले जाते. दुपारी गुढी उतरविली जाते. त्यानंतर गुढीसाठी पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखविला जातो. गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. या चैत्र महिन्यात घरातील कुलाचार, पारंपरिक पूजन आजपासून दि. 19 ते 26 पर्यंत या नऊ दिवसांत देवीचे नवरात्र, रामाचे नवरात्र साजरे केले जाते. याप्रसंगी दुर्गासप्तशती, रामरक्षा आदींचे वाचन, पठण, आरती, नैवेद्य, अभिषेक आदी केले जाते. मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
केले जाते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठा सज्ज झाल्या असून, इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाइल,
फर्निचर, घरे, सदनिका, दुचाकी, चारचाकी वाहने, सोने-चांदी आदी सर्वच क्षेत्रांतील बाजारपेठांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध
ऑफर्स, सूट, गिफ्ट आदी देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात आले आहे. या चैतन्यमयी सणासाठी बाजारपेठांमध्ये तेजीचे वातावरण आहे. मुहूर्त कॅच करीत ग्राहकांचा वाहन खरेदीला पसंती दिली जात असते. मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी अगोदर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. इलेक्ट्रिकल वाहनांना पसंती दिली जात आहे.
मुहूर्तावर सदनिका, शॉप्स आदींची बुकिंग केली जाणार आहे.अनेक बांधकाम व्यावसायिकांनी
ऑफर्स देत ग्राहकांना अ‍ॅमिनिटीज दिल्या असून, इएमआय किंवा इतर भरघोस सूट देण्यात आली आहे.
सोने दरात मोठी दरवाढ होऊनही ग्राहकांचा सोने खरेदीचा सोस कमी झालेला नाही, हेच मुहूर्तावर खरेदी करणार्‍या ग्राहकांकडून दिसून येते.सोन्याने यंदा दीड लाखाहून अधिकचा टप्पा गाठला असून, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी दरात काहीशी घसरण झाली असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने-चांदीचे दागिने आणि वस्तूंना मागणी असल्याचे चित्र आहे.

मिनी गुढीला पसंती

विविध रंग आणि पैठणी, खण आदी मिनी गुढ्यांना बाजारात चांगलीच मागणी असल्याचे चित्र आहे. कार्यालय, देवघरात सहज ठेवता येणारी गुढी खरेदी केली जात आहे.

शहरात शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ठिकठिकाणी मराठी नवीन वर्षाच्या शोभायात्रा निघणार आहेत.

Welcome the Marathi New Year by raising Gudi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *