अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हवाई हल्ले केले, तेव्हा तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता होती. रशिया-युक्रेन युद्ध फेब्रुवारी 2022 भडकले, तेव्हाही महायुद्धाची शक्यता होती. पश्चिम आशियात युद्ध सुरूच असून, युक्रेन-रशिया युद्ध थांबलेले नसताना एका महायुद्धाचा शंख फुंकला जात आहे. फुटबॉलच्या मैदानावरचे हे महायुद्ध आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) या संघटनेच्या अधिपत्याखाली दर चार वर्षांनी विश्वचषक स्पर्धा भरवली जाते. पहिली स्पर्धा 1930 मध्ये उरुग्वेत भरवली होती. दुसर्‍या महायुद्धामुळे 1942 व 1946 चे फिफा विश्वचषक रद्द करण्यात आले होते. तेविसावी विश्वचषक स्पर्धा अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या तीन देशांनी संयुक्तरीत्या आयोजित केली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात तीन देशांनी मिळून संयुक्त आयोजन प्रथमच केले आहे. युक्रेनवर युद्ध लादले म्हणून फिफा व युरोपियन फुटबॉल असोसिएशनने रशियावर बंदी घातली. त्यामुळे पात्रता फेरीत रशियाला खेळता आले नाही आणि त्यांची संधी हुकली. युक्रेनलाही पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. यजमान असल्याने अमेरिका या स्पर्धेत आहेच. इस्रायलला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नसला, तरी इराण पात्र ठरला आहे. इराणचा समावेश स्पर्धेच्या ’जी’ गटात असून, इराणचे तिन्ही साखळी सामने अमेरिकेत होणार आहेत. दि. 15 जून रोजी इराण विरुद्ध न्यूझीलंड सामना लॉस एंजेलिस स्टेडियम, कॅलिफोर्निया येथे होईल. त्यानंतर 21 जून रोजी बेल्जियम विरुद्ध इराण सामना सोफाय स्टेडियम, कॅलिफोर्निया येथे होईल. दि. 26 जून रोजी इजिप्त विरुद्ध इराण सामना सिटल स्टेडियम, वॉशिंग्टन येथे होईल. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे खेळाडूंच्या व्हिसावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे फिफाच्या मंजुरीने इराणने आपले मुख्य शिबिर अमेरिकेतून मेक्सिकोमधील तिजुआना शहरात हलवले. इराणचे खेळाडू केवळ सामन्याच्या दिवशीच चार्टर विमानाने अमेरिकेत प्रवेश करतील आणि सामना संपवून पुन्हा मेक्सिकोला परततील. इराणने बाद फेरीत प्रवेश केल्यास आणि सामने अमेरिकेत होणार असल्यास मेक्सिको ते अमेरिका असा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. बाद फेरीत अमेरिका आणि इराण आमनेसामने आल्यास तणावपूर्ण वातावरणात अत्यंत चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. अर्थात, पुढे सर्वकाही सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. यावेळच्या फिफा विश्वचषकात प्रथमच 48 देश उतरले आहेत. तीन यजमान देश वगळता बाकी 45 देश पात्रता फेर्‍यांचा अडथळा पार करून आले आहेत. बारा गटांत 48 संघांची विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटात चार संघ आहेत. प्रत्येक संघ किमान तीन गट सामने खेळेल. गटातील अव्वल दोन संघ आणि बारा गटांमधील आठ सर्वोत्तम तृतीय क्रमांकाचे संघ असे एकूण 32 संघ बाद फेरीत प्रवेश करतील. बाद फेरीत 32 संघांचा समावेश असलेली ही पहिलीच फिफा विश्वचषक स्पर्धा आहे. त्यानंतर 16 संघांची उपउपांत्यपूर्व फेरी, आठ संघांची उपांत्यपूर्व फेरी, चार संघांची उपांत्य फेरी आणि दोन संघांत अंतिम सामना, असा स्पर्धेचा प्रवास आहे. आधी 32 संघ व 64 सामने असत. आता 104 सामने होतील आणि स्पर्धा 39 दिवस चालेल. सामन्यांसाठी न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, डॅलस, मियामी, मेक्सिको सिटी, टोरोंटो अशा सोळा शहरांची निवड करण्यात आली आहे. युरोप, आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ओशियाना अशा सर्वच खंडांतील देश या अनोख्या महायुद्धात आहेत. आशिया, आफ्रिका, अमेरिका खंड यांना अधिक संघ पाठवण्याची संधी मिळाल्याने खर्‍या अर्थाने जगभरातील फुटबॉलचे प्रतिनिधित्व या स्पर्धेत दिसेल. क्रिकेटवेडा म्हणून गणला जाणारा भारत आशिया खंडातून एकदाही फिफाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. भारतात पश्चिम बंगाल, केरळ, गोवा या राज्यांत फुटबॉल सर्वांत लोकप्रिय आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड्स, बेल्जियम, क्रोएशिया, स्वित्झर्लंड, स्कॉटलंड, नॉर्वे, तुर्की, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, सर्बिया, मोरोक्को, सेनेगल, इजिप्त, नायजेरिया, ट्युनिशिया, दक्षिण आफ्रिका, जपान, दक्षिण कोरिया, इराण, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, कतार, उझबेकिस्तान, जॉर्डन, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा, हैती, पनामा, क्युरासाओ, अर्जेंटिना, ब्राझील, उरुग्वे, कोलंबिया, पराग्वे, न्यूझीलंड इत्यादी 48 देशांचे फुटबॉलपटू झळाळत्या विश्वचषकावर नजर ठेवून मैदानात उतरतील. विश्वचषक 18 कॅरेट सोन्यापासून बनवलेला आहे. त्याचा पाया मॅलाकाइट नावाच्या हिरव्या रंगाच्या मौल्यवान खनिजापासून बनवलेला आहे. चषकात 75 टक्के शुद्ध सोने असते. चषक आतून पोकळ असला, तरी त्याचे वजन 6 किलो 175 ग्रॅम आहे. विजेत्या देशाच्या कोणत्याही खेळाडूला तो सहज हातात धरून उंचावता येतो. विजेत्या संघाला हा चषक कायमस्वरूपी दिला जात नाही. स्वित्झर्लंडमधील फिफा संग्रहालयात चषक सुरक्षित ठेवला जातो आणि विजेत्या संघाला फक्त सोन्याचा मुलामा असलेली कांस्य प्रतिकृती दिली जाते. फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. तो केवळ खेळ नाही, जगभरातील कोट्यवधी माणसांची भावना त्यामागे आहे. या महास्पर्धेची 2026 ची आवृत्ती इतर सर्व आवृत्त्यांपेक्षा वेगळी आणि खर्‍या अर्थाने ऐतिहासिक आहे. इतिहासात प्रथमच 48 संघ सहभागी होत आहेत. नव्या स्वरूपात, नव्या उत्साहात फुटबॉलचा हा महोत्सव आहे. चार वेळचा विश्वविजेता इटली यावेळी पात्र ठरला नाही. पात्रता फेरीत बोस्निया-हर्झेगोव्हिनाने इटलीला बाहेर केले आणि इटली सलग तिसर्‍यांदा विश्वचषकाला मुकला. युरो-2024 चा विजेता, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता आणि फिफा क्रमवारीत अव्वल असलेला स्पेन या
स्पर्धेत विजेतेपदाचा सर्वांत मोठा दावेदार आहे. रोड्री, पेड्री, लामिन यमाल असे खेळाडू असलेल्या या संघाची शैली वेगळीच आहे. चेंडूवर ताबा, वेगवान पासिंग आणि संधी आली की गोल ही या संघाची खास वैशिष्ट्ये आहेत. अनुभव आणि तारुण्याची सांगड असणारा संघ म्हणजे फ्रान्स. किलियन एम्बाप्पे, विल्यम सालिबा यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी सजलेला फ्रान्स नेहमीच धोकादायक असतो. प्रतिहल्ला करण्यात हा संघ तरबेज आहे. सन 1998 व 2018 चे जेतेपद मिळवलेल्या फ्रान्सला तिसर्‍या जेतेपदाची ओढ आहे. सन 2022 मध्ये कतारमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनाने 2024 चा कोपा अमेरिका स्पर्धाही जिंकली. सलग दुसरे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अर्जेंटिना उराशी बाळगून आहे. लिओनेल मेस्सी, लाउटारो मार्टिनेझ, ज्यूलियन अल्वारेझ, एन्झो फर्नांडेझ यांच्या रूपाने या संघाकडे स्पर्धेतील सवार्ंत धोकादायक आक्रमण फळी आहे. सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक जिंकलेल्या ब्राझीलला शेवटचे विजेतेपद 2002 मध्ये मिळाले होते. यावेळी प्रशिक्षक म्हणून कार्लो अँचेलोटी आले आहेत. व्हिनिसिअस ज्युनिअर, राफिन्हा, एन्ड्र्रिक, गॅब्रिएल मार्टिनेली ही आक्रमक फळी स्पर्धेत कुणालाही भारी पडू शकते. 2018 व 2022 च्या विश्वचषकात साखळी फेरीतच गारद झालेला जर्मनी यावेळी वेगळा आहे. तरुण प्रशिक्षक ज्यूलियन नागेल्समान यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ नव्याने उभा राहिला आहे. जमाल मुसियाला आणि फ्लोरियन वर्ट्झ हे दोन तरुण मिडफिल्डर जर्मनीचे आधारस्तंभ आहेत. चाळीसवर्षीय मानुएल न्यूअरने निवृत्ती मागे घेऊन पाचव्यांदा विश्वचषकात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. चार वेळा विश्वचषक जिंकलेला जर्मनी पाचव्या जेतेपदासाठी आसुसलेला आहे. सन 1966 नंतर इंग्लंडला विजेतेपदाचे स्वप्न साकार करायचे आहे. हॅरी केन, जुड बेलिंगहॅम आणि डेक्लन राइस यांच्यासारखे खेळाडू असलेला हा संघ देशाच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वांत बलाढ्य मानला जातो. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो सहाव्यांदा विश्वचषकात उतरणार आहे. हा त्याचा एक विक्रम आहे. वय 41 असले, तरी तो गोल करण्यात पटाईत आहे. वेगवेगळ्या विश्वचषकांत गोल करणारा तो एकमेव खेळाडू असून, आता सहाव्यांदा तोच पराक्रम करण्याची त्याची इच्छा आहे. ब्रुनो फर्नांडेझ हा संघाचा आधारस्तंभ असून, संपूर्ण संघ एकसंध आहे. स्पर्धेत काही तारांकित खेळाडू जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतील. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी 38 वर्षांचा आहे. त्याचा हा कदाचित शेवटचा विश्वचषक ठरेल. तो आता वेगवान नसला, तरी अचूक पासिंग, चेंडूवर ताबा आणि निर्णायक क्षणी संधी साधणे यांत तो कुशल आहे. अर्जेंटिनाची संपूर्ण रणनीती त्याच्याभोवती फिरणारी आहे. समोरचा संघ हे जाणूनही त्याला थांबवू शकत नाही. फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे अतिशय चपळ आहे. 2018 मध्ये किशोरवयात असताना फ्रान्सच्या विजेतेपदात त्याचा वाटा होता.

Great War!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago