उष्णतेच्या झळांनी द्राक्षबागा होरपळल्या

शेतकरी चिंतेत, उगाव-शिवडी परिसरात तापमान 42 अंशांपार

निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या उगाव-शिवडी परिसरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. तीव्र उष्णतेचा परिणाम आता थेट द्राक्षबागांवर दिसू लागला असून, पुढे घडनिर्मितीवर यांचा परिणाम व्हायला नको, पानांची जळजळ आणि वेलींची वाढ मंदावणे अशा समस्या निर्माण होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उगाव, शिवडी, चांदोरी, नैताळे आणि परिसरातील ग्रामीण भागात उष्ण व कोरडे वारे वाहत असल्याने वातावरण अधिकच तापले आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
द्राक्षबागांमध्ये सध्या छाटणीनंतरच्या व्यवस्थापनाची कामे सुरू असताना वाढलेल्या तापमानामुळे बागांचे संतुलन राखणे शेतकर्‍यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून ठिबकद्वारे पाण्याच्या फेर्‍या वाढवाव्या लागत आहेत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जनजीवनावरही परिणाम जाणवत असून थंड पेये, फळांचा रस आणि आईस्क्रीम विक्रीत वाढ झाली आहे.
ग्रामीण भागातील मजूर वर्गाला दुपारच्या उन्हात काम करणे कठीण जात असून अनेक शेतकरी सकाळी आणि सायंकाळीच शेतीकामे उरकत आहेत. हवामानातील वाढत्या तापमानामुळे आगामी काळात द्राक्ष, भाजीपाला आणि इतर बागायती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शेतकर्‍यांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली
आहे.

नगरसूल परिसर निर्मनुष्य

नगरसूल : तापमानाने उच्चांक गाठल्याने तापमानाचा पारा 41 अंशांवर नोंदविले गेले. सकाळपासून तापमानाचा पारावर चढत असताना दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान 41 पारा गेल्याने बाजारपेठ व गाव निर्मनुष्य दिसत होते. सायंकाळी पाचपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत होती. शेतकर्‍यांनी पशुधनाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळी उपाययोजना केली आहे. अनेकांनी सकाळपासून छतावर पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केल्याचे पाहावयास मिळत आहे.

द्राक्षबागांमध्ये ‘सनबर्न’चा धोका

काही भागांत वेलींच्या कोवळ्या फुटींवर उष्णतेचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, तापमान सातत्याने 40 अंशांच्या पुढे राहिल्यास द्राक्षबागांमध्ये ‘सनबर्न’चा धोका वाढतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आणि नियमित पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शेतकर्‍यांनी दुपारच्या वेळेत फवारण्या टाळाव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Heatwaves scorch vineyards

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *