दोन पिंजरे लावूनही बिबट्या हाती लागेना
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत असतानाच कहांडळवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (दि. 14) मध्यरात्री शेतातील घरासमोर बांधलेल्या सात महिन्यांच्या घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेत शेतकरी जगन्नाथ बाबुराव कहांडळ यांचे सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जगन्नाथ कहांडळ यांच्या गट क्रमांक 59 मधील शेतातील घरासमोर शिंगरू बांधले होते. मध्यरात्री बिबट्याने अचानक हल्ला करून त्याचा फडशा पाडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रवींद्र खरात यांनी वन विभागाला कळवले. वनमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण, वनरक्षक फैजअली सय्यद, वनसेवक नारायण वैद्य आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक लोंढे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. पाऊलखुणांची तपासणी केल्यानंतर हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले.वन विभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परिसरात यापूर्वी पाळीव प्राणी आणि कुत्र्यांवर हल्ले झाल्याने वन विभागाने दोन पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबट्या अद्याप पिंजर्यात अडकला नसल्याने ग्रामस्थांची चिंता कायम आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. कहांडळवाडीजवळील घोटेवाडी आणि वल्हेवाडी शिवारात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. घोटेवाडीतील स्मशानभूमी परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शिवाजी यादव यांच्या वस्तीवरील दोन कुत्र्यांचा आठवडाभरात बिबट्याने फडशा पाडला आहे.सिन्नर शहरालगतच्या ढग्या डोंगराच्या पायथ्याशी बारागाव पिंपरी रस्त्यालगत शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास बिबट्या शेतातून फिरताना दिसला. रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांनी या बिबट्याचे छायाचित्रण केले. परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याने सुरक्षित अधिवासाच्या शोधात त्यांची भटकंती सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मका पिकांमुळे वाढणार धोका?
आगामी काळात मका पिकांची वाढ झाल्यानंतर शेतांमध्ये बिबट्यांना सुरक्षित आडोसा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर आणखी वाढण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि वारंवार होणार्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Horse foal killed in leopard attack
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…