ट्रक अडवून चालकाला मारहाण, लूट; पाच आरोपी ताब्यात

उपनगर पोलिसांची चार तासांत कारवाई; 2.33 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मालवाहू ट्रेलर अडवून चालकाला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा उपनगर पोलिसांनी अवघ्या चार तासांत पर्दाफाश केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी, काठी, तीन हजारांची रोकड आणि पाच मोबाइल असा एकूण 2 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक विधिसंघर्षित बालक असल्याचे
पोलिसांनी सांगितले.
3 ऑक्टोबरला रात्री सुमारे दोनच्या सुमारास अरविंद कुमार राजनाथ तिवारी (35, रा. देहूगाव, चाकण, मूळ उत्तर प्रदेश) हे मालवाहू ट्रेलर घेऊन आगर टाकळी रोडवरील ड्रीमसिटी सोसायटीसमोरून जात होते. त्यावेळी 5 ते 6 अनोळखी इसमांनी मोटारसायकल आडवी लावून ट्रेलर थांबविला. त्यानंतर तिवारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून टोळी पसार झाली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, शांताराम डंबाळे, सुनील बडे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, निखिल कोरपड, विनोद लखन, गौरव गवळी, प्रशांत देवरे, अनिल शिंदे, अनंत शिंदे, सुनील गायकवाड, पंकज करपे, सूरज गवळी, संदेश रघतवाल, योगेश जाधव यांच्यासह गुन्हे शोध पथकाने केली.

नंबरप्लेटवर चिखल; पोलिसांना संशय

पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींनी वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी टाकळी रोड परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने विजय-ममता सिग्नल परिसरात शोधमोहीम सुरू केली. तेथे शाईन मोटारसायकलवर दोन संशयित आढळले. विशेष म्हणजे, दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल लावण्यात आला होता. पोलिसांनी दुचाकी थांबवून क्रमांकाची खात्री केली असता तो गुन्ह्यातील वाहनाच्या क्रमांकाशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत संशयितांनी लुटीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत कृष्णा संतोष साळवे (19), अनिकेत दिलीप शिंदे (33), लक्ष्मण साहेबराव गरपाळ (32) आणि सलमान युनूस शेख (27) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासोबत एका विधिसंघर्षित बालकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून 50 हजारांची पल्सर, 30 हजारांची शाईन मोटारसायकल, लाकडी दांडा, 3 हजार रुपये आणि सुमारे 1.50 लाखांचे पाच मोबाइल असा एकूण 2 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

Truck intercepted; driver assaulted and robbed; five accused detained.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *