सिडको पाठोपाठ नाशिकरोडलाही बिल्डरला सहा लाखांचा गंडा
सिडको : प्रतिनिधी
पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना हेरायचे, परिसरात गुन्हा घडल्याचे किंवा चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्याची भीती दाखवायची आणि खबरदारी म्हणून अंगावरील दागिने काढून कागदात ठेवण्यास सांगायचे… त्यानंतर हातचलाखीने दागिने लंपास करायचे, हा जुना फंडा वापरत तोतया पोलिसांनी एकाच दिवशी दोघांना लूटून जणू धाडच घातली आहे.
सिडकोतील अश्विननगर परिसरात एका 63 वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास केल्यानंतर त्यापाठोपाठ नाशिक रोडवर नामांकित बांधकाम व्यावसायिक दिलीप संकलेचा यांना तोतया पोलिसांनी तब्बल सहा लाख रुपयांचा गंडा घातला.
अश्विननगर येथील घटनेत मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने आपण पोलिस असल्याचे सांगत 63 वर्षीय महिलेला हटकले होते. पुढे मर्डर झाल्याने चेकिंग सुरू असल्याची बतावणी करत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून कागदात ठेवण्यास सांगण्यात आले. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत पोत कागदात ठेवली. याच वेळी हातचलाखी करून संशयितांनी सोन्याची पोत काढून घेतली आणि हातात कागदाचा दुसरा पुडा ठेवला. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची पोत लंपास झाली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर तासाभराच्या आतच नाशिक रोडवर त्याच धाटणीची दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या नावाचा वापर करून दागिने लुटणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाशिक रोडच्या स्नेह मंदिर सोसायटी परिसरात रविवारी सकाळी बांधकाम व्यावसायिक दिलीप कचरदास संकलेचा (वय 68) जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना हटकले. दोघांनी आपण पोलिस असल्याचे सांगितले. परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्याचे सांगत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संकलेचा यांना दिल्या. भामट्यांनी संकलेचा यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि हातातील अंगठी काढून कागदात ठेवण्यास सांगितले. पोलिस असल्याचे सांगितल्याने संकलेचा यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी आणि एक तोळे वजनाची हिर्याची अंगठी काढून कागदात ठेवली. या दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत तब्बल सहा लाख रुपये होती. मात्र, दागिने कागदात ठेवण्याच्या बहाण्याने भामट्यांनी हातचलाखी केली. संकलेचा यांच्या नकळत मूळ दागिने काढून घेत त्यांच्या हातात मातीचा गोळा ठेवलेला कागदाचा पुडा दिला. दागिने सुरक्षित असल्याचा भास निर्माण करून हेल्मेट परिधान केलेले दोन्ही संशयित काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून तेथून पसार झाले.
काही वेळाने कागद उघडून पाहिल्यानंतर संकलेचा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत संशयित पसार झाले होते. या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणार्या भामट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
अश्विननगर आणि नाशिक रोडच्या घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, या दृष्टीने तपास होणे आवश्यक आहे. विशेषतः मोटारसायकल, संशयितांचे वर्णन आणि घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून या भामट्यांचा माग काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Impersonator police raid Nashik residents