दरवर्षी उन्हाचे चटके अधिकाधिक तीव्रतेने बसू लागले आहेत. एकूणच तापमान वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक, पुणेसारख्या शहरांचेदेखील तापमान वाढू लागले. त्याच वेळी पाऊस पडण्याचे प्रमाणदेखील कमीअधिक होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मार्च, एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडतो, वादळे येतात आणि नुकसान करून जातात. एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळा बसत असताना, आता मे असह्य होऊ लागला आहे. राज्यातील सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
यावर्षी तर थंडी जाणवली नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाला, मात्र तरीदेखील पाणी साठवणीची सक्षम व्यवस्था नसल्याने राज्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यात आता अल निनोचा प्रभाव पडणार आहे. विकासाच्या मृगजळामागे धावताना निसर्गाची झालेली अपरिमित हानी आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले आहे आणि ऋतुचक्रदेखील बदलले आहे. एकीकडे अशी ही नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळादेखील आता दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्रतेने बसू लागल्या आहेत. अगोदरच महागाई, बेरोजगारीचा सामना करताना सगळ्यांचीच दमछाक होत आहे. त्यात युद्धाची भर पडली. येणारा प्रत्येक दिवस सर्वांसाठी कसोटीचा काळ ठरणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीची सप्तसूत्री देशाला सांगितली आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले, मात्र याबाबत जनतेमधून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक मंत्री, नेते हे प्रतिसाद देताना दिसत आहेत, मात्र जनतेमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.
खतांचा वापर कमी करा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्याचा शेती उत्पादनांवर विपरीत परिणाम होऊ शकतो ही रास्त भीती आहेच. त्यात बेभरवशाचा पाऊस हे एक मोठे कारण आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बिघडलेले निसर्गाचे संतुलन आणि बदललेले ऋतुचक्र याला कारणीभूत ठरत आहे ती बेसुमार वृक्षतोड करून उभारली जाणारी सिमेंटची जंगले.
कधी नव्हे ते धरणांचा तालुका अशी ओळख तसेच घनदाट जंगल, तानसा अभयारण्य असलेल्या शहापूर तालुक्यातील तापमान 40-45 अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहापूरच्या तापमानवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच संदर्भात राज्यात पहिल्यांदाच याबाबत गांभीर्याने विचार केला जात असून, शहापूर पर्यावरण रक्षण मंचच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी, शासन-प्रशासन यांच्याकडे निवेदने देण्यात आली आहे. याचबरोबर जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत आणि मंचाच्या माध्यमातून जलसंधारण तसेच मोठ्याप्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे. जेणेकरून शहापूर तालुक्यातील तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. शहापूर तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गामुळे मोठ्याप्रमाणावर वृक्षांवर कुर्हाड चालली, मात्र तेवढ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली नाही. त्यामुळेच या परिसरातील तापमान वाढले आहे. ठाणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांतील तापमान एवढे कधीच नव्हते. विकासाच्या नावाखाली अशीच परिस्थिती जिकडे-तिकडे दिसते आहे. पूर्वी कोकण, ठाणे जिल्ह्यात भरपूर पाऊस पडायचा. दहा-पंधरा दिवस संततधार लागायची. अनेक दिवस सूर्यदर्शन व्हायचे नाही, पण आता गेली कित्येक वर्षे तसा पाऊस पडत नाही की हिवाळ्यात थंडीदेखील जाणवत नाही.
वाढते तापमान आणि घटते पर्जन्यमान ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे आणि यावर लवकरात लवकर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. तात्कालिन फायद्यासाठी आपणच आपले उद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत का आणि विकासाच्या मृगजळामागे धावताना आपण आपले आयुष्य भकास करत आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.
Increasing ‘temperature’ and decreasing ‘precipitation’