पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पीडितांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी ठाम निर्धार व्यक्त केला. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्याला बुधवारी (दि. 22) एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेतील बळी ठरलेल्या निष्पाप नागरिकांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या पीडित कुटुंबीयांप्रति आपली सहवेदना व्यक्त केली आहे. देश या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे म्हटले
आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात नाहक बळी ठरलेल्या निष्पाप जीवांचे आज स्मरण आपण करत आहोत. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाचा सामना करत असलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या दुःखातही मी सहभागी आहे. तसेच एक राष्ट्र म्हणून संपूर्ण देश या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे रचलेले कट कधीही यशस्वी होणार
नाहीत.
भारतीय लष्करानेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून निवेदन जारी केले. त्यात लष्कराने ठामपणे सांगितले की, भारताच्या विरोधात केल्या जाणार्या कोणत्याही शत्रुत्वपूर्ण कृत्याला निश्चित आणि कडक प्रत्युत्तर दिले जाईल. न्याय नेहमीच केला जाईल आणि या आघाडीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच ‘ऑपरेशन महादेव’ या मोहिमेंतर्गत लष्कराने हे मोठे यश संपादन केले आहे. या मोहिमेबाबत लष्कराने संकेत दिले होते की, त्याचे यश ही केवळ काळाची बाब होती.
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरूच आहे
या मोहिमेदरम्यान सुमारे 300 चौरस किलोमीटरच्या अत्यंत दुर्गम आणि धोकादायक भूभागात व्यापक व सखोल शोधमोहीम राबवण्यात आली होती. सलग 93 दिवसरात्र चाललेल्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा दलांना एक महत्त्वपूर्ण यश मिळाले होते. या मोहिमेत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, ज्यामुळे या भागात कार्यरत असलेल्या दहशतवादी कारवायांना गटांना मोठा धक्का बसला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरूच आहे आणि दहशतवादाविरुद्धची ही मोहीम आगामी काळातही पूर्ण जोमाने सुरू राहील, असेही लष्कराने स्पष्ट केले.
India will never bow down to terrorism