गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी परराज्यातील महिला टोळी गजाआड

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हेशोध पथकाची कामगिरी

पंचवटी : प्रतिनिधी
निमाणी बसस्थानक आणि मार्केट यार्ड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणार्‍या मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय महिला टोळीला गजाआड करण्यात पंचवटी पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला आरोपींकडून पोलिसांनी एकूण दोन लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याद्वारे पंचवटी पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असताना एका फिर्यादी महिलेला दोन संशयित महिलांनी धक्का दिला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून पळ काढला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे अधिकारी सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ व अंमलदारांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले. आरोपी महिलांची नावे उषा किशोर सकटे (वय 50, रा. देवास भोपाल चौराया, जुन्या झोपडपट्टी जवळ, ता. देवास, जि. इंदूर, मध्य प्रदेश) व पौर्णिमा किशोर सकटे (वय 30, रा. सप्तशृंंगी काली माता मंदिराजवळ, भोपाळ चौराया, ता. देवास, जि. इंदूर, मध्य प्रदेश) अशी आहेत. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन लाख 50 हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व महावीर ज्वेलर्सचे नाव असलेली 300 रुपयांची पर्स जप्त केली.
अधिक तपासात या महिलांनी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतीलच एका घरफोडीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून घरफोडीतील सहा हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक सुनील पवार (गुन्हे), नितीन आंधळे (प्रशासन), सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ, अंमलदार अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, जयवंत लोणारे, चारोस्कर, जगताप, युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, अंकुश काळे, नितीन पवार, आगोणे आणि महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोईर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कुलकर्णी करत आहेत.

Inter-state gang of women stealing jewelry by taking advantage of crowds put behind bars.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *