(भाग 3)
मागील ऐंशी वर्षांचा इतिहास बघितला तर जाणवेल की, बहुतांश काळ एका विशिष्ट पक्षाचे सरकार होते. नंतर काहीतरी घडले आणि सरकार बदलले आणि दुसरा पक्ष सत्तेत आला. काही काळाने पुन्हा आधीच्या पक्षाचे सरकार सत्तेत आले. पुन्हा एक दशकाने पहिल्या पक्षाचे सरकार बदलून दुसर्या पक्षाचे सरकार सत्तेत आले. केंद्रात जसे बघायला मिळाले तसे अनेक राज्यांमध्येही घडले आहे. अगदी स्थानिक संस्थांमध्येही असेच घडत असते. लोकशाहीमध्ये असे होतंच असते. यात नवीन असे काही नाही. याला इंग्रजीत अँटी इन्कन्बन्सी किंवा साध्या भाषेत सत्ताविरोधी वा सरकारविरोधी कल. या बदललेल्या कलामुळे सरकारे बदलत असतात. ऊनसावलीच्या खेळाप्रमाणे सत्ता बदलत असते. हा लोकशाहीचा नैसर्गिक (नॅचरल) नियम आहे.
असे का होत असावे बरं? बघूया. समजण्यास सोपे व्हावे म्हणून इथे पक्ष आणि पक्षाचा नेता एकच आहे असे गृहीत धरूया. जेव्हा लोकशाही सुरू होते तेव्हा एक प्रमुख पक्ष/पक्षाचा प्रमुख जनतेला काही आश्वासने देतो. भोळीभाबडी जनता त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला निवडून देते. सत्तेत बसवते. सुरवात असल्याने तोही स्वतःला विश्वासपात्र ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे सरकार चालवतो. लोककल्याणाचे अनेक विधायक कामे करून देशाला आणि देशाच्या जनतेला प्रगतिपथावर घेऊन जाण्यात काहीसा यशस्वीही होतो. पहिला कार्यकाळ संपतो. दुसर्या कार्यकाळासाठी जनतेसमोर जातो, कामे दाखवतो, प्रगती दाखवतो व त्याआधारे जनाधार मिळवतो. दुसरा कार्यकाळ सुरू होतो. सत्ता उपभोगत असताना काही निर्णय योग्य ठरतात, तर काही चुकतात. सत्ता आहे म्हणजे त्याला विरोधकही असणारच. पक्षांतर्गत विरोधक असतात, तसेच सरकारचेही विरोधी असतात. एक पक्ष सत्तेत असला की विरोधी पक्ष त्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्याच्या उणिवा काढत असतात.
अशा एकेक चुका आणि उणिवा साठूनसाठून सत्तेतील पक्ष कसा जनताविरोधी आहे हे विरोधी पक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. बरं, विरोधी पक्षात खूप हुशार आणि सत्तेत मूर्ख बसलेले असतात, असे काही नसते. दोघेही एकमेकांचे मावसभाऊच असतात. नावं, गावं, आडनावं आणि कौटुंबिक पाश्वर्र्भूमी वेगळी असू शकते. रक्त मात्र एकच असते. दोघांच्याही विचारांच्या मुळाशी सत्ता मिळविण्याचीच इच्छा असते.
जसे विमानातील डॉक्टर व हलवायाची गोष्ट असते, की मला विमान चालवायचे आहे, हीच मूळ इच्छा असल्याने ते दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. तसेच सत्तेचेही असते. निवडणुकीच्या काळात जो पक्ष/नेता जास्त प्रभावीपणे प्रचार करेल त्याला अधिक मते मिळतात. जो जनतेला जास्तीत जास्त आमिषे दाखवून अधिक भुरळ पाडेल तो सत्तेची हवा चाखेल. हलवाईने प्रवाशांना मोफत मिठाई दिली की तो विमान चालवण्यास योग्य असे काहीसे चित्र लोकशाहीत बघायला मिळते. मग त्या मिठाईचे अनेक प्रकार असू शकतात. मला माहीत असलेले मिठाईचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे मद्य आणि द्रव्य. मलईसुद्धा आणखी एक प्रकार असू शकतो. मी मुद्दाम सांकेतिक भाषेत सांगतो आहे. कारण प्रत्येकासाठी मद्य, द्रव्य आणि मलई वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. त्यामुळे पक्षाची किंवा नेत्यांची योग्यता महत्त्वाची नसतेच.
एका पक्षाचे सरकार जाऊन दुसर्या पक्षाचे सरकार सत्तेत बसते. दर पाच वर्षांनी सगळे येतात, भेटतात, आश्वासने देतात आणि मते घेऊन जातात. मत देताना आपल्याला काहीच माहीत नसते की, आपल्या मताचे नेमके काय होणार आहे? आपण एक विशिष्ट विचार करून मतदान करतो; परंतु ज्याला आपण मतदान करतो त्याचा विचार किंवा त्याचा अजेंडा आपल्याला माहीत असतो का? निवडणुकीच्या रिंगणात तो (सर्वच उमेदवार) काहीतरी विचार करून आणि उद्देश घेऊन उतरलेले असतात. अंतिम उद्देश सत्ता मिळवणे किंवा सत्तेत बसणे, हाच असतो. म्हणूनच निवडणुकीच्या काळात मतांची गणितं समजून घेऊन त्याची गोळाबेरीज करून आपल्याला सर्वाधिक मते कशी मिळतील याच विवंचनेत सर्वच उमेदवार असतात. आपण काय विचार करून मतदान करतो, बघा ना! म्हणजे उमेदवार निवडताना आपले निकष काय असतात. मैत्रीतला, ओळखीच्यातला, व्यवसायातला, नात्यातला, जातीतला, पक्षातला, प्रांतातला म्हणून त्याला मतदान करतो. तो योग्यच असतो म्हणून नाही, पण म्हणून तो आपल्याला योग्य वाटतो. लक्षात येतेय का? जसे विमानातील व्यावसायिक प्रवासी पायलट निवडण्यासाठी डॉक्टरला मतदान करतील आणि धंदेवाईक हलवायाला मतदान करतील. लोकशाहीत असेच काहीसे सर्वच निवडणुकांत होत असते.
लोकशाहीत सर्वाधिक योग्य असलेला नेता निवडला जात नाही, तर सर्वाधिक लोकप्रिय नेता निवडला जातो. दोन्हींमध्ये फरक आहे. जो जनतेवर अधिक प्रभाव पाडेल तो लोकप्रिय होतो. जो स्वतःला जनतेसमोर अधिक प्रभावीपणे व्यक्त होईल तो लोकप्रिय होतो. आपण नेता नाही, सर्वोत्कृष्ट सेल्समन निवडतो. सुरवातीच्या काळात मौखिक आश्वासने देऊन मते विकली जायची. नंतरच्या काळात मद्य, द्रव्य आणि मलई विकून मते विकली जायची. कालांतराने या सत्तेच्या संगीत खुर्चीला लोक कंटाळतात. त्यांना पक्षांचा, नेत्यांचा आणि एकंदरीत राजकारणाचा वीट येतो. तेव्हाच एका अशा व्यक्तीचा उदय होतो, जो तुम्हाला सांगतो, हे सर्व आता बंद करा. मला निवडून द्या, मी तुम्हाला या बिकट अवस्थेतून बाहेर काढतो. खूप झाले, तेच तेच पक्ष, तेच तेच नेते, त्याच त्याच समस्या. मी तुम्हाला सर्व समस्यांवर मात करण्यास मदत करतो. मी तुमचा हितचिंतक आहे, तुमचा सेवक आहे… मीच तो तुमचा मित्र आहे. मग तो तुम्हाला स्वप्न दाखवतो. आणि म्हणून हल्ली स्वप्नं विकली जातात. लोक स्वप्नांच्या आशेने विकली जातात आणि त्या बदल्यात नेते द्रव्य आणि मलई खिशात घालतात. खिसा भरला की,
स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या घशात ओततात. त्याचे काय होते हे आपण सर्वच अनुभवतो आहे. त्याच्या आणखी तळाशी जाऊन खरी गंमत काय आहे, हे जाणून घेऊया.
(क्रमशः)
Is there democracy?
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…