नुकताच गणेशोत्सव झाला आणि पितृपक्षाला सुरवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या किंवा अन्य कुठल्याही सणोत्सवाच्या निमित्ताने होणारा आर्थिक खर्च, मनुष्यबळाचा खर्च, वेळेचा अपव्यय यावर मंथन होणे आवश्यक आहे. ब्रिटिश काळात याला सार्वजनिक करणे आवश्यक होते, तर ते योग्यच होते; परंतु आज त्याची गरज आहे का? गरज असेल तर अशा प्रकारे ते साजरे होणे आवश्यक आहे का? सार्वजनिक पद्धतीने होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि एकंदरच होणारे पर्यावरण प्रदूषण करणे, खरोखर गरजेचे आहे का? आपणच आपल्यावर सुप्त प्रहार करत आहोत, याची आपल्याला जाणीवदेखील होत नाही.
या अनावश्यक नसल्या तरी निम्नावश्यक गोष्टींमध्ये स्वतःला गुरफटून ठेवणे उचित आहे का? ज्या धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा अन्य घटकांनी या उत्सवांना इव्हेंटचे स्वरूप दिले आहे, त्यांना कुणी काही सांगेल का? बाबांनो, आता मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यावे. शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राची दिवाळखोरी, बेरोजगारी, सामाजिक असुरक्षितता,युवाशक्तीची वाताहत, महिलांचे स्खलन, अर्थकारणाचे ध्रुवीकरण आणि पृथक्करण, लोकशाहीचे वाभाडे… यांसारख्या व्यापक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले तर कदाचित येणार्या अडचणी तसेच प्रत्येकाच्या जीवनात येऊ घातलेले विघ्न दूर होण्यास मदत होईल. असे आता आपल्याला ओरडून ओरडून सांगावे लागणार आहे. परंतु पुन्हा प्रश्न निर्माण होतो की, सांगायचं तरी कुणाला? ज्यांना सांगायचे त्यांनीच ही अवस्था केली आहे.
दुसरे असे की, इथे आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार आहे, स्वातंत्र्य निवडण्याचादेखील अधिकार आहे. त्यामुळे कुणी कुणाचे ऐकेल, याची शाश्वती नाही. जो तो आपापल्या पद्धतीने वागतो. सर्वांना सुतासारखे सरळ ठेवण्याची जबाबदारी असणार्या कायद्याच्या रक्षकांची आणि सुव्यवस्था निरीक्षकांचीच गॅरंटी उरली नाही, अशी तर अवस्था आहे. लोकशाहीमुळे माजलेला हा गोंधळ आहे, असेही म्हणू शकतो. म्हणजे काय, तर याला जबाबदार लोकशाही आहे, असे मला वाटते. सध्या तर आपल्या देशात, लोकशाहीसुद्धा हॅक झालेली आहे, त्यामुळे आणखीनच वाईट अवस्था आहे.
अशी कल्पना करा की, तुम्हाला काही कामानिमित्त विमानाने दिल्लीला जायचे आहे. जवळच्या विमानतळावरून विमानात बसले. तिथे एक सूचना वजा घोषणा केली जाते की, जे कुणी विमान चालवण्यास इच्छुक आहे, त्यांनी कृपया पुढे यावे. हे ऐकताच एक डॉक्टर आणि एक हलवाई पुढे येऊन उभे राहतात. आता दोघांपैकी कुणी विमान चालवावे, यावर प्रवासी मतदान करून पायलट निवडतील. दोघांना प्रचार करण्यासाठी पाच-पाच मिनिटांचा वेळ दिला जातो. डॉक्टर बोलतो, की मला निवडल्यास माझ्या हॉस्पिटलमध्ये तुमचा विनामूल्य इलाज करेन, तसेच तुम्हाला निरोगी राहण्याचा सल्ला देत राहीन. आपले शहर आणि तुमचा परिसर स्वच्छ ठेवेन, कुणीच आजारी पडणार नाही याची काळजी घेईन. सर्वांच्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा आणि कॉलेजेस सुरू करेन. एवढंच नाही, तर आत्ता प्रवासात तुम्हाला काही झाले तर मी मोफत इलाज करेन. यासाठी तुम्ही माझीच निवड करा.
आता हलवाई बोलतो, मला निवडून दिले तर तुम्हाला आत्ता लगेच एकेक किलो पेढे फ्री मिळतील. दिल्लीला पोहोचल्यानंतर समोरच्या हलवाईच्या दुकानात तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता, सर्व काही मोफत. प्रत्येक सणावाराला तुम्हाला एक किलो मिठाई घरपोच दिली जाईल, त्याचे ही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. अशी घोषणा करताच सर्वांनी त्या हलवाईच्या समर्थनार्थ घोषणा देऊन त्याची बहुमताने विमान चालवण्यास निवड केली.
आता मला सांगा, प्रथमतः तुम्ही अशा विमानात बसणार का? विमान चालवण्यासाठी जेव्हा पायलटची अशा पद्धतीने निवड केली जाते, तेव्हा ते विमान आणि विमानातील प्रवासी सुरक्षित असतील का? साधी गोष्ट आहे, विमान चालवण्यासाठी अशाच व्यक्तीची निवड व्हावी, ज्याच्याकडे विमान चालवण्याचे शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, अनुभव आहे आणि कौशल्य आहे. अगदीच दुसरा एखादा प्रसंग बघा, तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर तुम्ही लोकांच्या मताने डॉक्टर निवडतात का? बहुमताने निवडलेल्या डॉक्टरकडे जाता का? उलट अशा वेळी डॉक्टर निवडताना सर्वात हुशार, ज्ञानी, अनुभवी आणि चांगले रिझल्ट देणार्या डॉक्टरची निवड करता. तो डॉक्टर तुमच्या परिचयाचा असतोच असेही नाही. तो डॉक्टरही तुम्हाला ओळखत नसेल; परंतु जेव्हा
स्वतःवर वेळ येते तेव्हा आपण त्या त्या क्षेत्रातील शिक्षित, तज्ज्ञ, अनुभवी आणि कुशल व्यक्तीची निवड करतो. मग हाच निकष आपण स्थानिक नगरसेवक, ग्रामसेवक, आमदार, खासदार निवडताना वापरतो का? सरकार निवडताना याचा विचार तरी करतो का? त्या हलवायाच्या आश्वासनांना बळी पडून आपले मतदान करत असतो!
लोकशाहीला विरोध नाहीच; परंतु लोकशाहीने एखादी गोष्ट निवडण्याच्या प्रकाराला विरोध आहे. जसे विमान चालवण्यासाठी लोकशाही पद्धतीने पायलट निवडणे घातक आहे, तसेच देश चालवण्यासाठी सरकार निवडणेदेखील घातकच! लोकशाहीने निवडून आलेल्या पायलटच्या विमानात बसण्याचे धाडस होणार नाही, तर मग लोकशाहीने निवडून दिलेल्या सरकारच्या देशात कसे रएहावे? माझा जीव वाचवणार्या डॉक्टरची निवड लोकशाही मार्गाने होऊ शकत नाही, तसेच राज्यकारभार करण्यात तज्ज्ञ नसलेल्या राज्यकर्त्यांच्या राज्यात/देशात माझे हित जपले जाईल, याची शाश्वती कशी देता येईल? माझ्यासाठी जे उत्तम आहे, ते मला मिळेलच, याची खात्री देता येईल का? मला माझ्या डॉक्टरांनी समाधानकारक उपचार केले नाही, तर मला डॉक्टर बदलण्याचे स्वातंत्र्य आहे. एवढंच नव्हे, तर डॉक्टरकडून चूक किंवा निष्काळजीपणा झाल्यास मी त्याच्या विरोधात पोलिसांत/कोर्टात दावा दाखल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो सिद्ध केल्यास त्याला शिक्षेला पत्र ठरवू शकतो. असे काही करण्याची मुभा मला निवडून दिलेल्या प्रतिनिधींबद्दल आहे का? असेल तरंच त्याला खरी लोकशाही म्हणावी, खरे स्वातंत्र्य म्हणावे, खरी व्यावसायिकता म्हणावी! मी डॉक्टरांचेच उदाहरण का देतो? कारण तुमच्यापैकी प्रत्येकाचा कधी न कधी, कुठल्यातरी कारणास्तव डॉक्टरांशी संबंध आलेला असतो. किमान डॉक्टरांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन जवळपास एकसारखाच असतो. किंबहुना समाजातील प्रत्येक घटकाकडे, व्यावसायिकाकडे किंवा व्यक्तीकडे बघण्याचा एक ठराविक दृष्टिकोन असतो. एक ठराविक अपेक्षा असते, एक ठराविक मागणी असते. जोवर त्या अपेक्षा, मागण्या पूर्ण होतात, तोवर समाज (जनता) शांत असते, संयमी असते, सहिष्णु असते. त्याच्या अपरोक्ष काही घडते, तेव्हा तीच जनता/ समाज हळूहळू अशांत होत जातो, बेलगाम होत जाते आणि अंततः आक्रमक व हिंसक होते. लोकशाहीचे लाभ घेण्यास आपण सर्वच इच्छुक असतो; परंतु ती एक दुधारी तलवार आहे. योग्य वापर केल्यास उपयुक्त ठरते, चुकीचा वापर केल्यास घातक ठरते. नेमकी कशी? हे आपण पुढच्या लेखामधून बघूया. तोपर्यंत हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवा, आणि वर लिहिलेला मजकूर पटला असेल किंवा नसेल; परंतु यावर सखोल विचार करा. नक्की पटेल आपल्याला!
(क्रमशः)
Is there democracy?
(भाग 1) प्रत्येक अंधश्रद्धेशी निगडित जनमानसातल्या पुरातन काळातल्या श्रद्धा निश्चितच आहेत... आई उवाच... मांजर आडवे…
आजकाल प्रत्येक घरात संध्याकाळी एक दृश्य अगदी सर्रास पाहायला मिळतं-कामानिमित्त बाहेर गेलेली माणसं घरी परततात,…
ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा; ‘विकासाच्या केवळ गप्पा नकोत‘ सुरगाणा : प्रतिनिधी तालुक्यातील उंबरदे गावातील स्मशानभूमीची…
ताणतणाव,जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग प्रेग्नन्सी का होत नाही? फर्टिलिटी क्लिनिकमध्ये…
पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक…
भाग 2 विमानाचा पायलट निवडताना त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा निकष न लावता जो इच्छुक असेल…