– मुकुंद बाविस्कर
नाशिक ही गोदावरीच्या तीरावर वसलेली सांस्कृतिक आणि धार्मिकनगरी आहे. येथे वर्षभर विविध सण-उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. याशिवाय, अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेष म्हणजे, श्रावण आणि भाद्रपद हे मराठी पंचांगानुसार सण आणि उत्सवांचे सर्वांत समृद्ध महिने मानले जातात. श्रावण महिन्यातील प्रमुख सण व उत्सवात संपूर्ण श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाची पूजा केली जाते आणि शिवामूठ वाहिली जाते. नवविवाहित महिला श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात व रात्री विविध खेळ खेळतात. नागपंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि निसर्गरक्षणाचा संदेश दिला जातो. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती आणि ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव शहरात रंगतो.
श्रावणातील अमावास्येला सर्जा-राजाची (बैलांची) पूजा करून पोळा सण साजरा केला जातो. नाशिक शहरानजीक असलेल्या उपनगरांमध्ये तसेच लगतच्या ग्रामीण भागामध्ये पोळा हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. आता भाद्रपद महिना सुरू झाला असून, या महिन्यातही सण-उत्सवांची रेलचेल आहे. मात्र, कोणताही सण साजरा करताना तो पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः डीजेचा कर्णकर्कश आवाज आला. पुण्याप्रमाणेच नाशिक शहरातही नागरिकांचा तीव्र विरोध दिसून येत आहे. मात्र, यासाठी सार्वजनिक मंडळांनीच पुढाकार घ्यायला हवा, हेही तितकेच खरे. यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना होते. यंदा हा उत्सव 10 ऐवजी 12 दिवस असणार आहे. गणेशोत्सवादरम्यान घरोघरी महालक्ष्मी तथा गौरींचे आगमन होते. दुसर्या दिवशी पूजन-महानैवेद्य आणि तिसर्या दिवशी विसर्जन केले जाते.
दरवर्षी नाशिक शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा होतो. परंतु, उत्सवाच्या या आनंदासोबतच गेल्या काही दशकांत जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि कचर्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होत असलेला र्हास रोखण्यासाठी नाशिक शहरात पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव ही आता केवळ एक संकल्पना न राहता काळाची गरज बनली आहे. पर्यावरणपूरक उत्सवाकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर ठोस अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सहजासहजी पाण्यात विरघळत नाहीत, तसेच त्यांच्यावरील रासायनिक रंग पाण्यातील जलचरांना आणि गोदावरीच्या परिसंस्थेला घातक ठरतात. त्यावर उपाय म्हणून शाडूची माती, लाल माती किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी 40 हजार
गणेशमूर्ती घडविल्या :
शहरातील 120 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने एकाच दिवशी 40 हजार पर्यावरणपूरक गणपती घडवत नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. त्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. महापालिकेने हा उपक्रम राबविला. महापौर हिमगौर आडके यांनी याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात झाली. एकूण 978 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या समारोपावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यालयास भेट देऊन या उपक्रमाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून साकारलेल्या गणेशमूर्तींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात नाशिक महानगरपालिकेच्या शाडू मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत तब्बल 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांना इको-फ्रेंडली गणपती मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकामी नगरसेविका रोहिणी पिंगळे उपस्थित होत्या. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर
फुले, दूर्वा, वस्तू आणि प्लास्टिक कचरा (निर्माल्य) गोळा होतो, जो अनेकदा नदीत फेकला जातो. गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीला ठिकठिकाणी निर्माल्य कलेस ठेवले जातात; परंतु काही जण दीड दिवसाचा गणपती बसवतात, तर काही जण पाच दिवस, सात दिवसांचादेखील गणपती बसवतात. त्यामुळे ठिकठिकाणी निर्मल कलशाची व्यवस्था आधीच करणे आवश्यक आहे. निर्माल्य कलश सर्व विसर्जन स्थळांवर पुरेशा संख्येत ठेवणे. संकलित केलेल्या निर्माल्यापासून महापालिकेने सेंद्रिय खत निर्मिती करावी आणि ते शहरवासीयांना किंवा शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावे.
ध्वनी आणि वायुप्रदूषणावर नियंत्रण :
मिरवणुकांमध्ये वापरले जाणारे मोठे डीजे, हाय-डेसीबल ध्वनिक्षेपके आणि लेझर लाइट्समुळे नागरिकांच्या (खासकरून वृद्ध व लहान मुलांच्या) आरोग्यावर आणि डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. पारंपरिक वाद्ये जसे की ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी पूर्णपणे टाळणे आणि ध्वनिमर्यादांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. थर्माकोल आणि प्लास्टिक विरघळायला शेकडो वर्षे लागतात आणि त्यापासून होणारा कचरा शहराच्या गटार व्यवस्थेत अडथळा निर्माण करतो. कागद, कापड, बांबू, ताग आणि ताज्या
फुलांचा वापर करून सजावट करणे आवश्यक आहे. गणेश मंडळांनी केवळ देखाव्यांवर खर्च न करता पर्यावरणपूरक देखावे साकारून सामाजिक संदेश द्यावा. सर्वांत पर्यावरणपूरक मंडळांना महापालिकेकडून विशेष पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवावे. गणेशोत्सव हा श्रद्धा आणि विश्वासाचा सण आहे. निसर्गाचे रक्षण करणे हीच खरी गणपती बाप्पाची सेवा आहे. गोदावरी नदीला पवित्र मानणार्या नाशिककरांनी एकत्र येऊन माझा बाप्पा, माझी गोदावरी हा विचार आत्मसात केला तर नाशिक शहर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे एक उत्तम मॉडेल ठरू शकते.
आवर्तन महोत्सवात अनुगुंज, भक्तिनाद
आवर्तन महोत्सव 2026 च्या प्रथम सत्रात कथक नृत्यांगना व गुरू कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी अनुगुंज हा नृत्याविष्कार सादर केला. तसेच गुरू सायली मोहाडकर व त्यांच्या शिष्यांनी भक्तिनाद हा नृत्याविष्कार सादर केला. या दोन्ही सादरीकरणांनी रसिकांवर मोहिनी घातली. नृत्य आणि संगीताच्या सुरेल संगमातून उमटणारी भावलय म्हणजे अनुगुंज. या कार्यक्रमाची सुरुवात नमन गणेशा, हे प्रथमेशा या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर कथकचे शिक्षण नुकतेच सुरू केलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींचा नृत्याविष्कार सादर झाला. सुंदर गोपालम् या श्लोकातून श्रीकृष्णाच्या लोभस रूपाचे आणि विविध भावछटांचे नृत्यमय दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर भूप, यमन, देस आणि दुर्गा या विविध रागांवर आधारित तराण्यांचे सादरीकरण झाले. शास्त्रीय संगीताच्या रागदारीला कथकच्या गतिमान नृत्यभाषेची जोड मिळाल्याने अनुगुंजला विशेष रंगत आली. द्वितीय सत्रात कथक नृत्यांगना व गुरू सायली मोहाडकर यांच्या संकल्पना व नृत्यदिग्दर्शनातून भक्तिनाद हा विशेष विठ्ठलभक्तिपर कथक नृत्याविष्कार सादर झाला. सायली मोहाडकर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी कथकच्या माध्यमातून विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा, भक्त-भगवंताचे अतूट नाते आणि भक्तिरसाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले. कथकच्या तालबद्ध आणि नादमय नृत्यभाषेतून अभंग, ताल, भाव आणि विठ्ठलनामाचा नाद यांचा सुरेख संगम साधण्यात आला. या भक्तिमय नृत्याविष्काराला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा :
नाशिक, सिडको, पंचवटी, सातपूर तसेच नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगावसह परिसरात श्रीकृष्ण जन्मोत्सव पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. बिटको चौकातील मुक्तिधाम मंदिर, जेलरोड मॉडेल कॉलनी आणि नवरंग कॉलनी येथील मंदिरांना सजावट व रोषणाई करण्यात आली. जेलरोडच्या वसंतविहार येथील श्रीकृष्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती. सर्वज्ञ सेवा ट्रस्ट व सर्वज्ञ सोशल फाउंडेशनतर्फे कार्यक्रम झाले. पंचक येथील सद्गुरूनगरमध्ये श्रीकृष्ण मूर्तीला मंगलस्नानानंतर पूजन करण्यात आले. देवळालीगावातील गाडेकर मळा येथील मंदिरात महापूजा झाली. लिंगायत कॉलनीतील महाप्रसाद वाटप झाले. सुरेश महानुभाव, अरुण महानुभाव, संजय महानुभाव यांनी संयोजन केले.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…