– अफजल पठाण
समाज बदलत आहे, विज्ञान पुढे जात आहे, शिक्षणाचा प्रसार होत आहे; मात्र काही गैरसमज अजूनही समाजाच्या मानसिकतेत घट्ट रुजलेले आहेत. शरीरावर पांढरे डाग दिसले की त्या व्यक्तीकडे वेगळ्या नजरेने पाहणे, तिच्यापासून अंतर ठेवणे, तिच्याबाबत कुजबुज करणे किंवा विवाहासारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये केवळ या कारणामुळे नकार देणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खरंतर पांढरे डाग हा एखाद्या व्यक्तीच्या माणूसपणाचा, स्वभावाचा किंवा कर्तृत्वाचा मापदंड असू शकत नाही.
शरीरावर पांढरे डाग दिसण्यामागे विविध कारणे असू शकतात. काही व्यक्तींमध्ये हे व्हिटिलिगो अर्थात कोड या त्वचारोगामुळे दिसतात, तर इतर काही त्वचारोगांमुळेही त्वचेवर पांढरे चट्टे येऊ शकतात. त्यामुळे शरीरावर पांढरा डाग दिसला की स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः व्हिटिलिगो हा संसर्गजन्य आजार नाही. तो स्पर्शाने, एकत्र जेवल्याने, कपडे वापरल्याने किंवा जवळ राहिल्याने दुसर्या व्यक्तीला होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना समाजापासून दूर ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय माहिती आणि जनजागृती हीच खरी गरज आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे अनेकदा पांढर्या डागांपेक्षा समाजाची नजर अधिक वेदनादायक ठरते. लोकांच्या प्रश्नांना, टोमण्यांना आणि उपेक्षेला सामोरे जाताना संबंधित व्यक्तीच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. लोक काय म्हणतील?, आपल्याशी कोण लग्न करेल?, आपल्याला स्वीकारले जाईल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दयेची गरज नसते; त्यांना सन्मान, समान वागणूक आणि आत्मविश्वास देणार्या सहकार्याची गरज असते. विशेषतः विवाहाच्या बाबतीत समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवर पांढरे डाग आहेत म्हणून तिचे शिक्षण, स्वभाव, संस्कार, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व दुर्लक्षित करणे योग्य नाही. आयुष्याचा जोडीदार निवडताना केवळ बाह्यरूपाला महत्त्व देण्याऐवजी व्यक्तिमत्त्व आणि माणुसकीला महत्त्व दिले पाहिजे.
कुटुंबाची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. मुलाच्या किंवा मुलीच्या शरीरावर पांढरे डाग दिसल्यास त्याला किंवा तिला इतरांपासून वेगळे करू नये. उलट प्रेमाने समजावून सांगून, योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन आणि आत्मविश्वास वाढवून त्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनीही या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. आज गरज आहे ती पांढरे डाग असलेल्या व्यक्तीला बदलण्यापेक्षा समाजाची नजर बदलण्याची. प्रसारमाध्यमे, आरोग्य विभाग, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे या विषयावर जनजागृती केली तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात.
आपण एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवरचा डाग पाहतो; पण त्या डागामागे लपलेले तिचे दुःख, संघर्ष पाहत नाही. डाग त्वचेवर असतात, व्यक्तिमत्त्वावर नाहीत. माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या त्वचेच्या रंगात नसून त्याच्या विचारांत, वागण्यात आणि कर्तृत्वात असते. म्हणून पांढरे डाग असलेल्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्याची संधी देणे ही माणुसकीची खरी परीक्षा आहे. आजपासून आपण व्यक्तीकडे आपुलकीने पाहूया; गैरसमज पसरवण्याऐवजी योग्य माहिती देऊ या आणि भेदभाव करण्याऐवजी माणुसकीची साथ देऊ या. समाजाच्या मनावर असलेले भेदभावाचे डाग दूर करण्यासाठी प्रबोधन, संवेदनशीलता आणि माणुसकीची गरज असते. त्वचेचा रंग नव्हे, माणुसकीचा रंग महत्त्वाचा!
It is not the color of the skin, but the color of humanity that matters!
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…