आस्वाद

त्येन त्यक्तेन भुंजिथा

ईश्वराने आपल्याला हे जीवन दिले आहे. मानव योनीत जन्म आणि बुद्धी दिली आहे. विज्ञान कितीक पुढे गेले तरीदेखील गर्भात शिशुची आखीव रेखीव बनावट आणि शिशू जन्म हे आजही ईश्वरीय वरदान आणि चमत्कार आहेत. टेस्टट्यूब मुलं आणि ’आयव्हीएफ’च्या सहाय्याने जन्माला घातलेली मुलेदेखील आहेत, पण हा आविष्कृत चमत्कार आहे, एक नक्कल आहे. आता रोबोटिक्स विज्ञान खूप पुढे गेले आहे आणि हुबेहूब माणसासारखे रोबोट तयार होत आहेत. माणसाची इच्छाशक्ती खूप शिकायची आणि समृद्ध व्हायची आहे, हे विकासाचे सुरेख लक्षण आहे.जग रात्रंदिवस विकासाकडे नुसती धाव घेत आहे, नवनवीन तंत्रज्ञान, औषधोपचार, नवनिर्माण वगैरे निरंतर अन्वर होत आहेत. त्याबद्दल आपण आपलीच पाठ थोपटून घ्यावी पण…आपल्याला एक निश्चित आयुष्य मिळाले आहे. खरोखर आपण ह्या सर्व वस्तूंचा उपभोग करू शकतो काय? आपल्यासमोर कामाचा, स्पर्धेचा, धनार्जनाचा, नात्यांचा इतका मोठा डोंगर असतो की कधी त्याला ओलांडून, कधी खोदून तर कधी डावलून आपण आपले अभिप्रेत मिळवून घ्यायची धडपड करत असतो. त्यात आतून-बाहेरून आपली नैतिकता आपले दर्शन आपली तत्त्व नेहमीच आपल्याला सावध करत असतात. आपण एका संस्कारक्षम आणि पौराणिक महत्त्व असलेल्या देशात राहत आहोत. प्रत्येक घरात संस्कार देऊन लहानपण, घडवले जाते, वाढवले जाते. तेच संस्कार आपल्या रक्तात रुजू होतात आणि शिरांतून वाहतात. आयुष्यात जितके महत्त्व भोगाचे आहे तितकेच त्यागाचेही आहे.
’त्येन त्यक्तेन भुंजीथा’ याचा अर्थ स्पष्ट आहे की, जीवनाचा भोग, त्यागासह करा. म्हणजे काय? उदाहरणार्थ, आपले काही असे राजनेते होते जे उच्चपदस्थ होते आणि सर्व साधनांचा, वस्तूंचा मनसोक्त उपभोग करू शकत होते, पण त्यांनी देशासाठी त्यागाचा मार्ग पत्करला. डॉ.राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, सामाजिक नेते किंवा सेवक म्हणूया तर बाबा आमटे आणि असे कित्येक क्रांतिवीर होते, जे उपभोगाची साधने सोडून, अगदी साधे जीवन जगण्यात ऐट मानत होते. त्यांच्याजवळ पैसा होता, सर्व सुख-साधने उपलब्ध होती, पद-प्रतिष्ठा आणि वेळ भरपूर होता. त्यांना कुणीच अडवणार नव्हते, पण तरीदेखील त्यांनी आपल्या अंतर्मनाच्या निर्णयाला अनुसरून त्यागाचे जीवन पत्करले आणि खूप आनंद आणि अभिमानाने ते जगले. दुनियेसाठी एक आदर्श उदाहरण म्हणून प्रस्तुत झाले मुख्य म्हणजे त्यांचा जराही गर्व न करता.
पुराणातील असे अनेक उदाहरण मिळतात. रामबंधू भरत यांंना कोण ओळखत नाही. श्रीराम जेव्हा 12 वर्षे वनवासाला गेले तेव्हा भरताचा राज्याभिषेक करून गेले होते. कारण सिंहासन राजाशिवाय राहत नसते आणि राजा दशरथ तर पुत्रवियोगाने आजारी होते. तेव्हा राज्याचा प्रभार भरताकडे होता, पण राजपद असूनदेखील भरत एकही दिवस सिंहासनारूढ झाले नाहीत. नंदीग्राम येथे (जे अयोध्येपासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे.) संन्यस्त जीवन व्यतीत करत राहिले, भुईवर झोपणे, फलाहार करणे आणि उपभोग्य प्रत्येक वस्तूचा त्याग करणे. सिंहासनावर त्यांनी श्रीरामाच्या पादुका ठेवल्या होत्या आणि त्यांनी श्रीराम येईस्तोवर तसेच त्यागमय जीवन व्यतीत केले. हा आहे त्याग, भोग करू शकत असतानादेखील त्याग हा भोगवादापेक्षा भारी होणे हीच भावना माणसाला एक विशिष्ट स्थान देते. जुने लोक आजही नव्या अनेक गोष्टींना महत्त्व देत नाहीत. वृद्ध लोक आजही आधुनिक वस्तूंसह राहण्यास प्रवृत्त होत नाहीत. याला कारण हेच की त्यांनी जुन्या काळापासून अनेक वस्तूंचा मनसोक्त उपभोग घेतला असतो आणि आता त्यांना अशा गोष्टींबद्दल काहीच स्वारस्य वाटत नाही आणि ते सहजच त्याचा त्याग करतात. आजही अनेक वस्तू त्यांच्यासमोर त्यांची मुलं आणून ठेवतात आणि याचा उपयोग तुम्हीच करा, असा अनुरोधही करतात, पण ते करत नाहीत. कुठल्याही वस्तूचा उपभोग, त्यागाच्या भावनेसह करणे हेच माणसाच्या सकारात्मक बुद्धीचे द्योतक आहे. कमलपत्रासमान पाण्यात राहून कोरडे राहता येत असेल तर निश्चितच माणूस इतरांपेक्षा वेगळा भासेल. आपणही हे करतो, पण आपल्या लक्षात येत नाही. आपण आपल्या मुलांसोबत, लहान भावंडांबद्दल हीच भावना ठेवतो. लहानपणापासून आपल्याला शिकवण असते की, सर्वांनी वाटून खाऊ खावा…काही कमी पडले तर मोठ्या लोकांनी त्याग करावा यामुळे लहान मुलांना आनंद होतो आणि आपल्याला ’दिल्याचे’ सुख मिळते. म्हणजेच आपणही त्यांना खाताना पाहून आनंदित होतो. हा त्याग लहान मुलंसुद्धा मोठ्यांकडून शिकतात. त्यागाची ही परंपरा आपण पुढे चालवतो. याच संवेदना काही अंशी पशूंमध्येसुद्धा आढळतात. कुत्रे, मांजरी हे सर्व खाण्याचे एकच भांडे असेल तर पिल्लांच्या खाण्याची वाट बघतात, त्यांचे झाल्यानंतर ते खातात, पण काहीच वेळेस. कारण ते पशू असतात. निष्ठा आणि त्याग हे परस्परसंबंधित आहेत. ज्याच्याबद्दल प्रेम असेल, निष्ठा असेल त्याच्यासोबत त्याग करायला कुणी मागे-पुढे पाहत नाहीत. प्रेमात त्याग हा असतोच. साधं सरळ उदाहरण आहे, स्त्रिया कुळधर्म कुळाचार किंवा काही पुजा असेल तर नैवेद्याचा स्वयंपाक करतात. त्या कधीच रांधलेले पदार्थ उष्टावत नाहीत. कारण हा स्वयंपाक आधी नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवायचा आहे. त्यानंतर सवाष्ण-ब्राह्मण आणि घरचे मोठे, पुरुष, मुले सर्व जेवतात. त्यानंतर घरची बाई आणि इतर स्त्रिया जेवायला बसतात. हा त्याग नव्हे काय? इतका मोठा चविष्ट स्वयंपाक करायचा आणि सर्वांत शेवटी जेवायला सवड मिळणार, पण हा आनंदाने केलेला त्याग आहे. हेच प्रत्येक स्त्री लहानपणापासून शिकते आणि तेच आपल्या लेकीला शिकवते. हेच संस्कार परंपरागत चालत राहतात. हा त्याग, भोग डावलून होणारा आहे. स्त्री हा जराही विचार करत नाही की हे इतके लोक यथेच्च जेवल्यावर, आपल्यासाठी काही उरलेच नाही तर?….हासुद्धा विचार तिला सुखावून जातो. कारण त्यात आपल्याद्वारे केलेले सर्व पदार्थ उत्तम झाले म्हणून ते संपले आणि सर्व मंडळी पोटभरून जेवली. तर हे आहे त्यागासह समाधान. यात भोग आहे आणि त्यागही आहे. नव्या पिढीतील सर्वांनीच ही भावना ठेवली तर त्यांच्यानंतर येणार्‍या प्रत्येक पिढीत हाच वारसा चालेल. जिथे भोग आहे, पण त्याचबरोबर त्यागही आहे.

Tyen Tyakten Bhunjitha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

15 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

15 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

16 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

16 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

16 hours ago