नाशिक

जल जीवन मिशन छे, हे तर ठेकेदारांचेच पोषण !

दोन वर्षे उलटूनही 80 पैकी केवळ 37 योजना पूर्ण, ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे पाणीटंचाई

सिन्नर : भरत घोटेकर
कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम करण्याची मुदत उलटून सहा – सहा महिने होऊनही तालुक्यातील 41 गावांच्या जलजीवन मिशन योजना अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही तालुक्यातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हर घर जल, हर घर नल हा नारा देत केंद्र शासनाने राबवलेल्या या योजनेतून ठेकेदारांचे मोठ्या प्रमाणात पोषण झाले असून योजनेचा उद्देश मात्र सफल होत नसल्याचे चित्र आहे.

तालुक्यात राबवण्यात आलेल्या 80 पैकी आतापर्यंत केवळ 37 योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यातीलही बहुतेक योजना केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्या असून उद्भव चुकल्यामुळे योजना मृगजळ ठरल्या आहेत. 2022 साली योजनांची कामे सुरू झाली. 2025 चा मे महिना सुरू होवूनही यातील 41 कामे अजूनही अपूर्णावस्थेत असल्याने या योजनांचे पाणी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अजूनही बहुतेक गावांची, वाड्यावस्त्यांना तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यात एकूण 80 पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. पैकी आगासखिंड, आशापुरी, उजनी, एकलहरे, औंढेवाडी, कारवाडी, कीर्तांगळी, कोमलवाडी, खोपडी बुद्रुक, जयप्रकाशनगर, जामगाव, जोगलटेंभी, डुबेरे, दहिवाडी, दुसंगवाडी, देशवंडी, नळवाडी, पांढुर्ली, पाथरे बुद्रुक, पास्ते, पिंपरवाडी, पिंपळगाव, पिंपळे, फुलेनगर, ब्राह्मणवाडे, बेलू, मलढोण, मीठसागरे, वडझिरे, वडांगळी, वारेगाव, विंचूरदळवी, श्रीरामपूर, सरदवाडी, सुरेगाव, सोनांबे, सोमठाणे, हिवरे या 37 गावांच्या योजना पूर्ण झाल्या आहेत. पैकी जोगलटेंभी आणि पांढुर्ली या दोन गावांचा पाणीपुरवठा बंद आहे.

अशी आहे तालुक्यातील योजनांची स्थिती
एकूण मंजूर योजना – 80
पूर्ण झालेल्या योजना – 39
पाणीपुरवठा सुरू असलेल्या योजना -37
पाणीपुरवठा बंद असलेल्या योजना – 02
प्रगतीपथावरील योजना – 41

एक गाव, 35 वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा

मे महिना सुरू झाल्याने पाणीटंचाई वाढली आहे. तालुक्यात निर्‍हाळे या एका गावासोबतच 35 वाड्यांमध्ये सध्या 6 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 24 खेपांच्या माध्यमातून एक लाख 80 हजार लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय आणखी सहा गावांचे प्रस्ताव टँकर मंजुरीच्या अंतिम प्रतीक्षेत आहेत.

जागांमुळे रखडली कामे

अनेक ग्रामपंचायतीकडून जलकुंभासाठी जागा देण्यास उशीर झाला. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी येण्यासही विलंब होत असल्यामुळे कामे संथगतीने सुरू आहेत. ज्या ठेकेदारांनी दिरंगाई केली, त्यांना दंड ठोठावून मुदतवाढ देण्यात आली आहे.
अंकित जाधव, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

ठेकेदारांनीच बनवली अंदाजपत्रके

पाणीपुरवठा विभागाचा शाखा अभियंता यांनी त्या – त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना हाताशी धरून गरजेनुसार योजनेचे आराखडे तयार करणे आवश्यक होते. मात्र ठेकेदारांनीच या योजनांचे आराखडे आपल्या सोयीनुसार बनून ते मंजूर करून घेतले. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये आवश्यक असलेल्या वाड्यांवर जल जीवन मिशनची जलवाहिनी पोहोचली नाही. याशिवाय बहुतेक ठिकाणचे उद्भव चुकीच्या ठिकाणी झाल्याने कामे पूर्ण होऊनही पाणी नसल्यामुळे या योजना कुचकामी ठरल्या आहेत.

पाइपलाइनची लाखो रुपयांची बिले उकळली

जल जीवन मिशन योजनेत जलवाहिनी टाकण्यात अधिकचा नफा असल्याने अनेक ठेकेदारांनी जलवाहिन्या टाकून लाखो रुपयांची देयके पदरात पाडून घेतली. मात्र, जलकुंभ आणि इतर कामे करण्यात स्वारस्य नसल्याने या योजना रखडल्या आहेत. परिणामी, कामाची मुदत उलटूनही ठेकेदार प्रलंबित कामे करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

Gavkari Admin

Recent Posts

पाऊस, वादळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…

11 hours ago

येवला तालुक्यात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा

विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…

12 hours ago

नांदगावला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक

नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांसोबत आमदार…

12 hours ago

नवीन घरातून 83 हजार रुपयांचा ऐवज लंपास

आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…

12 hours ago

वारसहक्काच्या वादातून सख्ख्या भावाचे अपहरण?

सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…

13 hours ago

कोचिंग क्लासेस चालवणार्‍या महिलेच्या घरात घरफोडी; 2 लाख 61 हजारांचा ऐवज लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील एका कोचिंग चालवणार्‍या महिलेच्या घरात…

13 hours ago