नवी दिल्ली :
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कंपन्यांनी अखेर बुधवारी (दि. 1 एप्रिल) व्यावसायिक एलपीजीच्या सिलिंडरमध्ये 195.50 रुपयांची वाढ केली. ही दरवाढ 19 किलोच्या सिलिंडरना लागू आहे. तथापि, सरकारी कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. घरांमध्ये वापरल्या जाणार्या एलपीजी गॅसचे दर जैसे थेच आहेत. मात्र, व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोेलियम आणि हिंदुस्तान पेट्रोेलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय निकष व विनिमय दरांवर आधारित राहून, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एव्हिएशन टर्बाईन फ्युएल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये सुधारणा करतात.
जागतिक तेल किमतींमध्ये वाढ
पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जापुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे, जागतिक तेल किमतींमध्ये सुमारे 50 टक्यांची वाढ झाली आहे. याचा परिणाम एलपीजीच्या किमतींवरही दिसून येत आहे. दुसरीकडे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या तुटवड्याच्या खोट्या बातम्या वणव्यासारख्या पसरत आहेत. पेट्रोेलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही केवळ एक अफवा असल्याचे सांगितले आहे. सत्य हे आहे की देशात पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
गृहिणींना तूर्तास दिलासा
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सरकारने वाढ केली असली, तरी घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 7 मार्च 2026 रोजी 60 रुपयांनी वाढविण्यात आली होती. दिल्लीमध्ये हा सिलिंडर आता 913 रुपयांना उपलब्ध आहे. यामुळे येणार्या काळात सरकार घरगुती गॅसच्या किमती वाढविते का, ते पाहावे लागेल.
19 किलोचा सिलिंडर दोन हजारांवर
व्यावसायिक सिलिंडरांच्या किमतींमधील ही वाढ हा जागतिक तेल किमतींमध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,078.50 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 114.50 रुपयांनी वाढवली होती.
Judicial custody in the morning; Kharat back in SIT custody in the afternoon