फसवणुकीचा आरोप, एल्गारतर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील जमीन प्रकरणात गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला. शेतकर्याची बनावट संमती दाखवून लेआउट मंजूर केला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी पत्रकार परिषद घेत बाधित आदिवासी शेतकर्यांसह ही माहिती दिली.
माहितीनुसार, गट क्रमांक 271 व 272 या जमिनी बिगर आदिवासी शेतकरी संजय करंबळेकर यांच्या मालकीच्या असून, शेजारील गट क्रमांक 273 ही जमीन आदिवासी शेतकरी प्रमोद सदाशिव सोनवणे (रा. ठाणे) यांच्या नावावर आहे. लेआउट मंजुरीसाठी तिन्ही गटांचा एकत्रित अभिन्यास तयार करून नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावात गट क्रमांक 273 मधून 12 मीटर रुंदीचा रस्ता दाखविण्यात आला. मात्र, संबंधित आदिवासी शेतकर्याची कोणतीही अधिकृत संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.
पत्रकार परिषदेत मधे यांनी दावा केला की, 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र बनावट असून, सहीही खोटी आहे. या प्रकारात मानस हॉटेलचे माजी संचालक यांनी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला. यामुळे आदिवासी शेतकर्यांची फसवणूक झाली, तसेच शासनालाही चुकीची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या जमिनीवर कोणताही वापरबदल करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असताना ती न घेता लेआउट मंजूर करून घेतल्याचा आरोप करत संबंधितांवर अॅट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकर्याला न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तक्रारीची दखल घेत कागदपत्रांची पडताळणी सुरू करून संबंधित फसवणूक करणार्या मानस हॉटेलचे माजी संचालक संजय करंबळेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बाधित शेतकरी व एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधे यांनी केली आहे.
आदिवासी व्यक्तीची खोटी सही करून जमीन बळकावण्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर आणि शिक्षेस पात्र असा फौजदारी गुन्हा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 36 व 36- नुसार आदिवासींची जमीन गैर-आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरित करणे स्पष्टपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारात खोटी सही व बनावट कागदपत्रांचा वापर झाल्यास संबंधित व्यवहार रद्द होऊन जमीन पुन्हा मूळ आदिवासी मालकाला परत मिळू शकते, तसेच दोषींवर अटक, दंड व कारावासाची कारवाई होऊ शकते.
– भगवान मधे, संस्थापक अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना
Layout approved by showing fake consent in Igatpuri
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…