बाप्पा आले, विघ्न दूर होणार! ही भाबडी आशा घेऊन तुम्ही बाप्पाची उपासना करत असाल. लेखाच्या पहिल्या भागात बघितलेच आहे की, आपल्या जीवनातील विघ्न, अडचणी, अडथळे, तक्रारी किंवा समस्या आपल्या बाहेरून नव्हे, तर आपल्या आतूनच उत्पन्न झालेल्या असतात. त्यावर विचार करून विघ्नांची कारणं, अर्थात त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा सोर्स (उगम, स्रोत) शोधायचे आहे. त्यासाठी बाप्पांना आपण घरी आणले आहे, त्याच बाप्पांकडून काही संकेत, सूचना, इशारे मिळतात का बघूया ना!
गणपती हे ज्ञानाचे प्रतीक आहे, असे मानले जाते. ज्ञानासोबतच विद्या, विद्वत्ता, समृद्धी आणि संस्कारांचे गुण आपोआपच बाप्पांना अवगत होतात. हत्तीचे मस्तक असलेली ही देवता असे दर्शवते की, तुमच्या शरीराच्या मनाने तुमचे मस्तिष्क मोठे असावे. मस्तिष्काच्या विकासावर भर द्यावा, अर्थात आपल्या मेंदूच्या विकासाला प्राधान्य असावे. शिक्षण, प्रशिक्षण घेऊन, लिखाण, वाचन करून, नवनवीन कला अवगत करून आपल्या ज्ञानाची वृद्धी करत राहावी याची आठवण करून देण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत. हे सांकेतिक संस्कार ओळखावा. ज्ञानाने आणि विद्येने वैचारिक प्रगल्भता प्राप्त होते. आपण तार्किक विचार करण्यास सक्षम होतो.
स्वतःची क्षमता वाढल्याने कुणावर विसंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, स्वतःच्या अडचणी स्वतः दूर करू शकतो. शिक्षण म्हणजे केवळ शालेय किंवा प्रचलित शिक्षण नव्हे, तर
स्वतःतील कौशल्य वाढविणे, एखाद्या विषयात तज्ञता प्राप्त करणे, निपुणता विकसित करणे हेही ज्ञानाचेच विविध पैलू. याने मेंदूचा विकास होतो. हल्ली तर ज्ञान मिळविण्याची साधनेसुद्धा अनेकप्रकारे उपलब्ध आहेत. हा डब्बा, जो तुम्ही हातात धरला आहे, त्यात तर ज्ञानाचा अथांग सागर सामावलेला आहे, याचा कधी विचार तरी केला आहे का? बघा… कसा वापर करतोय आपण या डब्याचा?
हत्तीचे मस्तक असलेल्या बाप्पांचे विचार आणि आचार जाणून घ्यावे. हत्तीचे गुण समजून घ्यावे व ते आत्मसात करावे. हत्ती म्हणजे भारदस्त, वजनदार, अवाढव्य परंतु शांत, संयमी, प्राणी आहे. हत्तीची चाल अशी की आजूबाजूच्या लोकांमुळे आणि परिस्थितीमुळे विचलित न होता, आपापल्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो, म्हणूनच कुत्ते भोंके हजार, हत्ती चले बाजार, अशी म्हण प्रचलित आहे. एकट्याने कधी फिरत नाही, सर्वांसोबत आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करत असतो. स्वतः जरी बलाढ्य असला तरी इतरांना अकारण त्रास देत नाही, की त्रास होईल असेही वागत नाही. विनाकारणची दंगामस्ती नाही, टवाळखोरी नाही, उपद्रव नाही. नाही तर मनुष्य, थोडे काही मिळवले तरी जग जिंकल्यागत वागत सुटतात. हाती सत्ता, पद, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की उपद्रव सुरू करतात. गणपतीतल्या त्या हत्तीकडून शिकावा तो शांतपणा, नम्रपणा, संयम. शरीर मोठे म्हणून मांसाहरच केला पाहिजे, याला अपवाद म्हणजे हत्ती. मांसाहारात होणारी हिंसा टाळून नैसर्गिक शाकाहार करूनही भल्या मोठ्या शरीराची भूक भागवली जाऊ शकते, हे हत्तीशिवाय दुसरे कोण आहे शिकवायला? सर्व प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वाधिक संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या प्रगत प्राणी आहे. नर-मादी नाते तसेच आपल्या अपत्यांची काळजी घेण्यात हत्तीसारखा दुसरा
प्राणी नाही.गणपती बाप्पाला हत्तीच्या मस्तकासोबत सोंड बोनस म्हणून मिळालेली आहे. चार हात आणि दोन पाय असलेल्या बाप्पांच्या क्रियाशीलतेत सोंडेने भर पडते. ती कशी? असे म्हणाल तर… हाताने करता येतील अशी अनके कामे हत्ती आपल्या सोंडेने करतो. तशीच कामे गणपती बाप्पाला करता आल्याने बाप्पांची कार्य करण्याची क्षमता, अर्थात कृतिशीलता वाढते. बाप्पा आपल्या सांगताय की तुम्ही स्वतःला असे बनवा जणू काही तुम्हाला चार हात, दोन पाय आणि वाढीव कार्य आणि कृती करण्यासाठी तुमच्याकडे सोंडदेखील आहे. इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक प्रमाणात क्रियाशील कसे बनू शकता, यावर भर देणे अपेक्षित आहे. कमी बोलून, कमी वेळेत, कमी कष्टाने अधिक प्रभावी बनण्यावर विचार करावा, असेच काहीसे बाप्पांना सुचवायचे आहे, म्हणून तर ते आपल्या घरी आलेले आहे. पृथ्वीच्या प्रदक्षिणेपेक्षा आई- वडिलांना घातलेली प्रदक्षिणा ही अधिक पुण्यवान असते, ही गणपती बाप्पांची शिकवण आजच्या काळात सर्वाधिक गरजेची आहे. आपण आजवर कितीदा आई- वडिलांना प्रदक्षिणा घातल्यात? प्रदक्षिणा सोडा, रोज त्यांचे पाया पडून आशिर्वाद तरी घेतो का? अपवाद असू शकतात, परंतु वृद्धाश्रमांची आणि आधाराश्रमांची वाढती संख्या हेच सूचित करते की, आई-वडिलांप्रतिचे नाते, प्रेम आणि भावनिक नाळ तुटत चालले आहे. चला, किमान या वर्षीच्या गणेशोत्सवापासून गणेशाचा आदर्श घेऊन रोज आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊया. हयात नसलेल्या पालकांची न चुकता रोज स्मरण करून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करूया!
बाप्पा पाच किंवा दहा दिवस आपल्या घरी का येतात? एक-दोन दिवसांत त्यांचे मन भरत नसावे का? असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला! मलाही पडतो. पाच किंवा दहा दिवस घरी राहून ते आपल्या घरातील वातावरणाचा अंदाज घेत असावे, असे मला वाटते. या दिवसांत घरात कसे चैतन्याचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण असते, नाही का? घरातील सर्व मंडळी कशी एकमेकांना सहकार्य करतात, कामात हातभार लावतात, मदत करतात, सांभाळून घेतात, समजून घेतात. घरात छान सजावट केलेली असते, लायटिंग केल्याने घर अगदी उजळून गेलेले असते. छान सुवासिक फुलांचा, धूप अगरबत्त्यांचा सुगंध दरवळत असतो.
रोज काहीना काही प्रसाद बनवला जातो, गोडधोड मिठाई पक्वान्न बनवले जातात. एकंदर काय तर खूप छान अगदी नजर लागावी असे वातावरण असते. मग असेच वातावरण वर्षभरातील उर्वरित 355 दिवस राहते का? बघा…! नसेल राहत तर आजच निश्चय करा की हे आनंदाचे, प्रसन्नतेचे, सहकार्याचे, मांगल्याचे आणि भावबंधनाचे वातावरण
वर्षभर टिकून ठेवूया. कुटुंबातील किंवा शेजारील प्रत्येकाशी चांगली वागणूक ठेवेल. जशी मी समोरच्याकडून अपेक्षा करतो, तशीच वागणूक मी समोरच्यासोबत करेल, इतके जरी आज ठरवले तरी गणपती बाप्पा निश्चितच तुमच्यावर प्रसन्न होतील, याची तुम्हाला
शाश्वती देतो.
Learn about Bappa’s thoughts and conduct.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…