नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील जयभवानी रोडवरील वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात शुक्रवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले होते.
सकाळी आठला बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्याने नागरिक कुरेशी सय्यद व मुन्ना सय्यद यांनी ही माहिती शिवसेनेचे विक्रम कदम यांना फोनवर दिली. कदम यांनी जाऊन खात्री केली. त्यानंतर वनाधिकार्यांना माहिती दिली. वनविभागाने नागरिकांच्या मदतीने बिबट्याला म्हसरूळच्या पुनवर्सन केंद्रात हलविले. जयभवानी रोडवर दाट लोकवस्ती आहे. शेजारी लष्कराचा दाट झाडीचा परिसर आहे. त्यामुळे त्या भागातून दिवसाढवळ्या बिबटे नागरी भागात येत आहेत. येथून जवळच असलेल्या वडनेर भागात बिबट्याने दोन महिन्यांत दोन बालकांचे बळी घेतले होते. तसेच अनेक पाळीव जनावरे, कुत्री फस्त केली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दोन वेळा वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. जयभवानी रोड भागात बिबट्यांना पकडण्यासाठी तीन महिन्यांपासून पिंजरे लावण्यात आले होते. त्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, नागरी वस्तीत पिंजरे लावल्याने त्यातील कोंबड्या काही लोक चोरून नेत असत. त्यामुळे पिंजर्याच्या जागा बदलण्याची मागणी शिवसेनेचे विक्रम कदम, गणेश कदम, सागर जाचक, राजेंद्र थोरात, सलीम सय्यद आदी नागरिकांनी केली. वनविभागाच्या साथीने तीन आठवड्यांपूर्वी पिंजर्यांची जागा बदलण्यात आली. आज पिंजर्यात बिबट्या अडकल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. नाशिकरोड, एकलहरा, देवळाली कॅम्प, देवळालीगावचा परिसर, वडनेरगेट, जयभवानी रोड येथील मनोहर गार्डन, औटे मळा, डोबी मळा, जाचक मळा, पाटोळे मळा, लोणकर मळा, थोरात मळा, चव्हाण मळा भागात अजूनही बिबटे आहेत. वनविभागाने नाशिक जिल्हा बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावे, बिबट्यांच्या प्रजनन नियंत्रणावर उपाययोजना कराव्यात, बिबट्यांचे स्थलांतर व्यवस्थापन करावे, बिबटे पकडल्यानंतर त्याच्या शेपटीत चीप बसवावी, लष्कराच्या कुंपणावर लेजर आधारित सायरन लावावे, अशी मागणी विक्रम कदम व नागरिकांनी केली आहे.
मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी सांगितले की, रियाझ सय्यद हे सकाळी बिबट्या पिंजर्यात अडकला की नाही हे बघायला गेले असता, बिबट्या मादी पिंजर्यात अडकून निद्रावस्थेत होती. चार तासांनंतर पिंजरा हलवण्यात आला. पिंजरा शेतात व चिखलात होता. तो हलविताना कसरत करावी लागली. त्यातच नागरिकांची बिबट्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली व मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी होती. जयभवानी रोड येथील मळे विभागात आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी केली आहे. दरम्यान, रात्री परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात असतो. बिबट्या आला की काय, अशी नागरिकांमध्ये भीती असते.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…