नाशिक

अंधश्रद्धेला कायमची मूठमाती देऊया..!

जगात सर्वांत जास्त अंधश्रद्ध लोक भारतात आहेत. आपला भारत देश अंधश्रद्ध लोकांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. बुलढाण्याच्या सैलानी बाबाला आणि परभणीच्या तुरत पिराला भेट दिल्यावर आपल्याला कळेल की, आपल्या देशात अंधश्रद्ध लोक किती आहेत? त्यात अंधश्रद्धाळू महिलांचे प्रमाण किती आहे? तिथे किती सुशिक्षित लोक येतात व किती अशिक्षित लोक येतात? याचा अंदाज आपल्याला लागेल. पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रमाणात देव-देव करतात, शकुन-अपशकुन पाळतात व दगडधोड्यांना पूजतात. उपासतापास करणे, कोणता तरी नवस बोलणे आणि नवस फेडण्यासाठी कंदुरी करणे, त्यासाठी जिवंत बोकडाचा बळी देणे, सोन्या-चांदीचे दागिने देवाला अर्पण करणे, हे काम महिला कटाक्षाने करतात. म्हणतात ना, महिलांचा स्वभाव जरा भोळाच असतो. कदाचित ते खरेही असेल. म्हणूनच महिला कोणत्याही भोंदूबाबाला सहज बळी पडतात. भोंदूबाबा त्यांना फसवून त्यांचे आर्थिक शोषण तर करतोच; परंतु त्यांचे लैंगिक शोषण करायलासुद्धा मागे-पुढे पाहत नाही. दारावर भगवी वस्त्रे परिधान करून आलेले भोंदूबाबा महिलांना गोड गोड बोलून त्यांच्याकडून निघेल तेवढा पैसा उकळतात. महिलांना करणी, भानामती, भूतबाधा आणि आसरा-म्हसोबा लागला म्हणून सांगतात. त्यांना कसले तरी अमुकतमुक क्रियाक्रम करायला लावतात. भोंदूबाबा जे सांगेल त्या गोष्टी महिला मन लावून ऐकतात, तसे आचरण करतात. शिकलेले लोक असोत किंवा अडाणी लोक असोत, ते बर्‍यापैकी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले दिसतात. खरेतर शिकलेल्या लोकांनी अंधश्रद्धेला मूठमाती द्यायला हवी; परंतु तसे न करता उलट शिकलेले लोक अडाणी लोकांपेक्षा अधिक अंधश्रद्धेच्या आहारी जातात.
सध्या जर आपण कोणत्या मंदिरात किंवा बुवा-बाबाकडे गेलात तर आपल्याला असे दिसून येईल की, तिथे सर्वार्ंत जास्त सुशिक्षित लोकांचीच गर्दी अधिक प्रमाणात पाहायला मिळते. शिक्षण शिकूनही जर लोक अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर शिक्षणव्यवस्था कुठेतरी भ्रष्ट झाली आहे, असेच म्हणावे लागेल. शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकवला जातो, तरीसुद्धा लोक अंधश्रद्धा का पाळतात? म्हणजे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यात कुठेतरी कमी पडत आहेत, असेच म्हणावे लागेल. शकुन-अपशकुन व आसराम्हसोबा लागला, मांजर आडवी गेली, कोणाची नजर लागली म्हणून बहुतांश लोक बुवा-बाबाकडे जातात, भोंदूबाबांनी जेवढ्या वार्‍या सांगितल्या तेवढ्या वार्‍या नित्यनेमाने करतात. त्याला देवाच्या नावावर सोन्या-चांदीचे अलंकार करून देतात. भोंदूबाबाला भरपूर पैसा देऊन शेवटी ते कंगाल होतात. आजार काही कमी होत नाही. उलट आजार बळावत जातो. मग मात्र त्यांना दवाखाना आठवतो. शेवटी त्यांना दवाखान्याच्या पायर्‍या चढाव्या लागतात. भोंदूबाबाने आपल्याला फसवले असे त्यांच्या लक्षात येते. मग मात्र त्यांना पश्चाताप होतो. त्यांच्या मनात भोंदूबाबाबद्दल तिरस्कार निर्माण होतो. नंतर ते आयुष्यात चुकूनही भोंदूबाबाकडे जात नाहीत. त्यांच्या मनात असणारा भोंदूबाबाबद्दलचा विश्वास व आदर कमी होतो; परंतु महिला मात्र फार अंधश्रद्धाळू व भोंदूबाबाच्या भक्त असतात. त्या शेवटपर्यंत अंधश्रद्धेला चिकटून राहतात. त्यांना कितीही विज्ञानाचे महत्त्व सांगा, करणी, भानामती, भूतबाधा, शकुन-अपशकुन, आसरा-म्हसोबा हे निव्वळ थोतांड आहे. याला बळी न पडता विज्ञानाचा आधार घेऊन व विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून महिला व पुरुषांनी एकत्र येऊन अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा संकल्प करूया. महिलांना देव नाही यावर विश्वास नसतो. महिला दगडात देव आहे म्हणून दगडाचीदेखील पूजा करतात. सोमवार, शनिवार उपासतापास करतात. म्हणून महिलांच्या मनातील अंधश्रद्धा निघेल का? याची शाश्वती मी तर देऊ शकत नाही. कारण महिलांच्या मनात अंधश्रद्धा पक्की घर करून बसलेली असते.
कोणताही आजार झाला की, काही जणांना सवयच असते भोंदूबाबाकडे घेऊन जाण्याची. भोंदूबाबाच्या नादात माणसाचा जीव जातो आणि भोंदूबाबा चांगलाच पावतो. भोंदूबाबा, देवदेवता, आसरा-म्हसोबा व करणी-भानामती हे सर्व थोतांड आहे यावर विश्वास ठेवून
स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. ज्या बाईच्या अंगात येते, त्या बाईला भानामती किंवा करणी केली, असे म्हणतात. अंधश्रद्धा ही माणसाला घर उद्ध्वस्त करायला लावणारी जबरदस्त बाब आहे. ज्या माणसाला मानसिक आजार झालेला असतो, नेमके त्याच माणसाला करणी, भानामती व भूतबाधा झाला असे म्हणतात. ज्या बाईच्या अंगात देव येतो, त्या बाईच्या अंगात काय देव संचारत नाही, तर त्या बाईला मानसिक आजाराने ग्रासलेले असते. भोंदूबाबाकडे न जाता मनोरुग्णालयात जाऊन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मानसिक आजार म्हणजेच करणी, भानामती, भूतबाधा कायमचा कमी करता येऊ शकतो. कोणत्याच भोंदूबाबाकडे व बुवाबापूकडे न जाता सरळ मनोरुग्णालयात जाऊन औषधोपचार चालू करावा, नक्कीच तुमच्या अंगातील करणी, भानामती, भूतबाधा व जादूटोणा कायमचा निघून जाईल. नाहक भोंदूबाबाकडे जाऊन
स्वतःचे आर्थिक व शारीरिक नुकसान करून मृत्यूला जवळ करू नका. आतापर्यंत भोंदूबाबाच्या नादी लागून कित्येकांचे प्राण गेले आहेत. आपल्या देशात अनेक संत, महात्मे, महापुरुष, विचारवंत व थोर समाजसुधारक होऊन गेले. त्यांनी या देशातील बहुजन जनतेला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली, भाषणे दिली व विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासायला सांगितला. महात्मा जोतिराव फुले यांनी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ले चढवले. संत गाडगे महाराजांंनी अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी बहुजन जनतेला कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर हातोड्याचे घाव घातले. कीर्तनातून व वर्तनातून अंधश्रद्धेला चांगलाच दणका दिला. संत गाडगेबाबा म्हणायचे की, बांधवांनो, देव दगडात नसून माणसात आहे. देव कोणत्या दगडात नाही, कोणत्या मंदिरात नाही ना कोणत्या देवळात नाही, तर देव माणसात आहे, मानव प्राण्यात आहे. देव आई-वडिलांमध्ये आहे, देव आपल्या समस्त महापुरुषांमध्ये आहे. त्यांची पूजा करा. त्यांचे विचार आत्मसात करा आणि अंधश्रद्धेला कायमची मूठमाती देऊन विज्ञानाचा सन्मान करा. या देशात जेवढे महापुरुष व विचारवंत होऊन गेले. त्यांनी अंधश्रद्धेला कधीच मानले नाहीत तर त्यांनी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री सर्वाधिक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्यासुद्धा. छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत अंधश्रद्धेला थारा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज विज्ञानवादी राजे होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धेचा कायमचा नायनाट करण्यासाठी जीवनभर अंधश्रद्धेवर कुर्‍हाडीचे घाव घालत राहिले. त्यांचा अंधश्रद्धामुक्त भारत करण्याचा विचार दुर्दैवाने पूर्ण होऊ शकला नाही. काही समाजकंटकांनी व सनातनी विचारधारेच्या लोकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. डॉ. दाभोलकरांनी गावोगावी व खेडोपाडी जाऊन लोकांना भाषणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. भोंदूबाबा व बुवाबाजीवर कडाडून टीका केली. भोंदूबाबाचे काळे कारनामे व त्यांचे खरे पितळ उघडे पाडले. पण आमचे लोक पुस्तकांचे वाचन करायला तयार नाहीत. मोबाइलच्या दुनियेत पुस्तकांचे वाचन फार कमी झाले आहे. आपल्याला अंधश्रद्धेतून बाहेर निघण्यासाठी अगोदर आपल्याला महापुरुषांचे विचार आत्मसात करून देशात त्यांच्या सुविचारांची पेरणी करावी लागेल आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धेला कायमची मूठमाती द्यावी लागेल.
थोर विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, ज्या दिवशी मंदिराकडे जाणार्‍या रांगा वाचनालयाकडे वळतील त्या दिवशी आपला देश प्रगतीचे एक दमदार पाऊल टाकेल. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली फार मोठी कीड आहे. अंधश्रद्धा माणसाला पोखरून काढते. ज्या दिवशी आपल्या देशातील लोक अंधश्रद्धेला मूठमाती देऊन विज्ञानाला स्वीकारतील त्या दिवशी आपल्या देशाच्या विकासाचा आलेख उंचावल्याशिवाय राहणार नाही.

Let's put an end to superstition forever..!


Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago