नाशिक

चाकू हल्ल्यातील खुनाच्या आरोपीला जन्मठेप

सरकारी वकील दिवटे यांचा युक्तिवाद निर्णायक; मुख्यमंत्र्यांच्या 95% उद्दिष्टाच्या दिशेने संगमनेरचे पाऊल

संगमनेर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाचे उद्दिष्ट जाहीर केले होते की, राज्यातील गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण (कन्विक्शन रेट) सध्याच्या केवळ 50% वरून थेट 95% वर न्यायचे आहे. या घोषणेचे पडसाद अजून विरले नाहीत, तोच संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयातून आलेल्या एका निकालाने या उद्दिष्टाची दिशा किती योग्य आहे, हे अधोरेखित केले आहे.
सोमवारी, दि. 30 मार्च 2026 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील चाकूहल्ल्याच्या खुनाच्या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील जयंत दिवटे यांचा युक्तिवाद आणि सबळ पुरावे यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी मुख्य आरोपी राहुल देवीदास काळे यास जन्मठेप व वीस हजार रुपयांचा दंड, देवीदास हरिभाऊ काळे यास दहा वर्षे साधी कैद व सोळा हजार रुपये दंड, तर रामनाथ सावित्रा गायकवाड यास दहा वर्षे सक्तमजुरी व सोळा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे रविवारी दि. 21 जून 2020 रोजी देवीदास हरिभाऊ काळे याच्यासह अन्य एका महिलेसोबत प्रवीण बाळासाहेब चत्तर यांच्या कुटुंबाशी शाब्दिक चकमक व मारामारी झाली. प्रतीक चत्तर हा काळे यांना समजून सांगत असताना काळे याने त्याच्या हातातील दगड त्यास फेकून मारला. त्यामुळे प्रतीकच्या डोक्याला लागले होते. काळे याने त्याचवेळी बाळासाहेब चत्तर यास ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आरोपींनी दुसर्‍याच दिवशी सूड उगवला आणि एका निरपराध माणसाचा जीव गेला.
सोमवारी, 22 जून रोजी राहुल देवीदास काळे, देवीदास हरिभाऊ काळे व रामनाथ सावित्रा गायकवाड यांनी चत्तर यांच्या चिकन शॉपवर जाऊन शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. राहुल काळे याने हातातील चाकूने बाळासाहेब चत्तर यांच्या पोटात व छातीत खुपसत त्यांची हत्या केली. तसेच त्यांचा मुलगा प्रतीक याच्या दंडावर आणि पाठीवर वार करून घटनास्थळाहून पळ काढला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी आरोपीस तत्काळ अटक केली होती. पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासी अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.
पोलिसांनी पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यांत त्याचा शोध घेण्यासाठी फिल्डिंग लावली. मात्र, पप्पू कादरी यांना एक धागा सापडताच त्यांनी आरोपी राहुल काळे याला नगर येथून अटक केली. इतक्यावरच हे थांबले नाही. राहुल काळे हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनही त्याच्या मित्रांनी त्यास आश्रय दिला. राहुल काळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यामुळे गावात दहशत होती. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी त्यास बेड्या ठोकून गावातून फिरवण्याचे ठरवले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले होते. पुढे जाऊन शिक्षा लागेल या भीतीपोटी आरोपी सराईत गुन्हेगारांसोबत जेल तोडून पसार झाला होता. पण स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांतच पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच सांगितले की, महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये फक्त 50% गुन्हे सिद्ध होतात. म्हणजे निम्मे आरोपी तांत्रिक कारणांमुळे, पुराव्यांच्या अभावामुळे किंवा साक्षीदार फितूर झाल्यामुळे निर्दोष सुटतात. हे प्रमाण 95% वर नेण्यासाठी पोलिसांचा तपास, पुरावे जमविणे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद या तिन्ही घटकांमध्ये आमूलाग्र सुधारणा आवश्यक आहे.
संगमनेरचा हा खटला याचेच आदर्श उदाहरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ पंचनामा केला, भौतिक पुरावे जमवले, आरोपी पळाला तरी पकडला, जेल फोडून गेला तरी पुन्हा पकडला आणि सरकारी वकील दिवटे यांनी सहा वर्षांच्या दीर्घ सुनावणीत एकेक पुरावा बिनतोड मांडून गुन्हा सिद्ध केला. हेच ते मॉडेल आहे, जे मुख्यमंत्र्यांना राज्यभर रुजवायचे आहे.

गुन्हेगाराचा कार्यकाळ संपला, जनतेची प्रतिक्रिया

ही शिक्षा म्हणजे आरोपी राहुल काळेचा गुन्हेगाराचा कार्यकाळ संपवणारी आहे, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. ज्या कुटुंबाने सहा वर्षे न्यायासाठी संघर्ष केला, त्यांना आज न्याय मिळाला. वडगावपानच्या गावकर्‍यांनी या निकालाचे स्वागत केले असून, पोलीस यंत्रणा व सरकारी वकिलांच्या परिश्रमाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांचे 95% गुन्हा शाबीत करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर संगमनेरसारखे निकाल राज्याच्या कानाकोपर्‍यांतून यायला हवेत, हाच या प्रकरणाचा खरा संदेश आहे.

15 साक्षीदार, सबळ पुरावे आणि दिवटे यांचा युक्तिवाद

हा खटला तब्बल सहा वर्षे (2020 ते 2026) चालला. या काळात न्यायालयात एकेक पुरावा, एकेक साक्षीदार सरकारी पक्षाने अत्यंत काटेकोरपणे मांडले. या खटल्यात 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यात वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरिया यांची महत्त्वाची साक्ष झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी अनेक सबळ पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्याच्या आधारावर सरकारी वकील जयंत दिवटे यांनी प्रबळ युक्तिवाद करून प्रतिवाद्यांचा युक्तिवाद खोडून काढला. या गुन्ह्याच्या निकालासाठी पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल नयना पंडित, शीतल तोरकडी यांनी महत्त्वाचे कामकाज पाहिले.

 

Life sentence for murder accused in knife attack

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

7 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

8 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

8 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

8 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

8 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

8 hours ago