दोन वर्षांपूर्वी बांगलादेश आणि एक वर्षापूर्वी नेपाळमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली देशभर जो हैदोस घातला होता, तो जगभरात चर्चेचा विषय झाला होता. या दोन्ही आंदोलनांतूनच जेन-झी हा शब्द प्रत्येक नागरिकाच्या तोंडी फिट बसला. ही दु:खद आंदोलने जरी परदेशांत झाली असली तरी भारतातील ’बेगाना शादीमें अब्दुला दिवाना’ या प्रवृत्तीच्या काही नतद्रष्ट कारभार्यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ते सरकारला येथेही अशी परिस्थिती उद्भवेल, असा इशारा सातत्याने देऊ लागले.
त्यानंतर 15 मे 2026 रोजी बोगस व बनावट पदव्यांवर आधारित खटल्याच्या सुनावणीदरम्यान
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के. सूर्य कांत यांनी अशा तरुणांची तुलना ’झुरळा’शी केली. भ्रष्ट कारभार्यांच्या ताटाखालचे मांजर झालेल्या उथळ वृत्तवाहिन्यांनी नेहमीप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी या निरीक्षणाचा चुकीचा अर्थ लावून न्या. सूर्य कांत यांनी तरुणांना ’झुरळ’ असे संबोधले, अशी बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करून, देशभरातील तरुणांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. परिणामी यामुळे देशभरात मोठा वाद निर्माण होऊन संताप व्यक्त होऊ लागला. मानवी हक्क आणि मानवी गरिमेला कमी लेखणारी ही भाषा असल्याचा आक्षेप अनेक माध्यमे व समाजातील घटकांनी घेतला.
न्या. सूर्य कांत यांच्या या वक्तव्याने मूळचा छत्रपती संभाजीनगरचा, पण अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या अभिजित दीपके या तरुणाचा संताप झाला आणि त्याने कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेची स्थापना केली. 3 मे रोजी नीट या स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटला होता. नैराश्यात जाऊन जवळपास 10 ते 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. हाच मुद्दा पकडून दीपकेने जंतर-मंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. जेन-झीचे आंदोलन असे त्याला लेबल लावले गेले. हे ’जेन-झी’ जेव्हा संसदेवर चालून गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर स्प्रेचा वापर करत, दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांना लाठीमार करावा लागला. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या धुमश्चक्रीत काही आंदोलक विद्यार्थी व पोलिसही जखमी झाले. मुळातच जेन-झीच्या खांद्यावर बंदुका ठेवून देशात अराजकता माजवण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे एक षडयंत्रच होते, यात तीळमात्र शंका नाही. पोलिसांनी लाठीमार केल्याचे निमित्त झाले आणि राजकारण तापायला सुरुवात झाली. भाजप सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाण्यात देव ठेवून बसलेली विरोधी मंडळी ठिणगी पडण्याची चातकासारखी वाटच बघत होते. त्यांनी त्वरित सरकार किती अमानुष आहे, याची टिमकी वाजवण्यास सुरुवात केली. सकाळच्या अतिविद्वान भोंग्याने अतिदक्षता विभागात उपचार घेणार्या एका विद्यार्थिनीला तर मारूनच टाकले. सत्तेसाठी पाषाणहृदयी गेंडे किती नीच स्तरावर जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. यांना पोलिसांवर दगडफेक करणार्या, मोदींना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करणार्या जेन-झींचा पुळका आला. पण कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवणारे जखमी पोलिस मात्र दिसले नाहीत. विरोधक अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून त्यांना धोबीपछाड देण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा देऊन विरोधकांचे मनसुबे उधळून लावले.
प्रधान यांचा राजीनामा झाल्याने जेन-झीने एकच जल्लोष केला व सरकार आमच्यापुढे झुकले असा ढोल बडवण्यास सुरुवात केली. जेन-झीच्या आंदोलनाला यश आले, हे बघून विरोधकांना झोपेतून अचानक जाग यावी याप्रमाणे जेन-झीची आठवण झाली. मग त्यांच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी त्यांना गोंजरण्याची यांच्यात स्पर्धा सुरू झाली. अर्थात, या नौटंकीत सत्ताधार्यांसह ज्यांची नौका बुडण्याच्या अवस्थेत आहे, असेही ’गट’ सहभागी झाले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात अगदी वाजतगाजत, प्रचंड जाहिरातबाजी करत, छात्रों की गूंज हा फक्त विद्यार्थिनींसाठीचा खास कार्यक्रम घेतला. सत्ताधार्यांनी झूट की गूंज अशी या कार्यक्रमाची खिल्ली उडवली, तर गर्दी जमवण्यासाठी विद्यार्थिनींना पैसे वाटल्याचे आरोपही केले. यासंदर्भातील चित्रफितीही समाजमाध्यमांत फिरत होत्या. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी काय संवाद साधला? त्याचा विद्यार्थिनींवर किती, कसा आणि काय परिणाम झाला? या कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला का? यापेक्षा तो वादग्रस्तच अधिक झाला, हे मात्र नक्की. सीनिअर पप्पूने कार्यक्रम घेतला. मग ज्युनिअर पप्पू कसा मागे राहील? त्यानेही जेन-झीबद्दलचा फुकाचा पुळका दाखवत, काही कार्यक्रम घेतले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे असे कार्यक्रम घेतले.
मागे राहिली होती ती मनसे. मग युवानेते अमित ठाकरे बाह्या सरसावून जेन-झींच्या समस्या ऐकून (?) घेण्यासाठी ठिकठिकाणी फिरू लागले. याअंतर्गतच दोन दिवसांपूर्वी ते पुण्यात अवतरले व शासकीय तंत्रनिकेतनाची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. ते आपल्या बगलबच्च्यांसह प्राचार्यांच्या दालनात घुसले आणि त्यांच्यावर प्रश्नांंची सरबत्ती सुरू केली. एवढ्याने समाधान झाले नाही म्हणून महापुरुषांच्या बरोबरीने पंतप्रधानांचे छायाचित्र लावण्यास त्यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राच्या बर्याच दूर असलेले मोदींचे छायाचित्र त्यांनी हटवले आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पंतप्रधानांचा अपमान केला, या मुद्द्यावर राजकारण तापण्यास सुरुवात झाली. यावरून अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते की, पंतप्रधानांचा अपमान करण्यासाठी? असा वादग्रस्त प्रश्न उभा राहिला. नंतर मोदींचे छायाचित्र परत त्याच जागेवर लावण्यात आले.
प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय तंत्रनिकेतनात विनापरवानगी प्रवेश करत, तेथील पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र काढून घेत कर्मचार्यांना धमकी देत, गोंधळ घातल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 20 ते 25 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे म्हणजे खायापिया कुछ नहीं, गिलास तोडा बारह आने का असे होऊन, हा अपरिपक्वपणा बूमरँग होऊन त्यांच्यावरच उलटला, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. असो. पण मनसेने केलेला हा प्रकार मात्र सर्वांत वादग्रस्त ठरला, हे मात्र नक्की!
खरेतर अमित ठाकरेे पुण्यात जेन-झीच्या अडचणी ऐकण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी गेले, याबाबत काही तक्रार नाही. किंबहुना तो त्यांचा अधिकारच आहे. पण पंतप्रधानांच्या छायाचित्राचे आवश्यकता नसताना राजकारण करण्याची गरजच नव्हती. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यात महापुरुषांसह राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे भिंतीवर छायाचित्र लावण्याचा शिष्टाचार किंवा आचारसंहिता आहे, याचे साधे ज्ञानही यांना नसावे? यामुळे यांच्या बुद्धीची कीव येते. आधीच संघटनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात यांनी जेन्युअलीचा पाढा वाचून जी माती खाल्ली होती, ते जनता विसरत नाही तोच पुन्हा एकदा अपरिपक्वतेचे दयनीय प्रदर्शन करून हात दाखवून अवलक्षण करून घेतले. सकाळच्या भोंग्याने आणि यांच्या बगलबच्च्यांनी या निंदनीय गोष्टीचे समर्थन केले. पण साहेबांच्या धाकाने त्यांचा नाइलाज झाला असावा. त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
जर यांना खरेच सवंग प्रसिद्धी मिळवायची होती, तर यांनी मालेगावला जाऊन तेथील महापालिकेतील टिपू सुलतानचे छायाचित्र काढायला हवे होते. यांना हवी असलेली भरघोस प्रसिद्धी तर मिळाली असतीच. पण संपूर्ण महाराष्ट्राने यांची पाठ थोपटली असती; परंतु आता यांनी व यांच्या पक्षाने (?) हिरवी चादर पांघरलेल्या गटाशी हातमिळवणी केल्याने यांचा नाइलाज झाला असावा, हे जनता समजू शकते.
हे ज्या स्क्वॉटिश शाळेत शिकले त्या शाळेत राजकारण्यांची छायाचित्रे नाहीत का? याआधी भाजपच्या नेते किंवा कार्यकर्त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची छायाचित्रे काढल्याचे वाचण्यात किंवा ऐकण्यात आले आहे का? शिवतीर्थ परिसरात यांच्या बगलबच्च्यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी यांची (?) तुलना केलेले बॅनर लावले. हे बॅनर लावण्यास यांनी मज्जाव का केला नाही? मनसेच्या कार्यालयांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राशेजारी बाळा नांदगावकर, यांचे व यांच्या पप्पांचे लावलेले छायाचित्र बघून यांना आनंद होतो का?
या निंदनीय प्रकारावरून विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकणे हा आपली डुबती नौका वाचवण्यासाठी चालवलेला राजकीय स्टंट आहे, यावर शिक्कामोर्तब तर झालेच. पण संकुचित बुद्धी व विचार, अपरिपक्वता, भाजप व मोदींविषयी असलेली मळमळ व द्वेष याचे प्रदर्शन करून घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला, हे स्पष्ट झाले आहे. यांच्या या संकुचित विचारामुळेच मतदारांनी यांच्यासह मनसेच्या सर्व उमेदवारांना नाकारले असावे, असे वाटते. यांच्या अशा मर्कटलीलांनी, संकुचित विचारांनी आणि संपूर्ण भारतवासीयांच्या भावना पायदळी तुडवल्याने यांचा आणि यांच्या पक्षाचा भविष्यकाळ फार कठीण आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नसावी.
Love for Gen-Z or an aim at the ballot box?