अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई साक्रीत 82 किलो डोडा जप्त, दोघे ताब्यात

सिडको : प्रतिनिधी
‘नशामुक्त नाशिक’ अभियानांतर्गत नाशिक शहर अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत धुळे जिल्ह्यातील साक्री येथे 82 किलो 264 ग्रॅम डोडा (पॉपी स्ट्रॉ), रोख रक्कम, वजनकाटा आणि दोन चारचाकी वाहने असा सुमारे 12 लाख 33 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तिसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस अ‍ॅक्टअंतर्गत गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुकेश गोवर्धनराम विष्णोई आणि भरत भिकाराम विष्णोई (दोघे रा. जोधपूर, राजस्थान) यांचा शोध घेण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक राजस्थानला रवाना
झाले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस हवालदार भरत डंबाळे, पोलीस अंमलदार गणेश वडजे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी साक्री येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार 18 जुलै रोजी समरथळा हॉटेल, कोंडाईबारी येथे सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात
घेण्यात आले.
चौकशीत आरोपी मुकेश विष्णोई याने साक्री येथील सुयोग कॉलनीतील भाड्याच्या घरात डोडा लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घराची झडती घेतली असता पाच गोण्यांमध्ये 82 किलो 264 ग्रॅम डोडा (पॉपी स्ट्रॉ) आढळून आला. याशिवाय, 1 लाख 50 हजार रुपये रोख, एक वजनकाटा आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत हा अमली पदार्थ राजस्थानमधील सुरेश नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुकेश विष्णोई, भरत विष्णोई आणि सुरेश यांच्याविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्टच्या संबंधित कलमान्वये साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस हवालदार भरत डंबाळे, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सैंदाणे, पोलीस अंमलदार गणेश वडजे, योगेश सानप, अविनाश फुलपगारे, चंद्रकांत बागडे तसेच महिला पोलीस अंमलदार अर्चना भड यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Major operation by the Anti-Narcotics Squad in Sakri: 82 kg of poppy husk seized, two persons detained.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *