– समाधान कदम
भारत-जपान भागीदारीला मैत्रीचा आधार
जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांनी 1 जुलै ते 3 जुलै 2026 दरम्यान भारताचा अधिकृत दौरा केला आहे. या भेटीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सानाए ताकाईची यांच्यात द्विपक्षीय संबंध, हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा, संरक्षण सहकार्य, व्यापार, गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पुरवठा साखळी आणि प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीमुळे भारत-जपान संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून, बदलत्या जागतिक राजकारणात या दोन लोकशाही राष्ट्रांची भागीदारी अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
आजचे जागतिक राजकारण बहुध्रुवीय व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. अमेरिका-चीन स्पर्धा, रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील अस्थिरता, तैवान सामुद्रधुनीतील वाढता तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील बदल यामुळे आशिया हा जागतिक सामरिक स्पर्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि जपान यांच्यातील संबंध हे केवळ द्विपक्षीय राहिलेले नाहीत, तर ते हिंद-प्रशांतमधील स्थैर्य, नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि मुक्त सागरी व्यापाराचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ बनले आहेत.
भारत आणि जपान यांचे संबंध इतिहास, संस्कृती आणि परस्पर विश्वासावर आधारित आहेत. बौद्ध धर्माच्या माध्यमातून दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध अनेक शतकांपूर्वी प्रस्थापित झाले. स्वातंत्र्यानंतर जपानने भारताला विकासाचा विश्वासार्ह भागीदार मानले. 2000 मध्ये दोन्ही देशांनी ग्लोबल पार्टनरशिपची घोषणा केली. 2006 मध्ये स्ट्रॅटेजिक अँड ग्लोबल पार्टनरशिप आणि 2014 मध्ये स्पेशल स्ट्रॅटेजिक अँड ग्लोबल पार्टनरशिपचा दर्जा देण्यात आला. या प्रवासातून दोन्ही देशांतील संबंध सातत्याने अधिक व्यापक आणि सखोल होत गेले आहेत.
हिंद-प्रशांत ही संकल्पना आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या प्रदेशातून जगातील बहुतांश सागरी व्यापार होतो. ऊर्जा सुरक्षा, समुद्री दळणवळण, व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य या प्रदेशाशी जोडलेले आहे. चीनच्या वाढत्या सागरी प्रभावामुळे या भागातील सामरिक समीकरणे वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत भारताचा S-G-R (Security and Growth for -ll in the Region) दृष्टिकोन आणि जपानची Free and Open Indo-Pacific संकल्पना परस्परपूरक ठरते. दोन्ही देश मुक्त नौवहन, आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान आणि शांततापूर्ण विवाद निवारण यांना प्राधान्य देतात.
भारत-जपान संरक्षण सहकार्यानेही गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. संयुक्त लष्करी सराव, नौदल सहकार्य, सागरी क्षेत्र जागरूकता, सायबर सुरक्षा, अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण उपकरणांच्या सहविकासावर भर दिला जात आहे. या सहकार्यामुळे हिंद-प्रशांतमधील सामरिक संतुलन अधिक मजबूत होण्यास मदत होत आहे. दोन्ही देश कोणत्याही संघर्षाला प्रोत्साहन देत नाहीत; मात्र नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.
आर्थिक क्षेत्रात जपान हा भारताचा अत्यंत विश्वासार्ह भागीदार आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्प, औद्योगिक टाउनशिप, मेट्रो प्रकल्प आणि विविध पायाभूत सुविधा उभारणीत जपानी गुंतवणुकीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळीमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. चीनवरील अतिनिर्भरता कमी करण्यासाठी जागतिक उद्योग भारताकडे वळत असताना जपानची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.
‘क्वाड’ या मंचामुळे भारत-जपान संबंधांना अधिक व्यापक सामरिक परिमाण प्राप्त झाले आहे. क्वाड ही कोणत्याही देशाविरुद्धची लष्करी युती नसून, मुक्त, सुरक्षित आणि समावेशक हिंद-प्रशांतसाठी सहकार्याचे व्यासपीठ आहे. लस उत्पादन, हवामान बदल, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत क्वाडचे सहकार्य वाढत आहे. भारत आणि जपान हे या मंचाचे प्रमुखप्रेरणास्थान मानले जातात. जागतिक प्रशासनाच्या सुधारणांबाबतही दोन्ही देशांची भूमिका जवळपास समान आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांसाठी भारत आणि जपान दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहेत. जी-4 समूहातील सदस्य म्हणून दोन्ही देश सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी एकमेकांना पाठिंबा देतात. हवामान बदल, दहशतवादविरोध, शाश्वत विकास आणि मुक्त व्यापार यांसारख्या विषयांवरही दोन्ही देश सातत्याने सहकार्य करत आहेत. लोकांमधील संबंध ही भारत-जपान मैत्रीची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. जपानी भाषा शिक्षण, कौशल्य विकास, विद्यार्थी देवाणघेवाण, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे दोन्ही देशांतील परस्पर समज अधिक दृढ होत आहे. भारतातील तरुणांसाठी जपानमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून, कौशल्याधारित भागीदारी भविष्यात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.
मोदी-ताकाइची संवादाचा व्यापक अर्थ केवळ द्विपक्षीय सहकार्यापुरता मर्यादित नाही. बदलत्या जागतिक सत्तासंतुलनात विश्वासार्ह, लोकशाहीवादी आणि जबाबदार भागीदार म्हणून भारत आणि जपान एकत्र येत आहेत. या भागीदारीचा उद्देश कोणत्याही राष्ट्राला रोखणे नसून शांतता, स्थैर्य, आर्थिक समृद्धी आणि नियमाधारित जागतिक व्यवस्थेला बळकटी देणे हा आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध आगामी दशकात अधिक बहुआयामी होतील. संरक्षण, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, पुरवठा साखळी आणि मानव संसाधन विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने उघडतील. विश्वास, समान लोकशाही मूल्ये आणि दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टीकोन यांच्या बळावर उभी असलेली ही भागीदारी हिंद-प्रशांत प्रदेशाच्या शांतता आणि समृद्धीची प्रभावी हमी ठरू शकते. म्हणूनच मोदी-ताकाइची संवाद हा केवळ दोन नेत्यांचा राजनैतिक संवाद नसून, बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत-जपान मैत्रीचा अधिक मजबूत आणि दूरदर्शी अध्याय आहे.
Modi-Takai interaction
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…