स्वच्छतेकडे दुर्लक्ष : कचरा वर्गीकरण न करणे, प्लास्टिक वापरणार्यांना दणका
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांना आवाहन करूनही त्याकडे शहरातल्या विविध भागांत सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या घनकचरा विभागाने गेल्या तीन महिन्यांत कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चार हजार 241 नागरिकांना दणका दिला. त्यांच्यावर 27 लाख 33 हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.
अनेकदा ताकीद देऊनही वर्गीकरणाकडे दुर्लक्ष करणार्या नागरिक, तसेच सोसायट्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई सुरू आहे. त्यानुसार 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन हजार 718 नागरिकांवर कारवाई करून 13 लाख 30 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध प्रयत्न, तसेच उपाययोजना सुरू आहेत.
कचरा वर्गीकरण, कचरा उघड्यावर टाकणे, राडारोडा टाकणे, प्लास्टिक वापर यांसारख्या बाबींवर नागरिकांचे प्रबोधन केले जाते. मात्र, तरीही काही महाभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता कचर्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याने दररोज गोळा होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर विल्होळीनजीक असलेल्या कचरा डेपोत प्रक्रिया केली जाते. मात्र, ही प्रक्रिया करताना त्यात मोठा अडथळा ठरतो तो ओला व सुका कचर्याचा. कचरा वर्गीकरण करून न देताच नागरिकांकडून घंटागाडीत दिला जात असल्याने त्याचे वर्गीकरण आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची कडक अंमलबजावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. त्यानुसार घंटागाडी कर्मचारी कचरासंकलन करताना तो वर्गीकरण करून घेतला जात असल्याने कचरा वर्गीकरणाचे प्रमाण 65 टक्क्यांहून अधिक झाले आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने दारोदारी, तसेच उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचर्याचे दररोज संकलन करून तो कचरा डेपोवर प्रक्रिया करण्यासाठी पाठविलो जातो. कचरा संकलनासाठी महापालिकेच्या जवळपास 400 हून अधिक लहानमोठ्या घंटागाड्यांंची व्यवस्था करण्यात आली आहे. आजमितीस दररोज सुमारे 700 टन कचरासंकलन केले जाते.
नागरिकांनी घंटागाडीत कचरा देताना त्याचे वर्गीकरण करून म्हणजेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच द्यावा.
महापालिकेला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून, वर्गीकरणाकडे दुर्लक्ष करणार्यांवर मात्र नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
– डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा विभाग, मनपा
दंड प्रकार दंडाची संख्या दंडाची रक्कम
उघड्यावर कचरा टाकणे – 167 2,19,880
कचरा वर्गीकरण न करणे – 3,718 3,30,400
प्लास्टिकचा वापर करणे – 92 4,65,000
कचरा उघड्यावर जाळणे – 12 51,000
उघड्यावर शौचास बसणे – 20 10,000
उघड्यावर लघुशंका करणे – 13 2,600
बांधकाम कचरा उघड्यावर – 41 3,23,900
एकूण केसेस – 4,241 27,33,050
Municipal Corporation imposes punitive action of Rs. 27 lakh