आस्वाद

माय मानतो मराठी

काही दिवसांपूर्वी सध्या ट्रेंडिंगला असलेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मराठी चित्रपट बघितला. असा एकही क्षण गेला नाही की बालपणाच्या आठवणी नव्या नाही झाल्या, पण त्या अगदी पाहिल्या सीनमधील लिमलेटच्या गोळ्या असोत किंवा सहलीच्या वेळेसची बबनने घातलेली हाफ चड्डी असू दे. सगळंच अगदी भूतकाळात घेऊन जाणारं होतं.
एक एक सीन काळजाला भिडणारा होता. सिनेमा बघताना एका गोष्टीचा फार अभिमानही वाटला आणि प्रचंड दुःखही झालं. अभिमान या गोष्टीचा वाटला की, मीही एकदा मराठी शाळेची विद्यार्थिनी आहे आणि दुःख या गोष्टीचं की, अगदी बोटावर मोजण्याइतक्या मराठी शाळा सध्या चालू स्थितीत आहेत आणि त्यातही त्यांची पटसंख्या बघून तर आश्चर्यच वाटेल. काय वाटतं तुम्हाला असं का होत असेल? कारण अगदी साधं जरी असलं तरी विचार करायला भाग पडणारं आहे.
आज सगळ्यांना इंग्रजी म्हणजे एकदम गौरवशाली भाषा वाटते. इंग्रजी येत असेल तरच तो व्यक्ती उत्तम आणि वरचढ अथवा नाही, मग त्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे इंग्रजी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेणं, इंग्रजी शाळेत गेला तरच माझं मूल छाप पाडू शकेल अथवा नाही, हा त्यामागचा मानस. आज हेसुद्धा एक स्टेटसचा भाग मानलं जातं. यात काही त्यांचा हेतू वाईट आहे, असे मुळीच नाही. त्यांनी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे, पण त्यामुळे मातृभाषेचा दर्जा उतरू देऊ नका.
इंग्रजीचा वापर करता यायलाच हवा, तेसुद्धा सध्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गरजेचं आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला हवी, जर तुम्हाला तुमची मातृभाषा पक्की असेल, तर इतर भाषा आत्मसात करायला अडचण येत नाही आणि त्यासाठी मातृभाषेला प्राथमिक दर्जा देणं खूप महत्त्वाचं आहे.
मी असे अनेक पालक बघितले आहेत जे अभिमानाने सांगतात, आम्ही मूळचे देशस्थ ब्राह्मण पण आमच्या मुलाशी आम्ही इंग्रजीमधूनच बोलतो, स्पर्धेच्या युगात टिकायला हवा ना तो त्याला दूध पी म्हटलं की तो उत्तरच देत नाही, पण बेबी कम एंड ड्रिंक मिल्क असं म्हटलं की धावत येतो. त्याला मराठी लिहिता-वाचता येत नाही एवढी पण इंग्रजी मात्र उत्तम येते. आणि ह्याचा पालकांना अभिमान वाटतो.
सद्यपरिस्थिती बघता, खरंच भीती वाटते की काही वर्षांनी मराठी भाषा इतिहासात जमा नाही झाली म्हणजे मिळवलं. यासाठी एक गोष्ट अतिशय आवश्यक आहे आणि ती म्हणजे शाळांचे सध्या होत असलेले बाजारीकरण थांबवणे आणि शाळांमागचा मुलं घडवण्याचा हेतू ध्यानात घेऊन शाळा या नावाचा गैरवापर करून पैसे लुबाडण्याचा धंदा बंद करणे. 2-3 वर्षांची मुल अगदी अंगणवाडीत घालायचं म्हटलं तरी पाच – पाच लाख रुपये फी तसेच डोनेशन्सच्या नावाखाली घेतले जातात. अरे इवल्याशा लेकराला धड बोलताही येत नाही त्याला तुम्ही एवढे पैसे घेऊन वर्षभरात आइन्स्टाइन बनवणार की काय? अशी अनेक उदाहरणं आहेत, जी आपल्या शर्यतीत मुलांची होत असलेली हेळसांड सिद्ध करू शकतील.
सर्व पालकांना एकच विनंती आहे, की शक्य असेल तर मुलांना मातृभाषेत शिक्षण घेऊ देत आणि जर उपाय नसेलच तर इंग्रजी शाळेत घातलंत तरी आपल्या माय मराठीची गोडी घरी कशी वाढवता येईल ह्याचा विचार करा. त्यांना पु. ल. देशपांडे, आचार्य अत्री, ग. दि. माडगूळकर कोण होते सांगा, मराठी साहित्य त्यांच्या समोर ठेवा. ती नक्कीच तुमचं नाव उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतील आणि राहिला विषय इंग्रजीचा, मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर ते कोणतीही भाषा सहज आत्मसात करतील.

My Manato Marathi

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago