द्वारका महामार्गासाठी दाखला द्या

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मनपाला पत्र

नाशिक : प्रतिनिधी
द्वारका ते नाशिकरोड येथील दत्त मंदिर चौक परिसरात तब्बल 221 कोटी खर्च करून सहापदरी रस्त्याचे काम केले जाणार आहे. दरम्यान, महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी महापालिकेने 90 टक्के भूखंड अडथळामुक्त करून देण्याचे प्रमाणपत्र सादर करावे, असे पत्र नाशिक महापालिकेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पाठवले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग-60 वरील द्वारका सर्कल ते उपनगर नाकामार्गे दत्त मंदिर चौक या महत्त्वाच्या 5.650 किमीच्या टप्प्याचे सहापदरीकरण करण्याचा आणि दोन्ही बाजूंना दोन पदरी सर्व्हिस रोड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सध्या या 5.65 किमीच्या टप्प्याची रुंदी 24 ते 30 मीटर असून, ती विकास योजनेनुसार 45 मीटर केली जाणार आहे. या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जादा जमीन महापालिकेने टीडीआर देऊन विनावॉरंट अधिग्रहित करण्याचे निश्चित केले आहे. कुंभमेळ्याच्या वेळेत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने तातडीने जमिनीचा ताबा मिळवून वर्क ऑर्डर देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने या 221.52 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत नाशिक महापालिका आयुक्तांंना पत्र लिहून 45 मीटर रुंद रस्त्याच्या जागेच्या प्रत्यक्ष ताब्याबाबतचा दाखला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून, 177.74 कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामासाठी मेसर्स व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. ही कंपनी सर्वांत कमी बोली लावणारी कंत्राटदार ठरली आहे.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प
शहरातील वाहतूक कोंडी निवारण आणि सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण करणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे आणि कुंभमेळ्यापूर्वी प्रवाशांना सुरळीत वाहतुकीचा अनुभव मिळावा, यासाठी महापालिकेकडून लवकरात लवकर जागा ताब्याचे प्रमाणपत्र मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Provide a certificate for the Dwarka highway

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *