1 जून च्या निमित्ताने…

तुम्ही जर फेसबुक वापरत असाल तर, तुमच्या लक्षात येईल की वर्षातील 365 दिवसांपैकी 1 जून या दिवशी सर्वात जास्त मित्रांचे वाढदिवस असतात. तपासून बघा एकदा. याच्या व्यतिरिक्त या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल दिन, जागतिक पालक दिन आणि जागतिक दूध दिवस म्हणूज घोषित केलेला आहे. किती योगायोग आहे बघा या दिवसाचा. जन्म दिन, बालक दिन, पालक दिन आणि या सर्वाना एका धारेने बंधनात ठेवणारे द्रव, म्हणजेच दूध दिवस. कदाचित, जेव्हा केव्हा ही घोषणा केली असेल, तेव्हा घोषणा करणार्‍यालाही याची कल्पना नसेल की आपण किती दुर्मिळ योग साधत आहोत. अशा या अजब दिनाबद्दल थोडेसे लिहावे वाटले, म्हणून लिहितोय. नक्की वाचा.
आज जी लोक चाळीशी, पन्नाशी किंवा साठीत आहे, त्यांच्या लहानपणी जेव्हा त्यांना शाळेत भरती करताना जन्म तारीख लिहिणे आवश्यक असायचे. त्यांचे पालक बहुतांशी अशिक्षित आणि अडाणी असल्याने, मुलांच्या जन्म तारखा, अथवा तिथी लक्षात नसायचे. मग मुलांना शाळेत भरती करताना शाळा मास्तर ने जन्म तारीख विचारल्यावर त्यांच्याकडे त्याचे उत्तर नसायचे. मग तो मास्तरच एखादी तारीख टाकायचा. आपल्या शिक्षण व्यवस्थेत, शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. म्हणून मग जून महिन्याच्या पहिल्या दिवसाची तारीख टाकून मास्तर मोकळे होऊन जायचे. माझ्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्ट मधील किमान 70 – 80 जणांचे वाढदिवस याच दिवशी आहेत. माझेही तसेच काही झाले आहे. जन्मकुंडली प्रमाणे खरी जन्मतारीख एप्रिलच्या 6 तारखेला आहे, परंतु शाळेत दाखल करताना कदाचित तिथे 6 जून अशी नोंद झाली होती, आणि आजवर रेकॉर्डला हीच तारीख दिसते. यामुळे मला वर्षातून दोनदा बर्थ डे साजरा करण्याचे भाग्य लाभले आहे. घरच्यांसाठी 6 एप्रिल आणि इतरांसाठी 6 जून. साधारणपणे 80 च्या दशकानंतर साक्षरता वाढल्याने आणि सरकारने जन्म नोंद सक्तीची केल्याने, खरी जन्मतारीख नोंदवली जाते.
बाळाचे आणि पालकांचे एक अतूट असे नाते असते.

जन्माच्या वेळी, माता आणि बाळ एका नाळेद्वारे जुडलेले असतात. जन्म झाल्यावर लगेचच ही नाळ कापली जाते. एका जीवाचे दोन स्वतंत्र जीव बनतात. परंतु, काही वेळातच हे दोन जीव पुन्हा एका वेगळ्या गोष्टीने जोडल्या जातात. दूध ही अशी गोष्ट आहे, जी आई आणि बाळाला जोडून ठेवतात. पुढील एक ते दीड वर्ष बाळाचे पालन पोषण करण्यात दुधाचे अनन्यसाधारण असते, यात काही दुमत नाही. त्याच बरोबर, बाळाच्या जडणघडणीत निसर्गाचे देखील योगदान असावे, म्हणून गाय, म्हैस, शेळी, मेंढी आदी प्राण्यांचे दूध देखील दिले जाते. दुधाचे पौष्टिक गुणधर्म आपण सर्वच जण जाणतो. शारिरीक आणि बौद्धिक वाढीसाठी लागणारे सर्वच घटक दुधात उपलब्ध असतात. म्हणूनच कदाचित दुधाला अमृत म्हटले जाते. परंतु दुर्दैवाने अलीकडे, असे बघायला मिळते की मुलांवर दुधाचे संस्कार कमी होताना दिसताय. विशेष करून शहरी भागात दुधाचे सेवन कमी होत आहे. मातांचे ब्युटी आणि शेप कॉंशियस असणे, दुधाचा तुटवडा, दुधाच्या शुद्धतेबद्दल असलेला संशय, अशा काही गोष्टींमुळे कदाचित दुधाचे सेवन कमी झाले असावे. असो. विचार करा… दोन जीव, स्त्री आणि पुरुष लग्न करून एकत्र येतात. त्यांचा संगम होऊन तिसरा जीव निर्माण होतो. त्या जीवाच्या प्राथमिक व मूलभूत गरजा भागविण्यासाठी दुधाची मदत होते. एकीकीकडे पालक, दुसरीकडे ते बालक आणि तिसरे दूध, या त्रिवेणी संगमाचा दिवस म्हणजे 1 जून. पालक हे मूळ स्रोत, बालक हे फलस्वरूप आणि यांना जोडणारी तार, अशी दुधाची धार. तिन्हींचे आपापले महत्व, आपापले वैशिष्ट्य आणि आपापली उपयुक्तता आहे. तिन्ही एकमेकांना पूरक, एकमेकांना पोषक, एकमेकांना वृध्दींगत करणार्‍या आहेत. तिन्ही एकमेकांना जोडलेल्या आणि जोडून ठेवणार्‍या आहेत. कुठल्याही एकाविना बाकी दोघांचे अस्तित्वच नाही. पालक नाही तर मूल नाही आणि दूधही नाही. बाळ नाही तर दूध नाही आणि पालकत्व नाही. दूध नाही तर बाळ नाही, आणि बाळ नाही आणि पालकत्व नाही. हेच या दिवसाचे आणि जीवनाचे वैशिष्ट्य आहे. चला, या दिवशी आपले पालक आणि बालक या दोन्हींनाही शुभेच्छा देऊ, तसेच दूध देणार्‍या प्रत्येक प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आईवडील आणि मुलांचे आभार व्यक्त करूया.

डॉ. संजय धुर्जड
9822457732

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *