उपनगर पोलिसांत गुन्हा; दोन ते तीन संशयित ताब्यात
सिडको/नाशिक रोड : प्रतिनिधी
नाशिकरोड येथील राहुलनगर परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेत प्रदीप कैलास भालेराव (वय 41, रा. पंचशीलनगर, नाशिक-पुणे रोड, गांधीनगरजवळ, नाशिक) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भालेराव हे मागील दहा वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जाते. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते राहुलनगर परिसरात गेले असता, तेथील काही नागरिकांशी त्यांचा वाद झाला. यावेळी ते दगडाने मारहाण करीत असल्याची तसेच एका व्यक्तीला पकडून दाबत असल्याची माहिती समोर आली. संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली. या गोंधळादरम्यान काही नागरिकांनी भालेराव यांना मारहाण केल्याचे समजते. त्यानंतर ते बेशुद्ध पडले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध अवस्थेतील भालेराव यांना नवीन बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
रुग्णालयात करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत भालेराव यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला आणि डाव्या गालावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. तसेच उजव्या खांद्यावर दोन ते तीन दिवसांपूर्वीची जुनी जखम असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
भालेराव यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, मारहाणीत कोणाचा सहभाग होता आणि मृत्यूचे कारण काय, याचा तपास उपनगर पोलीस करीत आहेत.
One person dies following an assault in Rahulnagar.