कडवा जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांची घटनास्थळी धाव, सकाळी 10 पर्यंत दुरुस्ती

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या कडवा जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला पिंपळगाव घाडगा येथे सोमवारी पहाटे गळती लागली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. पहाटे 4.30 वाजता प्रकार लक्षात येताच पंप बंद करण्यात आले. उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी पहाटेच दुरुस्ती पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषदेच्या पथकाने तातडीने दुरुस्ती सुरू करून सकाळी 10 वाजेपर्यंत गळती रोखली आणि पंप पुन्हा सुरू केले.
कडवा धरणातून सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 600 मिलिमीटर व्यासाच्या डीआय मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या 200 मिलिमीटर एअर व्हॉल्व्हला पिंपळगाव घाडगा येथे गळती लागली. रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान वाहनाचा धक्का लागल्याने व्हॉल्व्हचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या वेळी गळती सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले.
गळतीची माहिती मिळताच पंप ऑपरेटरने पाणी उपसा करणार्‍या मोटारी बंद केल्या. पहाटे पाचच्या सुमारास उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी दुरुस्ती पथकासह घटनास्थळी पोहोचून कामाला सुरुवात केली. पथकाने युद्धपातळीवर दुरुस्ती करत सकाळी 10 वाजेपर्यंत गळती रोखली. त्यानंतर पंप पुन्हा सुरू करण्यात आले.
घटनेनंतर नगराध्यक्ष विठ्ठल उगले, गटनेते मनोज देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे आणि नगरसेवक पंकज जाधव यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

रस्ता कामांदरम्यान खबरदारीची गरज

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्हला गळती लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय झाला. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत केला. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामांदरम्यान जलवाहिनी आणि तिच्याशी संबंधित यंत्रणांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Leak in Kadva water pipeline; thousands of litres of water wasted.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *