संपादकीय

जेन-झीच्या हट्टापुढे पालकत्वाचा कस!

– देवयानी सोनार
छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरील एका मुलाच्या आत्महत्येच्या घटनेने जनमनाचे काळीज पिळवटून टाकले आहे. मुलाने आत्महत्या करू नये यासाठी आई-वडिलांची आर्त हाक आणि प्रयत्न निष्फळ ठरल्याच्या दृश्यांंचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.खवड्या डोंगरावर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने जेनझी अर्थात, आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेसोबतच पालकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्षुल्लक कारणावरून अनमोल जीव गमावताना या घटनेकडे मुलाचा हट्ट किंवा पालकांची चूक म्हणून न पाहता मुलांशी संवाद, त्यांचे मानसिक स्वास्थ आणि बदलत्या पिढीला समजून घेणारे पालकत्व अपेक्षित ठरणार आहे.
हा व्हिडिओ पाहताना जीवन अनमोल आहे, हे का त्या मुलाला समजले नसेल? आई-वडिलांचा आर्तस्वर का त्याच्या कानात शिरला नाही? एवढे कोणते संकट त्याच्यावर आले होते की तो जीव द्यायला तयार झाला? असे एक ना अनेक प्रश्न तो व्हिडिओ आणि तो प्रसंग पाहणार्‍यांच्या मनात आल्यावाचून राहत नाहीत. संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे…
लालनाद् बहवो दोषाः, ताडनाद् बहवो गुणाः।
तस्मात् पुत्रंच शिष्यंच ताडयेन्न तु लालयेत्॥
याचा अर्थ अति लाडामुळे अनेक दोष निर्माण होतात, तर शिस्त लावल्यामुळे अनेक गुण विकसित होतात. त्यामुळे पुत्र आणि शिष्य यांना अति लाड न करता शिस्त लावावी. म्हणजेच जास्त लाड केले तर लेकरांत दोष उत्पन्न होतात आणि वेळेवर धाक दाखवला तर गुण विकसित होतात.
आजची मुले तंत्रज्ञानाच्या जगात वाढत आहेत. मोबाइल, विविध गॅझेट, सोशल मीडियावरील आभासी जग, महागड्या वस्तू, तुलना आदींचा जेन-झीच्या मनावर लवकर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. मुलाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक मागणी पूर्ण करणे हे प्रेमाचे लक्षण नाही. मुलांना आपल्या कुटुंबाची परिस्थिती, पैशाची किंमत आणि वस्तू मिळविण्यासाठी पालक करत असलेले कष्ट समजावून सांगणेही महत्त्वाचे आहे.
पालक मुलांना वेळ देऊ शकत नसतील तर अशा वेळी पालकांना नेहमी खंत वाटते. मुलांसोबत खेळ खेळू शकत नाही किंवा इतर आनंद देऊ शकत नाही, तसेच आपल्याला ज्या गोष्टी आपण लहान असताना मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुला-मुलीला मिळायला हव्यात, अशीच मानसिकता असल्याने अनेकदा महागड्या वस्तू, फिरणे किंवा इतर सुविधा देत त्यांची भरपाई करण्याचा प्रयत्न करतात; परंतु मुलांना केवळ महागड्या वस्तूच नाही, तर पालकांचा वेळ, संवादही हवा असतो.
मुलांच्या प्रत्येक हट्टामध्ये काही ना काही कारण असते.एखादा मुलगा किंवा मुलगी एका दिवसात निराश होत नाही, तर काही दिवसांपासून मनात काहीतरी सुरू असते. सततची चिडचिड, एकटेपणा, अभ्यासाचा दबाव, इतरांशी तुलना, अपयशाची भीती, घरातील सततचे वाद किंवा आपल्या बोलण्याला कोणी किंमत देत नाही किंवा आपले कोणी ऐकत नाही, अशी मानसिकता तयार होत जाते. त्यामुळे मुलांशी कायम संवाद तसेच पालकांनी मुलांचे मित्र होण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रत्येक आई-वडील हे परिपूर्ण नसतात. पालकत्वाचा अनुभव नसतो. कोणत्याच पालकाला मुलांचे संगोपन कसे करावे याचा अनुभव नसतो. समाजात ज्या पद्धतीने किंवा पूर्वापार आपल्यावर जसे संस्कार झाले तसे ते आपल्या पाल्याला देण्याचा प्रयत्न करीत असतात. मुलांच्या संगोपनाचे कोणतेही शिक्षण-अभ्यासक्रम नाही. आता काही समाजमाध्यमांवर पॅरेंटिंगवर सेमिनार, लेक्चर्स आदींचे पेव
फुटले आहे; परंतु प्रत्येक मूल हे वेगळे असते. पालक वेगळ्या विचारांचे असतात. एक साचेबद्ध अभ्यास किंवा सेमिनार प्रत्येकालाच लागू पडेल असे नसते. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीने पालकांसमोर मुलांना समजून घेण्याचा स्मार्टपणा विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. थोडक्यात, बच्चे तुम जिस स्कूल मे पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है, अशी भूमिका ठेवल्यास मुलाबाबत सर्वच जाणून घेण्यास पालकांनी पुढे आले पाहिजे. आपला मुलगा काय विचार करू शकतो किंवा कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतो याचा अंदाज पालकांना यायलाच हवा. अन्यथा खवड्या डोंगरावरच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एका वयानंतर मुलांना पालक म्हणून नाही, तर मित्र बनून संवाद साधणे गरजेचे आहे. सतत सूचना देणे, कामे सांगणे, तुलना करणे किंवा प्रत्येक गोष्टीला नकार देणे टाळले पाहिजे. प्रत्येक मागणी पूर्ण करण्याची सवय लावणेही योग्य नाही. शिस्तीच्या नावाखाली मारहाण किंवा कठोर शिक्षा न देता काय चूक काय बरोबर, हे समजावून सांगणे आवश्यक आहे. माझा मुलगा किंवा मुलगी मला सर्व सांगतो किंवा सांगते यावरही विश्वास ठेवणे चुकीचे आहे. कदाचित रागावण्याच्या भीतीपोटी मुले खोटेही बोलतात. अनेक मुले आपल्या मनातील गोष्टी मित्रांजवळ बोलतात. आपली मुले आपल्याशी पारदर्शकपणे बोलणे टाळतात, याचे कारण पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कदाचित पालकांशी बोलणे किंवा बोलण्याची पद्धत चुकीची असू शकते.
मुलाच्या वागण्यात अचानक बदल दिसला, चिडचिड वाढली, एकटा राहू लागला तर पालकांनी गंभीरपणे पाहिले पाहिजे. अशा वेळी मुलाला एकटे न सोडता त्याच्याशी संवाद साधावा. आमच्या काळी असे नव्हते, अशी तुलना करून आजच्या पिढीला समजून घेता येणार नाही. आजच्या मुलांचे जग वेगळे आहे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि स्पर्धात्मक युगात ही मुले वाढत आहेत. त्यांच्या समस्या, ताणतणाव वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्यात रस घेऊन त्यांना समजावून घेणे आवश्यक आहे.प्रेम, शिस्त, मर्यादा आणि संवाद याचा योग्य वापर करणे, हे पालकत्वाचे खरे शिक्षण आहे.
खवड्या डोंगरावरील घटनेमुळे एका कुटुंबाचा दुःखद अंत झालेला पाहिला. या घटनेत दोष कोणाला द्यायचा, यापेक्षा अशी वेळ पुन्हा कोणत्याही कुटुंबावर येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करायला हवा.
सोशल मीडियावर एकाने भावना व्यक्त केली ती अशी ः
शेवटी एकच म्हणावे वाटते
नसतात रे सगळ्यांचे आईबाप श्रीमंत
तू फोनची आस का धरली?
तुला वाचवताना वेड्या
तुझ्या बापानेसुद्धा उडी मारली
कसं झालं असेल आईचे काळीज
तिनेपण उडी मारली
तुमच्या संपलेल्या परिवाराची
आता सगळीकडेच चर्चा चालू झाली
मागे फक्त त्या खवड्याच्या डोंगरावर
तुझ्या मायेची किंचाळी उरली!

Parenting put to the test by Gen Z’s stubbornness!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago